आर्किमिडीज स्क्रू : आर्किमिडीज या ग्रीक शास्त्रज्ञांनी जहाजाच्या तळभागात साठलेले पाणी बाहेर काढण्यासाठी तयार केलेले यंत्र. या

आर्किमिडीज स्क्रू : (१) नळकांडे, (२) पत्र्याचा पडदा, (३) धारवा, (४) हस्तक.

साधनामध्ये एक लांब नळकांडे असून त्याच्या आत त्याच्या अक्षावर बसवलेल्या दांड्याभोवती मळसूत्राप्रमाणे बसवलेला व नळकांड्याला चिकटवलेला पत्र्याचा पडदा असतो. दांड्याचे खालचे टोक एका टेकू (एकाच बाजूकडे तोंड असलेल्या) धारव्यामध्ये ठेवलेले असते व वरचे टोक एका खांबामधील नलिका (दोन्ही बाजूंकडे तोंडे असलेल्या) धारव्यामधून बाहेर गेलेले असते. दांड्याच्या वरच्या टोकावर दांडा फिरविण्याचा हस्तक बसवलेला असतो. नळकांड्याचे खालचे तोंड पाण्यात बुडलेले असते. वरच्या हस्तकाने नळकांडे योग्य दिशेने फिरवले म्हणजे नळकांड्याच्या खालच्या तोंडातून पाणी आत शिरते व मळसूत्री पडद्यावरून हळूहळू वर चढत जाऊन वरच्या तोंडातून बाहेर पडते.

हे यंत्र बनविण्यास अवघड असून ते साध्या हातपंपापेक्षाही कमी कार्यक्षमतेचे असल्यामुळे आता सर्वसाधारण प्रचारात नाही.

ओक, वा. रा.