आर्किमिडीज : (इ. स. पू. सु. २८७-२१२). सुप्रसिद्ध प्राचीन ग्रीक गणिती व संशोधक. भूमिती, यामिकी (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणारे शास्त्र) व अभियांत्रिकी या त्रिविध क्षेत्रांत महत्त्वाची कामगिरी. त्यांचा जन्म सिसिलीमधील सेरक्यूज येथे झाला. सेरक्यूजचा राजा दुसरा हीरो व त्यांचा मुलगा गेलो यांच्याशी त्यांची दाट मैत्री होती. त्यांचे सर्व शिक्षण ॲलेक्झांड्रिया येथे झाले. तेथे कॉनन नावाच्या गणितज्ञाशी त्यांचा परिचय झाला. शिक्षण संपल्यावर आपल्या जन्मगावी येऊन त्यांनी गणिताचा अभ्यास पुढे चालू ठेवला. उपलब्ध असलेल्या त्यांच्या लेखांवरून त्यांच्या सखोल कार्याची कल्पना येते. त्यांचे काही लेख जवळजवळ दोन हजार वर्षांपर्यंत प्रमाणभूत मानले गेले आहेत.

वर्तुळ, ðअन्वस्त आणि सर्पिल या वक्रांच्या क्षेत्रमापनासाठी त्यांनी वापरलेली ‘निःशेष पद्धत’ बऱ्याच बाबतीत अर्वाचीन समाकलनाच्या [ → अवकलन व समाकलन ] विवरणाशी सदृश असलेली आढळते. वर्तुळाचा परिघ व व्यास यांच्या गुणोत्तराचे (π चे) मूल्य ३ १०/७१ आणि ३ १/७ त्यांच्या दरम्यान असल्याचे त्यांनी सिद्ध केले. शांकवाचे [वक्राचा एक प्रकार, → शंकुच्छेद ] क्षेत्रफळ अगर शांकव अक्षाभोवती फिरवून येणाऱ्या प्रस्थाच्या (घनाकृतीच्या) पृष्ठभागाचे क्षेत्रफळ अगर त्या प्रस्थाचे घनफळ तुलनात्मक रीतीने मांडता येते असे आर्किमिडीज यांना दाखविले. अंक मोजण्याच्या ग्रीक पद्धतीत त्यांनी सुधारणा केल्या.

तरफेचा शोध आर्किमिडीज यांनीच लावला. ‘योग्य टेकू मिळाल्यास मी पृथ्वीसुद्धा तरफेचा साहाय्याने उचलून दाखवीन’ असे त्यांनी उद्‌गार काढले होते. ‘पदार्थाचे पाण्यात केलेले वजन हे त्याच्या हवेतील वजनापेक्षा त्याने बाजूला सारलेल्या पाण्याच्या वजनाइतके कमी असते’ हे तत्त्व ‘आर्किमिडीज तत्त्व’ या नावाने सुप्रसिद्ध आहे. सोनाराने बनविलेल्या मुकुटात चांदीची भेसळ असल्याचा राजा हिरो यांस संशय आला व त्याची शहानिशा करण्याचे काम आर्किमिडीज यांच्याकडे सोपविण्यात आले. या घटनेतूनच ह्या तत्त्वाचा शोध लागला.

पाणी उपसून काढण्याकरिता त्यांनी शोधून काढलेल्या यंत्रात ‘आर्किमिडीज स्क्रू’ असे नाव प्राप्त झाले आहे व ते ईजिप्तमध्ये वापरातही होते. गोफणीतून ज्याप्रमाणे दगड फेकता येतात त्याच धर्तीवर मोठेमोठे दगड फेकण्याचे यंत्र आर्किमिडीज यांनी तयार केले होते. रोमन सेनापती मार्सेलस् यांनी समुद्रमार्गे सेरक्यूजवर केलेली स्वारी राजा हीरोनी या यंत्राच्या जोरावर परतविली. तथापि खुष्कीच्या मार्गाने येऊन मार्सेलस् यांनी सेरक्यूज काबीज केले व त्यांच्या सैन्यातील एका सैनिकाने आर्किमिडीज यांचा शिरच्छेद केला.

टॉरेली यांनी १७९२ मध्ये व हाइबेर्ग यांनी १८८० मध्ये आर्किमिडीज यांच्या सर्व लिखाणाचे संपादन केले. त्यानंतर १८९७ मध्ये हीथ यांनी वर्क्स ऑफ आर्किमिडीज या ग्रंथात आर्किमिडीज यांचे लेख आधुनिक चिन्हे व खुणा वापरून प्रसिद्ध केले.

गुर्जर, ल. वा.