आन्द्रिच, ईव्हो : (१० ऑक्टोबर १८९२ — ). युगोस्लाव्हियाचा कादंबरीकार आणि कथालेखक, १९६१चा नोबेल पारितोषिक विजेता. बॉझ्निया येथे जन्म. आरंभीचे शिक्षण सारायेव्हो येथे. उच्च शिक्षण झाग्रेब, व्हिएन्ना, क्रेको आणि ग्रात्स विद्यापीठांत. तो दक्षिण स्लाव्ह लोकांच्या ऐक्यासाठी झटला व त्याने त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. १९१४ पूर्वीच त्याच्या भावगीतांमुळे त्याला कवी म्हणून प्रसिद्धी मिळाली पण Ex Ponto (१९१८, इं. शी. प्रिझन मेडिटेशन्स) ह्या त्याच्या कवितासंग्रहामुळे त्याला विशेष मान्यता मिळाली. १९१८ नंतर यूगोस्लाव्हियाचा प्रतिनिधी म्हणून इटली, रूमानिया, ऑस्ट्रिया आदी राष्ट्रांना त्याने भेटी दिल्या. विविध देश पाहूनही त्याच्या साहित्यात प्रकर्षाने चित्र उमटते ते बॉझ्नियाचेच. तेथील लोक आणि प्रदेश हीच त्याच्या साहित्यकृतींची पार्श्वभूमी आहे. अनुभवांचे सखोल निरीक्षण, ठळक चित्रण आणि मानसशास्त्रीय विश्लेषण ही त्याच्या कादंबऱ्यांची वैशिष्ट्ये त्याच्या लघुकथांतही प्रकर्षाने जाणवतात. मानवाची स्वतःच्या अस्तित्वासाठी चाललेली केविलवाणी धडपड आणि तिचे विश्वाशी असलेले नाते यांचे दिग्दर्शन त्याच्या ओघवत्या शैलीतून घडते. त्याची साहित्यभाषा सर्बियन.
दुसऱ्या महायुद्धापर्यंत त्याने लिहिलेल्या Travnicka Kronika(१९४५, इं. भा. बॉझ्नियन स्टोरी, १९५९), Na Drini Cuprija (१९४५, इं. भा. द ब्रिज ऑन द ड्रीना, १९५९) व Gospodjica (१९४५, इं. भा. द वूमन फ्रॉम सारायेव्हो, १९६६) या तीन कादंबऱ्या बॉझ्नियाच्या इतिहासावर आधारलेल्या आहेत.
नोबेल पारितोषिकाच्या निवड समितीने त्याच्या महाकाव्यात्मक शैलीचा गौरव करून द ब्रिज ऑन द ड्रीना ह्या कादंबरीचा ह्या संदर्भात प्रामुख्याने उल्लेख केला आहे.
जगताप, दिलीप