आन्त्सेनग्रूबर, लूटव्हिक : (२९ नोव्हेंबर १८३९ — डिसेंबर १८८९). ऑस्ट्रियन नाटककार. जन्म व्हिएन्ना येथे. त्याने काही काळ रंगभूमीवर नट म्हणून काम केले. त्याने सुमारे वीस बोधप्रद नाटके जर्मन भाषेत लिहिली असून त्यांत ऑस्ट्रियातील ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण आढळते. आपल्या नाट्यलेखनासाठी त्याने बोलीभाषेचा चांगला उपयोग करून घेतला. त्याचे तंत्र लोकनाट्यात्मक आणि विचारसरणी पुरोगामी होती. त्याच्या काही नाटकांतून निसर्गवादाची चाहूल लागते. Der Pfarrer von Kirchfeld(१८७०, इं. शी. प्रिस्ट ऑफ किर्कफेल्ड) व Das Vierte Gebot (१८७७, इं. शी. द फोर्थ कमांडमेंट) ही त्याची विशेष महत्त्वाची काही नाटके. याशिवाय त्याने काही कथा-कांदबऱ्याही लिहिल्या. व्हिएन्ना येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, बा. भी.