आर्सेनोपायराइट : (मिस्पिकेल).  खनिज. स्फटिक एकनताक्ष, त्रिनताक्ष किंवा मिथ्यासमचतुर्भुंजी व प्राचीनाकार किंवा वडीसारखे.  प्रचिनांच्या पृष्ठांवर उभ्या रेखा असतात.  जुळे (यमलज) स्फटिकही वारंवार आढळतात.  (100) व (001) पृष्ठांवरील यमलनाने स्फटिक समचतुर्भुजी वाटतात. (101) पृष्ठांवर संस्पर्शी (चिकटलेले), अन्योन्यवेशी (एकमेकांत घुसलेले) किंवा पुनरावृत्त यमलन झालेले आढळते.  (012) पृष्ठावरील यमलनाने सहा आऱ्यांची तारकाकृती तयार होते [→ स्फटिकविज्ञान ].  संहत किंवा कणमय पुंजांच्या स्वरूपातही आढळते. पाटन : (110) बरेचसे स्पष्ट.  भंजन खडबडीत [→ खनिजविज्ञान ].  ठिसूळ.  कठिनता ५·५-६. विं.गु. ६·१५.  अपारदर्शक.चमक धातूसारखी.  रंग रुपेरी ते पोलादासारखा.  कस काळसर.   रा.सं. FeAsS. कधीकधी कोबाल्टाने अंशतः लोहाची जागा घेतलेली आढळते.  हे आर्सेनिकाचे सर्वात सामान्य व निरनिराळ्या परिस्थितींत तयार होणारे खनिज असून ते उष्णवायवीय (शिलारसातील उष्ण वायूंच्या क्रियेने तयार झालेल्या)  निक्षेपात टंगस्टन व कथील यांच्या धातुपाषाणांबरोबर किंवा कोबाल्ट व निकेल यांच्या धातुपाषाणांबरोबर आढळते.  कधीकधी याचे कण रूपांतरित खडकात, डोलोमाइटात, चुनखडकात किंवा सर्पेटाइनात विखुरलेले आढळतात.  दक्षिण डकोटा, कॅलिफोर्निया, क्वेबेक, कार्नवॉल इ.  प्रदेशांत आर्सेनोपायराइटाचे साठे आहेत.  उपयोग : आर्सेनिकाचा धातुपाषाण म्हणून.  आर्सेनोपायराइट हे आर्सेनिकल पायराइट या जुन्या नावाचे संक्षिप्त रूप आहे.

ठाकूर, अ. ना.