आर्मस्ट्राँग, हेन्री एडवर्ड : (६ मे १८४८–१३ जुलै १९३७). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. कार्बनी रसायनशास्त्रात महत्त्वाचे संशोधन. लेविसहॅम (केंट) येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्री येथे एडवर्ड फ्रँकलंड यांच्या मार्गदर्शनाखाली (१८६५–६७) व हेरमान कोल्बे यांच्या मार्गदर्शनाखाली लायपझीग (जर्मनी) येथे (१८६७–८०) रसायनशास्त्राचा अभ्यास केला. सिटी अँड गिल्ड्स या लंडन येथील संस्थेत त्यांची रसायनशास्त्र व भौतिक हे विषय शिकविण्यासाठी १८७९ मध्ये नेमणूक झाली. सेंट्रल टेक्निकल कॉलेज, केन्सिंगटन येथे १८८४ मध्ये ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. त्या संस्थेचा इंपिरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉनॉलीमध्ये समावेश झाल्यावर ते १९११ मध्ये सेवानिवृत्त झाले. १८७६ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड झाली. केमिकल सोसयटी या संस्थेचे ते प्रथम सचिव (१८७५–९३) व नंतर अध्यक्ष (१८९३–९५) होते.
पिण्याच्या पाण्यात असेली कार्बनी अपद्रव्ये अजमावण्याची पद्धत त्यांनी फ्रँकलंड यांच्या सहकार्याने शोधून काढली. त्यामुळे आंत्रज्वराला (टायफॉइडाला) प्रतिबंध घालणे शक्य झाले. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी नॅप्थॅलीन हायड्रोकार्बनाच्या प्रतिष्ठापनेसंबंधी (एक अणू किंवा अणुगट काढून तेथे दुसरा अणू वा अणुगट बसविण्यासंबंधी) सु. ६० संशोधन लेखांचा संग्रह प्रसिद्ध केला. नॅप्थॅलीन व त्याचे अनुजात (साध्या रासायनिक विक्रियेने बनलेली संयुगे) यांचे परस्परसंबंध त्यांनी ठरविल्यामुळे रंजक-द्रव्यांच्या उद्योगधंद्याचा फार मोठा विकास झाला. अडॉल्फ फोन बेयर यांच्याप्रमाणेच, पण स्वतंत्ररीत्या बेंझिनाचे अभिमध्य सूत्र त्यांनी सुचविले. कार्बनी संयुगांच्या स्फटिकवैज्ञानिक मापनाचे ते आद्य प्रवर्तक होत. कार्बनी संयुगांच्या रंगांसंबंधीच्या ‘क्विनोन संरचना सिद्धांता’ चे त्यांनी प्रतिपादन केले. कापूर व तत्सम टर्पिन गटातील संयुगांच्या रासायनिक संरचनेसंबंधी त्यांनी विवरण केले. लेविसहॅम येथेच ते मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.