आयबेक्स: गो-कुलातील कॅप्रा वंशाचा हा एक रानबोकड आहे. याचे शास्त्रीय नाव कॅप्रा आयबेक्स आहे. मध्य आशियातील अलताई पर्वतापासून हिमालयापर्यंत व अफगाणिस्थानापासून कुमाऊँपर्यंत हा आढळतो. हिमालयी आयबेक्स पश्चिम हिमालयाच्या मुख्य रांगेच्या दोन्ही बाजूंवर आणि काश्मिरातील पर्वतांच्या ओळीत आढळतो. वृक्षरेखा (ज्या रेखेच्या पलीकडे वृक्ष उगवत नाहीत) आणि हिमरेखा (ज्या रेखेच्या वर सतत हिम आढळते) यांच्या मधील बऱ्याच उंचीवरील खडकाळ, कडेकपाऱ्यांच्या आणि कुरणांच्या प्रदेशात हा राहतो.

आयबेक्स हा राकट व जाडजूड असून डोक्यासकट त्याची लांबी सु. १·५ मी., शेपटी १२-१५ सेंमी. आणि खांद्यापाशी उंची ८०-१०० सेंमी.

आयबेक्स

असते. नराला जंबियाच्या आकाराची दोन मोठी शिंगे असून ती चपटी असतात व त्यांच्या पुढच्या भागावर ठळक कंगोरे असतात. शिंगांची जास्तीत जास्त लांबी १·५ मी. असते. नराला मोठी दाढी असते. अंगावर जाडेभरडे केस असतात. कातडीलगत असलेल्या दाट, मऊ लोकरीने कडाक्याच्या

थंडीपासून हिवाळ्यात त्यांचा बचाव होतो. रंग बदलणारा असतोहिवाळ्यात केसांचा रंग पिवळसर पांढरा असून त्यात तपकिरी व करड्या रंगाची कमीजास्त प्रमाणात छटा असते. उन्हाळ्यात रंग गडद तपकिरी होतो व त्यावर मोठे पांढरे ठिपके असतात. मादी नरापेक्षा लहान व पिवळसर तपकिरी रंगाची असते.

यांचे १२-५० जणांचे कळप असतात. वसंतऋतूत ओढ्यांच्या काठांवर उगवलेले गवत खाण्यासाठी हे हिमरेखेच्या पुष्कळच खाली येतात. यांची चरण्याची वेळ पहाट आणि संध्याकाळ असते. मधल्या वेळेत एखाद्या सुरक्षित जागी कळप विश्रांती घेतो. कळपातील माद्या सदैव जागरूक असतात आणि विश्रांती घेत असताना देखील त्यांची दृष्टी चहूकडे असते. दृष्टी व वास यांमुळे त्यांना शत्रूची चटकन चाहूल लागते पहारेकरी माद्यांपैकी एखादीने धोक्याचा इशारा करताच सबंध कळप पळून सुरक्षित जागी आसरा घेतो.

वसंतऋतूत आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला वयस्क नर हे माद्या आणि बच्च्यांच्या कळपांबरोबर किंवा त्यांच्या जवळपास असतातपण ऐन उन्हाळ्यात ते दुर्गम जागी जातात आणि तेथे एकएकटे किंवा तीनचार जणांचे गट करून राहतात. ऑक्टोबर महिन्यात म्हणजे माजावर आल्यावर ते कळपात परत येतात. मे आणि जून महिन्यांत मादी पिल्लांना जन्म देते.

चामडे आणि लोकर यांकरिता यांची शिकार करतात. यांच्या अत्युत्तम मऊ लोकरीचे हातमोजे, पायमोजे, शाली इ. बनवितात. चामड्याचे बूट करतात.

भट, नलिनी