आयबिस : थ्रेस्किऑर्निथिडी पक्षिकुलातल्या या पक्ष्याच्या दोन जाती भारतात आढळतात. एक पांढरा आयबिस आणि दुसरा काळा आयबिस. पांढऱ्याचे शास्त्रीय नाव थ्रेस्किऑर्निस मेलॅनोसेफॅला आणि काळ्याचे स्यूडायबिस पॅपिलोझा असे आहे. पांढरा आयबिस सबंध भारतात आणि काळा भारताच्या रुक्ष भागात दक्षिणेस म्हैसुरपर्यंतच आढळतो. जगाच्या जवळजवळ सर्व भागांत आयबिस आढळतो. आफ्रिकेत आढळणारी थ्रेस्किऑर्निस इथिओपिका ही जाती प्राचीन ईजिप्तमध्ये फार पवित्र मानली जात असे.
पांढरा आयबिस : हा पक्षी मोठा असतो. लांबी ७६ सेंमी.डोके आणि मान काळी त्यांवर पिसे नसतातचोच लांब, मजबूत, काळी व खाली वाकलेलीसगळे अंग पांढरेडोळे तांबूसपाय तकतकीत काळे असतात. प्रजोत्पादनाच्या काळात मानेच्या बुडाशी शोभिवंत पिसे उगवतात. नर व मादीत फरक नसतो. हा पाण्याजवळ राहणारा असून दलदलीच्या जागी यांचीटोळकी आढळतात. गोगलगाई, झिंगे, पाणकिडे हे याचे भक्ष्य होय. उथळ पाण्यात व चिखलात चोच खुपसून हा भक्ष्य पकडतो. स्वरयंत्र नसल्यामुळे हा नेहमीच स्तब्ध असतो पण विणीच्या काळात रेकल्यासारखा आवाज काढतो असे म्हणतात.
प्रजोत्पादनाचा काळ उत्तर भारतात जून–ऑगस्ट आणि दक्षिणेत नोव्हेंबर–फेब्रुवारी असतो. पाण्यात किंवा पाण्याजवळ असलेल्या ज्या झाडांवर बगळे वगैरे घरटी बांधतात त्याच झाडांवर हा काटक्यांचे घरटे बांधतो. मादी निळसर किंवा हिरवट रंगाची २-४ अंडी घालते.
काळा आयबिस : हा पांढऱ्यापेक्षा थोडा लहान असतो. रंग काळाडोके काळेमाथ्यावर तांबडा तिकोनी ठिपकाडोक्यावर पिसे नसतातचोच लांब, खाली वाकलेली खांद्याजवळ मोठा पांढरा ठिपकापाय विटकरी रंगाचे. नर व मादीत फरक नसतो. पांढऱ्या आयबिसइतका हा पाण्यावर अवलंबून नसतो. यांची जोडपी व विस्कळित टोळकी उघड्यावर हिंडत असतात. किडे, धान्य, लहान सरडे वगैरे याचे भक्ष्य होय. याचा अावाज मोठा, गेंगाणा व कर्कश असतो. प्रजोत्पादनाचा काळ अनियमित, मार्च ते नोव्हेंबर केव्हाही असतो. घरटे पाण्यापासून दूर असलेल्या झाडावर उंच ठिकाणी असून मोठे व वाटीसारखे असते. मादी तकतकीत फिक्कट हिरव्या रंगाची २-४ अंडी घालते.
देशपांडे, ज. र.
“