आर्मडिलो

आर्मडिलो : डॅसिपोडिडी कुलातील हा एक अनग्रदंत (पुढचे दात नसलेला) सस्तन प्राणी असून ðस्लॉथचा जवळचा नातेवाईक आहे. दक्षिण अमेरिकेतील उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशाचा तो रहिवासी आहे. शरीराची लांबी सु. १५–९० सेंमी. असून ते अस्थिमय चिलखताने झाकलेले असते चिलखत अंशतः मोठ्या भरीव तकटांचे व अंशतः अनुप्रस्थ (आडव्या) चल पट्टांचे बनलेले असते.  हे प्राणी आपल्या आखूड पायांनी वेगाने धावू शकतात.  पायांच्या बोटांवर मजबूत नखर (नख्या) असतात. डोळे अधू पण घ्राणेंद्रिय आणि कर्णेंद्रिय तीक्ष्ण असते.  स्वरक्षणाकरिता जमिनीतील बिळांत अथा दाट काटेरी जाळीत तो लपून बसतो किंवा शरीराची चेंडूसारखी गुंडाळी करतो. आर्मडिलो गरीब आणि निरुपद्रवी आहे. तो सर्वभक्षक असून किडे, कृमी, फळे किंवा झाडांची मुळे खातो. आपल्या लांब चिकट जिभेने तो भक्ष्य पकडतो. रात्रिंचर असल्यामुळे याचे सगळे व्यवहार रात्री चालतात.  मादीला एका विणीत चार पिल्ले होतात व ती समलिंगी असतात.  त्यांची त्वचा मऊ असते. वाढ पूर्ण झाल्यावरच अस्थिपट्ट कठीण आणि जाड होतात.  आर्मडिलोचे मांस खातात व ते स्वादिष्ट असते.

कर्वे, ज. नी.