आनंदवर्धन: (९वे शतक). संस्कृत साहित्यशास्त्रविवेचक, कवी आणि तत्त्वज्ञ. त्याच्या पित्याचे नाव नोण असे होते. काश्मीरचा राजा अवंतिवर्मा याच्या कारकीर्दीत आनंदवर्धनास कवी म्हणून कीर्ती लाभली. काव्याचे एक प्राणभूत तत्त्व म्हणून ध्वनीचे (सूचितार्थाचे) सखोल विवेचन करण्यासाठी त्याने लिहिलेला ध्वन्यालोक हा ग्रंथ सुविख्यात आहे. व्याकरणात पाणिनीच्या सूत्रांचे आणि वेदान्तात वेदान्तसूत्रांचे जे स्थान आहे, तेच संस्कृत साहित्यशास्त्राच्या इतिहासात ध्वन्यालोकाचे आहे, असे मानले जाते. हा ग्रंथ लिहून आनंदवर्धनाने साहित्यशास्त्राच्या तत्त्वांचे व्यवस्थापन केले, अशा आशयाचे गौरवोद्गार जगन्नाथपंडिताने काढले आहेत. ध्वन्यालोकाखेरीज अर्जुनचरित हे संस्कृत महाकाव्य, विसमबाणलीला हे प्राकृत महाकाव्य, देवीशतक हे स्तोत्र आणि धर्मोत्तमाविवृति हा दार्शनिक ग्रंथ त्याने लिहिला. यांशिवाय तत्त्वालोक हा ग्रंथही त्याने लिहिला, असे दिसते.

पहा: ध्वन्यालोक.

कुलकर्णी, अ. र.