आधुनिक मूर्तिकला: आधुनिक (मॉडर्न) मूर्तिकलेचा कालखंड एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू होतो. आधुनिक चित्रकलेत दृक्प्रत्ययवाद, अभिव्यक्तिवाद, घनवाद, अप्रतिरूपता वगैरे विचारधारा आल्या. या विचारधारांच्या प्रभावाने मूर्तिकलेचे स्वरूपही बदलू लागले. प्राचीन व मध्ययुगीन मूर्तिकला ही चित्रकलेप्रमाणेच वर्णनात्मक व वास्तववादी होती. वस्तुमात्रात दिसणाऱ्या आकारांची, दिसते तशी हुबेहूब प्रतिकृती करणे हेच तिचे उद्दिष्ट असे. मायकेल अँजेलोसारखे यूरोपीय प्रबोधनकालीन शिल्पकार आदर्शाभिमुख वास्तववादीच होते. तत्पूर्वीची ग्रीक व रोमन मूर्तिकलाही तशीच होती. भिन्न कलामाध्यमांतून मूलतः भिन्न अशी गुणमूल्ये व्यक्त करावयाची असतात, याची जाणीव त्या काळी स्पष्ट नव्हती. वर्णनात्मक आशय हा आधुनिकतेपूर्वीच्या स्वच्छंदतावादाचाही उद्देश होता. मध्ययुगीन निकॉला पिसानो आणि दोनातेलो हे शिल्पकार काहीसे अपवाद. हे दोघेही वास्तववादी असले, तरी गुणदृष्ट्या आधुनिकांना जवळचे वाटण्यासारखे आहेत. दोनातेलोच्या मूर्तिशिल्पातील सघन घनाकार आणि निकॉला पिसानोच्या मूर्तिशिल्पामधील सरल भावाभिव्यक्ती ही वैशिष्ट्ये निवळ वास्तववादापलीकडची होती. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीची सर्वच कला अतिरंजित गोडवा व हळवी भावविवशता यांमुळे निष्प्रभ झाली होती. हि कोंडी फोडून चित्रकलेत दलाक्र्वा, कूर्बे आणि मूर्तिकलेत ð रॉदँ यांसारख्यांनी नाट्यमय स्वच्छंदता आणली.
आधुनिकतेची स्पष्ट जाणीव प्रथम चित्रकलेतील घनवादापासून झाली. चित्र आणि शिल्प या वेगवेगळ्या माध्यमांच्या गुणवैशिष्ट्यांची भिन्नताही स्पष्ट झाली. चित्राच्या द्विपरिमाणात्मक आकाराहून शिल्पाच्या त्रिपरिमाणात्मक आकाराची सघनता, गुणवत्ता वेगळी असते, याची जाणीव प्रकर्षाने झाली. दगड, धातू, लाकूड, सिमेंट या माध्यमद्रव्यांच्या प्रकृतिभिन्नतेकडेही लक्ष वेधले गेले. शिल्पाकृती अनेक दिशांनी पाहावयाची असते. प्रत्येक दिशेने पाहताना तीमधील दृष्टीला चालना देणाऱ्या प्रेरणा जिवंत व ठसठशीत व्हाव्या लागतात. या प्रेरणा वेगवेगळ्या दिशांनीही सुसंघटित असाव्या लागतात. अशा सुसंघटनेमुळे भोवतालचे अवकाशक्षेत्रही जिवंत व्हावे लागते. ज्या परिसरात शिल्प उभारावयाचे असते, त्या परिसराशी ते एकजीव व्हावे लागते. दिसते तसे हुबेहूब चित्रण करणे, एवढाच कलेचा हेतू नाही. कलावंताने स्वतःच्या अनुभूतीमधून कलाकृतीला काहीएक वेगळेपणा द्यावयाचा असतो आणि तो विशिष्ट माध्यमद्रव्यांच्या द्वारा प्रकट व्हावयाचा असतो. दगडातील शिल्प छिन्नीने खोदून करावयाचे असते, तर मातीकामात मातीचे लपके लावीत, आकार वाढवीत व भरीत न्यावयाचा असतो. यांतील ‘खोदून काढणे’ आणि ‘भर घालणे’ किंवा ‘जडविणे’ या प्रक्रिया स्वभावतःच वेगळ्या असतात. ही जाणीव तसे पाहता अगदी प्राचीन काळापासून थोडीबहुत अस्पष्ट स्वरूपात होती. मातीकाम या अर्थाचा मूळ ग्रीक शब्द ‘Plastikos’ ही विशिष्ट शब्दच्छटा दाखवितो. पुढे त्याची अर्थच्छटा बदलली. भर घालणे म्हणजे नुसती माती या जड द्रव्याची भर नसून, कलावंताच्या जाणिवांची भर, अशा अर्थाने ‘प्लॅस्टिसिटी’ हा शब्द सर्व दृश्य कलांना लावला जाऊ लागला. कलावंताच्या सर्जनशील प्रवृत्तींसाठी ‘क्रीएटिव्ह’ हा शब्द रूढ झाल्यावर प्रत्यक्ष मातीकामाच्या संदर्भातून वेगळा होऊन ‘प्लॅस्टिक आर्ट्स’ (रूपण कला) असा साधा भाषाप्रयोग दृश्य कला या अर्थाने रूढ झाला असला, तरी त्याचे मूळ असे शिल्पकलेशी निगडित आहे.
काष्ठशिल्पामध्ये लाकडी तंतुरेषांची वळणे समग्र शिल्पाकृतीमध्ये सुसंगत बसावी लागतात. धातुशिल्पामध्ये ओतकामाच्या क्रियेला महत्त्व असून, आकाराला ओतीवपणाचा भाव यावा लागतो. खोदकामाच्या क्रियेच्या ओघात त्या क्रियेवर भर देता देता आरपार जाणाऱ्या पोकळीचासुद्धा हृद्य परिणाम होतो, ही जाणीव स्पष्ट झाली. नेहमीच्या स्थिर व सघन शिल्पाबरोबरच ð अलेक्झांडर कॉल्डरने हलते व आकार बदलणारे ð चलशिल्प प्रत्यक्षात आणले.
आधुनिक विज्ञानयुगामुळे कलामाध्यमांच्या साधनांमध्ये कधी नव्हे इतकी भर पडली. सिमेंटच्या व इतर शोधांमुळे अनेक तंत्रे आली. वितळजोडाच्या सोईमुळे धातुशिल्पात ओतकामाबरोबर जडावाचेही तंत्र आले. छायाचित्रणाच्या शोधामुळे वस्तूची दिसते तशी यांत्रिक नक्कल करण्याची गरज तर मुळातूनच नाहीशी झाली. या अशा परिस्थितीत अनेक क्षेत्रांतील कलावंत एकत्र आले. ð पिकासो, मोदील्यानी, झां आर्प ðआल्बेर्तो जाकोमात्ती हे चित्रकारही आहेत आणि शिल्पकारही. अतिवास्तववादी पंथात झां आर्पच्या शिल्पांचीही गणना होते. आशयाभिव्यक्तीच्या बाबतीत आल्बेर्तो जाकोमात्तीवर अतिवास्तववादी पंथ आपला अधिकार सांगतो आणि अलेक्झांडर कॉल्डरशी संबंध जोडू पाहतो. झां पॉल सार्त्रने जाकोमात्ती व कॉल्डर यांच्या कलेवर भाष्यही केले आहे. रॉदँ, ð ब्रांकूश, ð एप्स्टाइन, ð हेन्री मुर, बार्बारा हेप्वर्थ ð नायूम गाब, बटलर, चॅडविक, आर्मिटिज हे काही प्रमुख आधुनिक शिल्पकार. एप्स्टाइन आणि हेन्री मुर यांनी परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ साधून मूर्तिकलेत चिरस्थायी गुणवत्ता संपादन केली.
भारतातही आधुनिकतेचे लोण प्रथम चित्रकलेत आणि त्यापाठोपाठ शिल्पकलेत आले. देवीप्रसाद राय चौधरी, पाणसरे, पोचखानवाला, राघव कान्हेरिया आणि अलीकडील जानकीराम यांनी अस्सल दक्षिण भारतीय कारागिरी आणि निखळ भारतीय शैली यांचा आधुनिकतेशी मेळ साधला, पाणसरेंनी दगडातील व लाकडातील शिल्प यशस्वीपणे हाताळले.
चित्रकलेतील आधुनिक पंथांचा प्रभाव शिल्पकलेवरही पडला. अनेक अभिव्यक्तिप्रकार उदयास्त पावले. चित्र आणि शिल्प यांच्यामध्ये पडणारे ð चिक्कणितचित्रासारखे प्रकार निर्माण झाले. ह्यात चित्रफलकावर कोणत्याही वस्तू चिकटवून चित्रपृष्ठ प्रसंगी शिल्पासारखे कमीजास्त उचलले जाते. चिक्कणितशिल्पामध्ये कोणत्याही वस्तू, जुने फर्निचरचे तुकडे, यंत्राचे सुटे भाग यांचा वापर होतो. फलकावर तारा, खिळे, पत्रे व इतर वस्तू ठोकून आणि वितळजोड करून, शिल्पाकृतीत वैचित्र्य आणले जाते. कॉल्डर आणि बेन निकल्सन यांसारख्यांनी शिल्पांकनात रंगाचा वापरही सुयोग्य व माफक प्रमाणात केला. सुरुवातीला मानवी भावनाभिव्यक्तीवर भर होता. आता मानवी संस्कार पुसून टाकण्याचा प्रयत्न शिल्पातही चाललेला दिसतो. कलेचे असे अवमानवीकरण करण्याचे प्रयत्न पहिल्या भारतीय त्रैवार्षिक प्रदर्शनातील (दिल्ली, १९६८) अमेरिकन विभागात दिसले.
संदर्भ : 1. Bowness, Alan, Modern Sculpture, London, 1965.
2. Read, Herbert, A Concise History of Modern Sculpture, London, 1964.
कदम, संभाजी
“