आफ्रिकेतील कला : आफ्रिकेच्या विस्तीर्ण प्रदेशात प्राचीन काळापासून कलांच्या अनेक पद्धती व शैली प्रचलित आहेत. पंधराव्या शतकापासून आफ्रिका खंडाशी पश्चिमी वसाहतवाद्यांचा संबंध येऊ लागला होता. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपातील कलाप्रदर्शानांतून मांडलेल्या कलाकृतींमुळे रसिकांना आफ्रिकेतील कलापद्धतींची माहिती होऊ लागली. त्याचप्रमाणे यूरोपीय मिशनरी, व्यापारी, कलारसिक व इतर अधिकारी वर्ग यांनी जमविलेल्या कलाकृती लोकांसमोर मांडण्यात येऊ लागल्या होत्या. परंतु आफ्रिकेतील बऱ्याच उत्कृष्ट कलाकृती रसिकवर्गाला दिसू शकल्या नव्हत्या कारण यूरोपीय वसाहतवाद्यांनी व मिशनऱ्यांनी कित्येक कलावस्तूंची जाळपोळ केली होती तसेच मागासलेल्या लोकांची कला म्हणून सर्वांनी त्या कलेची कुचेष्टा चालविलेली होती. अर्थातच येथील रहिवाशांना आपल्या केलबद्दल न्यूनता वाटू लागली. त्यांतील कित्येक कलाकारांनी आधुनिक कलातंत्रांचा स्वीकार करण्यास सुरुवात केली.

 

आफ्रिकेतील कलाकार आपल्या कलाकृतीत निसर्गातील वस्तूंची तंतोतंत नक्कल करीत नाहीत. त्यांच्या बऱ्यात कलाकृती अप्रतिरूप असून नैसर्गिक आकारांचे विरूपण कित्येक मूर्तींतून झालेले आढळते. यामुळेच पाश्चात्त्य कलाकारांचे लक्ष या कलेकडे वेधले गेले. वस्तूचे वास्तववादी दर्शन घडविण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे उत्स्फूर्त कलानिर्मितीस बाध येतो, अशी तक्रार पाश्चात्त्य कलावंत करीत होते. याउलट निसर्गातील वस्तूंची प्रतिकृती निर्माण करण्याऐवजी त्या वस्तूमुळे स्फुरलेल्या संवेदनांतून जाणवलेले आकार आफ्रिकेतील कलाकारांनी निर्माण केले. त्यांच्या मूर्तीत प्रमाणबद्धता नसते, तर आकारांची लयबद्धता, समतोल, नाट्यमय विरोधाभास व पुनरावृत्ती यांची जाणीव या मूर्तीतून रसिकाला होऊ शकते. पश्चिम आफ्रिका, सहाराचा दक्षिण भाग, पूर्वेकडील सरोवराच्या प्रदेशापासून मध्य आफ्रिका व लगतची पश्चिम किनारपट्टी, उत्तर सूदान व अंगोला आणि ऱ्होडेशियापर्यंतचा प्रदेश हा निग्रो कलेचा परिसर होय. बांटू भाषा बोलणाऱ्या जमाती व टोळ्या याच प्रदेशात असल्यामुळे बांटू कला व निग्रो कला यांचा एकत्रपणे विचार करण्यास हरकत नाही. येथे अनेक जमाती विखुरलेल्या आहेत. प्रत्येक जमातीच्या संस्कृतीत भिन्नता असूनही त्या सर्वांस जोडणारा एक समान सांस्कृतिक दुवा असल्याचे आढळून येते. आफ्रिकेतील निग्रो लोक मागासलेले असून शिकार, मासेमारी, कंदमुळे गोळा करणे, शेती करणे अशा प्रकारच्या उद्योगांत मग्न असतात. घनदाट जंगलमय प्रदेश आणि रोगट व विषम हवामान बऱ्याच प्रदेशात असल्याने कलानिर्मितीस पोषक असे वातावरण येथे आढळत नाही. त्याचप्रमाणे येथील हवामानात कलाकृतीही फार काळ टिकू शकत नाहीत. कुटुंब हा आफ्रिकेच्या समाजातील छोटा घटक असून जमातीचे पुढारी, धर्मगुरू, राजे या सर्वांची धार्मिक, सामाजिक, आर्थिक या सर्व बाबींवर पूर्ण सत्ता असते. धार्मिक श्रद्धा, रूढी व लोकभ्रम ह्यांत गुरफटलेला आफ्रिकेतील कलावंत अशा परिस्थितीत अनेक शतकांपासून कलानिर्मिती करीत आहे.

धार्मिक समारंभात मूर्ती, मुखवटे व कोरीव आकृती यांना महत्त्वाचे स्थान असते. ठराविक आकाराच्या व पद्धतीच्या मूर्तीचा उपयोग ठराविक समारंभासाठीच केला जातो. पेयपात्रे, वाद्ये, पेट्या, मुखवटे, आसने, अंत्यसंस्कार विधींत वापरण्यात येणाऱ्या वस्तू इत्यादींचे आकार व त्यांवरील कोरीव मूर्ती ठराविक पद्धतीनेच करण्याचे बंधन कलाकारावर असते. प्रत्येक जमात व गट यांची स्वतंत्र दैवते असतात. पूर्वजांची मूर्तिशिल्पे बनविण्याची पद्धत त्यांच्यात असून ही मूर्तिशिल्पे व्यक्तिनिष्ठ नसून प्रतीकात्मक असतात. या मूर्ती व मुखवटे यांच्यात देवतांचे व पूर्वजांचे अस्तित्व असते व योग्य प्रसंगी त्या मदत करतात, असे त्यांना वाटते.

आफ्रिकेतील बऱ्याच जमातींत धार्मिक गुप्त संघटनांचे स्थान फार मोठे असते. एखादी धार्मिक, आर्थिक वा राजकीय सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. गुप्तपणे एखाद्या देवतेच्या मूर्तीसमोर अथवा मुखवट्यास साक्ष ठेवून ही सिद्धी प्राप्त करण्याचा समारंभ होतो. या धार्मिक गुप्त संघटनांसाठी मूर्ती व मुखवटे बनविण्यांची जबाबदारी अर्थातच कलाकाराची असते. रोगराई, आजार यांसारख्या गोष्टी दुष्ट शक्तींमुळे होतात. त्यासाठी मंतरलेले ताईत, पक्ष्यांची पिसे, शिंगे, कवड्या या वस्तूंमधील अद्‍भुत सामर्थ्यामुळे त्या शक्तींपासून आपले संरक्षण होईल, अशी या लोकांची भावना असते. यौवनावस्थेत पदार्पण करणाऱ्या तरुणतरुणींसाठी करण्यात येणाऱ्या समारंभाच्या वेळीही अशाच वस्तूंचा वापर करतात. ह्या वस्तू ठेवण्यासाठी छोट्या पेट्या बनविण्याची कामगिरी  कलाकारांचीच असते.

आफ्रिकेतील कलाकारांना समाजात मानाचे स्थान असते. कलाशिक्षण त्यास वडिलांकडून किंवा गुरूकडून मिळते. तेथील रूढींनुसार तो कलाकृती बनवितो. देवतांची व टोळीतील प्रमुखांची अवकृपा होईल, या भीतीमुळे तो मूर्तींचे आकार बदलत नाही. त्यातूनही एखादा कल्पक कलाकार वरील सर्व गोष्टी सांभाळून ह्या पारंपरिक आकारांना भावपूर्ण अशी निराळी घडणही देतो. यूरोपीय वसाहतवाद्यांशी संबंध आल्याने पाश्चात्त्य कलापद्धती आफ्रिकी कलाकारांना परिचित झाल्या. अलीकडे स्वतंत्र झालेल्या आफ्रिकेतील राष्ट्रांत नवीन कलासंस्था निघाल्यामुळे कलाकारांना योजनाबद्ध शिक्षण देण्याचे प्रयत्नही वाढत आहेत.

मूर्तिकला : मूर्तिशिल्प हीच निग्रो आफ्रिकेची प्रमुख कला आहे. ह्या मूर्ती बहुधा लाकडात कोरलेल्या असतात. तथापि हस्तिदंत, ब्राँझ, लोखंड, दगड, माती, शिंगे, हाडे इ. माध्यमांचाही उपयोग त्यांसाठी केला जातो. कधीकधी ह्या शिल्पाकृती रंगवून त्या मणी, माळा, गोंडे किंवा शंख-शिंपल्यांनी सजविण्यात येतात. ह्या मूर्ती बहुधा लहान आकाराच्या असतात परंतु मोठ्या आकाराच्याही मूर्ती काही प्रदेशांत आढळतात. ह्या मूर्तींची घडण, त्यांचे अलंकरण, रूपकात्मकता आणि त्यांचे माहात्म्य या सर्वांचा अर्थ त्या त्या जमातीमधील लोकांनाच कळू शकतो.

आफ्रिकेत निरनिराळ्या कलापद्धती आजपावेतो नांदत असून कलाकारांनी निर्मिलेल्या आकारांची स्फूर्तिस्थाने निसर्गातील वस्तू, प्राणी व मानव हेच आहेत. प्रत्येक टोळीची अथवा जमातीची मूर्ती बनविण्याची शैली स्वतंत्र असते. आफ्रिकेतील या रहिवाशांच्या कलेतील सर्वसाधारण साम्यानुसार येथील कलापद्धतीचे प्रदेशानुरूप पाच प्रमुख वर्ग पाडले जातात. ते असे : (१) सूदान (२) गिनी कोस्ट (३) नायजेरिया (४) कॅमेरून (५) पश्चिम आफ्रिका आणि दक्षिणपर्यंतचा मध्य आफ्रिका.

सहाराच्या दक्षिणेकडील सूदानमधील कलाकार अप्रतिरूप आकार व भौमितिक रचना यांचा वापर करून मूर्ती बनवितात. या मूर्ती उभट आकारांच्या असून मानव आणि प्राणी यांच्या आकारांचे विरूपणही या मूर्तीतून केलेले दिसते. बऱ्याच मूर्तींच्या काही भागांवर आलंकारिक रेखा कोरलेल्या असतात. मानवी रूप एका विशिष्ट शैलीने अभिव्यक्त केले जाते. या शैलीतही उपप्रकार आढळून येतात. मुखवटे बनविताना मानव आणि प्राणी यांच्या आकारांचे एकत्रीकरण येथील कलाकार करतात. काही ठिकाणी सुफलताविधींसाठी वापरण्यात येणाऱ्या मुखवट्यांचे भावदर्शन नैसर्गिक वाटते. याच प्रदेशातील सेकोनी-कुन, डोगोन, मोस्सी, बाम्बारा आणि बागा या जमातींतील कलाकारांच्या कलाकृती उल्लेखनीय आहेत.

गिनी कोस्टमधील कलाकार नैसर्गिक वस्तूंच्या प्रतिकृती बनविण्याचा प्रयत्न करतात. सूदानमधील शिल्पांप्रमाणे अप्रतिरूप आकारांचा वापर काही मूर्तींत केलेला दिसतो. येथील कलाकृतींत मुखवट्यांचे प्रमाण अधिक आहे. प्राण्यांचे अथवा मानवी आकार या मुखवट्यांना दिलेले असतात अथवा त्यांवर कोरलेले असतात. काही मुखवट्यांतून नाट्यमय विरूपतेचे दर्शन घडविले जाते. संपत्ती व सुबत्ता लाभण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मुखवट्यांवर त्यांचे रूपकात्मक आकार कोरलेले असतात. बुंडू किंवा सांडे, पोरो इ. प्रमुख जमातींत अशा कलावस्तू आढळतात.


आयव्हरी कोस्टमधील बौउले कलाकार मूर्ती व मुखवटे तयार करताना वास्तवतेला धरून सुसंबद्ध आकारनिर्मिती करतो. त्याचप्रमाणे मूर्तींचा दर्शनी भाग गुळगुळीत करून त्या भागावर अधिक बारकावे दाखवितो. ठराविक आकारांनी अथवा विशिष्ट पद्धतीचे शिरोवस्त्र खोदून देवता व पितर यांचे इतरांहून वेगळेपण दाखवितात.

गोल्ड कोस्टमधील (हल्लीचा घाना देश) अशांटी कलाकार सोन्याच्या भुकटीचे वजन करण्यासाठी उत्कृष्ट आकारांची ब्राँझची वजने तयार करीत. या भागातील अकुआ-बा जमातीतील स्त्रिया गरोदरपणी प्रसूती सुलभ होऊन सुंदर बालक व्हावे, यासाठी विशिष्ट मूर्ती जवळ बाळगतात.

नायजेरियातील कलाकृतींना आफ्रिकी कलाक्षेत्रात बरेच वरचे स्थान द्यावे लागेल. येथील बेनिन व आयफे कलाकारांची ब्राँझची व मातीची बरीच व्यक्तिशिल्पे सापडली आहेत. यथार्थ व्यक्तिरेखन आणि भावदर्शन यांमुळे ही व्यक्तिशिल्पे उत्कृष्ट मानली जातात. योरूबा कलाकार उपासनेच्या व उपयुक्त वस्तूंना सूचक व चैतन्ययुक्त आकार देतात. काही मूर्तींमध्ये भौमितिक आकारांचा वापर केलेला असून त्यांवर आलंकारिक कोरीवकाम केलेले असते. एकॉय, आयबो आणि आयजो यांच्या लाकडी कलाकृती सुंदर असतात. आग्नेय नायजेरियातील आयबो कलाकारांनी केलेले मुखवटे विलक्षण भावपूर्ण आहेत.

कॅमेरून मूर्तिशिल्पात जोमदार आकारांचा वापर केलेला दिसतो. अनावश्यक बारकावे टाळल्याने व मूर्तीचे पोत खडबडीत ठेवल्याने त्यांना आगळा जिवंतपणा येतो. काहींचे आकार

कॅमेरूनमधील भाल्यासारखे अलंकृत हत्यार

विलक्षण नाट्यमय असून कधीकधी मानवाचे, प्राण्याचे अथवा दोहोंचाही समन्वय केलेले अलंकृत आकार असलेल्या गुळगुळीत पृष्ठभागाच्या मूर्ती आढळून येतात. कॅमेरूनच्या उत्तरेकडील बेकोम कलाकार बैठकीच्या आसनांवर प्राण्यांच्या व माणसांच्या आकृत्या

कॅमेरूनमधील मण्यांचे शिरोभूषण

कोरतात. कित्येकदा ब्राँझचा अथवा पांढऱ्या धातूचा पत्रा ठोकून त्यावर चित्रे कोरतात. त्यांचे मुखवटे कठीण लाकडांचे असून अत्यंत गुळगुळीत केलेले असतात. वुम जमातीत बैठ्या मूर्ती व कोरलेली भांडी सापडतात. बाबेन्गा कलाकार मातीची शीर्षाकारी सुषिरवाद्येही बनवितात. मध्यभागातील बामुम जमातीत मूर्तिकला फारशी प्रगत नाही. हे कलाकार मुखवट्यांना बेडूक, सरडा, साप इ. प्राण्यांचे आकार देतात. मध्यभागातील बान्डुशू, बाटुफाम, बाहाम इ. कलाकारांच्या शिल्पाकृती भव्य असून त्यांत भौमितिक आकारांचा वापर केलेला दिसतो. घरांच्या खांबांवरही हे लोक मूर्ती कोरतात.

गाबाँ प्रदेशातील बाकोटा आणि फँग यांच्या मूर्ती उल्लेखनीय आहेत. बाकोटांच्या मूर्ती विसाव्या शतकातील आधुनिक पाश्च्यात्त्य मूर्तीप्रमाणे अप्रतिरूप आकारांच्या असतात. कमीअधिक वास्तवतेपासून ते घनाकारितेपर्यंतचा प्रत्यय फँग जमातीतील मानवी मूर्तिशिल्पांतून येतो.

काँगोच्या विस्तीर्ण प्रदेशात अनेक शैली दिसतात. काँगो नदीच्या खोऱ्यात मूर्तिशिल्पांचे उत्कृष्ट नमुने सापडतात. उत्तरेकडील भागातील कलाकृतींत भौमितिक व अप्रतिरूप आकारांचा वापर केल्याचे दिसते. दक्षिणेकडील कलाकृती गोंडसपणा, गुळगुळीत घडण व वास्तवता यांमुळे आकर्षक वाटतात. त्याचप्रमाणे मूर्तीच्या इतर भागांकडे दुर्लक्ष करून विशिष्ट भागांवरच बारकावे कोरण्याची पद्धत तेथे दिसून येते. काँगोतील काही प्रदेशांतील मूर्ती अथवा मुखवटे कोणत्याही आंतरिक भावनांचे दर्शन घडवीत नाहीत. लोखंडाची पाती व खिळे ठोकलेल्या लाकडी मूर्ती मध्य काँगोत सापडतात. अशा मूर्ती जवळ बाळगल्यामुळे अंगात दुष्ट प्रवृत्तींचा वास होत नाही, अशी त्या लोकांची समजूत आहे. रूआंडा-ऊरूंडी प्रदेशातील लोक हत्यारे, उपयुक्त वस्तू, दागिने यांना आकर्षक आकार देऊन त्यांवर कलाकुसर कोरतात.

काँगो नदीच्या उगमाजवळील प्रदेशातील वालेगांच्या मूर्ती हस्तिदंताच्या असून त्यांच्या मुखांचा आकार अंतर्गोल असतो. मूर्तीच्या सर्वांगावर अलंकरण-रेखा कोरण्याचीही येथे पद्धत आहे. मध्य काँगोतील बाबोमा कलाकार दगडाच्या मूर्ती करतात. बुशोंगो कलाकारांच्या मूर्ती समतोल आकारांच्या असून त्यांचे डोके मोठे व लांबट असते. बुशोंगो राजघराण्यातील व्यक्तींची व्यक्तिशिल्पे निग्रो कलेत श्रेष्ठ आहेत. पेयपात्रांना दिलेले मानवी आकार अलंकृत असून मोहक आहेत. बाव्हिली जमातीत गुप्त संघटनांसाठी वापरण्यात येणारे मुखवटे शंक्वाकार पायावर बसवितात. काँगो नदीच्या मुखाकडील भागातील मायूम्बे व बोकान्गो कलाकार नैसर्गिक आकाराच्या मूर्ती बनवितात. बसके नाक, जाड ओठ, पुढे आलेली हनुवटी वगैरे वांशिक शारीर वैशिष्ट्ये दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो. उत्कृष्ट शिल्पन केलेले आकार आणि प्रभावी घडण ही बाबेम्बे मूर्तींची प्रमुख अंगे आहेत. बाटेके लोक मूर्तीवर कोरीव रेखन करतात. त्याचप्रमाणे येथे मूर्तींच्या पार्श्वभागी तेजोवलय दाखविण्याची पद्धत दिसते. बाम्बालांच्या मूर्ती काहीशा खडबडील पृष्ठभाग असलेल्या असतात. ढोलके बडविणाऱ्या, लाकडी बाजा वाजविणाऱ्या व घोड्याच्या शेपटीसारखा तुरा असलेली शिरस्त्राणे घातलेल्या अनेक मूर्ती या कलाकारांनी केलेल्या आहेत. पश्चिम काँगोतील बायाका कलाकारांनी मूर्तिशिल्पात यथार्थदर्शन दाखविणारी आपली वेगळीच परंपरा निर्माण केलेली आहे. या मूर्ती प्रभावी व जोरकस असतात. बाकुबा कलाकार कवड्या, शिंपले, मणी, वस्त्रे इत्यादींनी मुखवटे सुशोभित करतात. ह्या जमातीत स्त्रियाही मूर्तिशिल्पे बनवितात.

कासाई नदीपासून काटांगापर्यंतच्या प्रदेशातील बालुबांच्या कलाकृती उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. हे कलाकार मूर्तीचा पृष्ठभाग अतिशय गुळगुळीत करतात. भव्य कपाळ, खोलवर नसलेल मोठे डोळे, छोटे व टोकदार नाक, जाड ओठ. इ. वांशिक शारीर वैशिष्ट्ये त्यांच्या मूर्तीच्या चेहऱ्यात आढळतात. शिल्पाकृतीच्या इतर अवयवांचे विरूपण व अलंकरण केलेले असते. मूर्तीच्या अंगावर रेखनही केलेले दिसते. मुखवट्यांना अप्रतिरूप आकार देऊन त्यांवर रेखा कोरून त्यांत पांढरा रंग भरण्याची पद्धत येथे आहे.

बासोंगोंचे शिल्पाकार काहीसे ओबडधोबड असतात. मूर्तीचे अवयव विरूप असून मान नागमोडी, खांदे रुंद व सपाट, नाभीजवळ टेंगळ्याप्रमाणे उंचवटा आलेले पोट, मोठे व सपाट हातपाय असे एकंदरीत येथील मूर्तीचे ध्यान असते.


यानंतरच्या अंगोलापासून मोझँबीकच्या प्रदेशात फारशी महत्त्वाची कलानिर्मिती आढळत नाही. बाम्बुंडा कलाकार मातीचे किंवा शेणाचे मुखवटे व मूर्ती तयार करतात. केन्यातील किकुयू लोक नृत्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ढालींवर कुलचिन्हे कोरतात. त्याचप्रमाणे येथील अकाम्बा लोक वाद्ये, भांडी, बसण्याची आसने यांवर विविध प्रकारचे अलंकरण करतात. केन्याच्या किनाऱ्यालगतचे वान्यिका लोक थडग्यांवर मानवी आकृत्या किंवा भौमितिक आकार कोरतात. टांगानिका व मोझँबीकमधील वामाबिह व माकोंडे यांच्या मूर्तींचे आकार नैसर्गिक वळणाचे असून काँगोतील कलेशी ते मिळतेजुळते वाटतात. बेनिनच्या ब्राँझमधील मूर्ती पंधराव्या शतकातील असून आयफे यांच्या मातीच्या व  ब्राँझमधील मूर्ती त्या अगोदरच्या असाव्यात.

चित्रकला : निग्रो आफ्रिकेतील दक्षिण व मध्य भागांतील प्राचीन गुहा व निवासस्थानातील भिंतींवर कोरीव आणि रंगविलेली चित्रे आढळतात. ह्या चित्राकृती पन्नास हजार वर्षांपूर्वीच्या असाव्यात, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. उत्तर ऱ्होडेशियातील कलाकृतींच्या रेडिओ-कार्बन पद्धतीने केलेल्या परीक्षणावरून त्या इ. स. पू. ४५००च्या सुमाराच्या असाव्यात, असा अंदाज आहे. नैर्ऋत्य युरोपातील गुहामानवाने काढलेल्या प्राण्यांच्या कलाकृतींशी या आफ्रिकेतील आकृत्यांचे बरेच साम्य आहे. याशिवाय शैलीदार मानवी आकृत्या स्पेनमधील प्रागैतिहासिक कलाकृतींशी जुळतात. ही चित्र तांबड्या किंवा काळ्या रंगात रंगविलेली आहेत. शिकारीचे व युद्धाचे प्रसंग या गुहेतील भित्तिचित्रांत रेखाटलेले आहेत. दक्षिण आफ्रिका, इथिओपिया, उत्तर नायजेरियातील कानो प्रांत व टांगानिकातील कांडोआ जिल्हा या भागांतही गुहाचित्रे सापडतात. चित्रकलेची आवड निग्रो आफ्रिकेतही असून अंगावर रंगीत आकृत्या काढणे, घरांची दारे रंगविणे इ. गोष्टी हे लोक करतात. बांटू व बुशमन लोकही या कलेत तरबेज आहेत.

संगीत : सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकन संगीत हा आदिम संगीताचाच एक प्रकार म्हणून ओळखला जातो. त्यातील साधेपणा, स्वरलेखनाचा अभाव असलेली लोकसंगीतासारखी गानपरंपरा तसेच सामाजिक जीवन, धार्मिक विधी, नृत्य यांच्याशी असणारे त्याचे निकट नाते यांमुळे हे संगीत लक्षणीय ठरले आहे. मात्र इतर आदिम संगीताच्या तुलनेने हे संगीत अधिक संस्कारयुक्त, काही प्रमाणात गुंतागुंतीची स्वररचना असलेले, विविधतापूर्ण व अधिक आस्वाद्य आहे. आफ्रिकन संगीतरचना ह्या बव्हंशी संगीताचे तंत्रशुद्ध, शास्त्रीय ज्ञान नसलेल्या व्यक्तींकडून निर्माण केल्या जातात हे विशेष. अजूनही बरेचसे आफ्रिकन संगीत अभ्यास-आकलनाच्या पैल राहिलेले आहे. अनेक जमाती व प्रादेशिक भिन्नता यांमुळे आफ्रिकन संगीतात बरीचशी विविधता असली, तरी आफ्रिकन निग्रो संगीताची काही सर्वसामान्य वैशिष्ट्ये आहेत: आघातात्मक तालबद्धता, बहुधूनपद्धती वगैरे संगीतघटकांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. आफ्रिकन संगीताने परंपरासिद्ध अशी आपली वैशिष्ट्ये कटाक्षाने जोपासल्याचे दिसते. दुसऱ्या संगीतपद्धतीचा अल्पसा प्रभावच त्यावर आहे. मात्र प्राचीन काळामध्ये उत्तर आफ्रिका, यूरोप, भारत व इंडोनेशिया येथून काही वाद्ये व रचनाप्रकार यांचे लोण आफ्रिकेत पोहोचल्याचे उल्लेख आढळताता. याउलट निग्रो लोकसंगीत, जाझ यांसारख्या प्रकारांवरून आफ्रिकन संगीताचा फार मोठा प्रभाव, विशेषतः विसाव्या शतकात जगावर पडल्याचे दिसून येते.

बरेचसे आफ्रिकन संगीत हे केवळ श्रवणसुखासाठीच नसून ते इतर सांस्कृतिक घटकांशी निगडित असते. कित्येक गाण्यांतून ऐतिहासिक घटनांचे वर्णन व नियतीवर भाष्य असते. काही गाणी वर्षातील उत्सवादी प्रसंगी तसेच व्यक्तिजीवनातील जन्म, यौवनावस्था, विवाह मृत्यू यांसारख्या प्रसंगी म्हटली जातात. विशिष्ट प्रसंगासाठी ठराविक गीत व संगीतरचना ही आफ्रिकन संगीतातील एक लक्षणीय प्रवृत्ती आहे. निग्रो आफ्रिकन संगीतात भावनांची सरळ अभिव्यक्ती व मतप्रकटन यांना महत्त्व असते. परदेशी वसाहतकारांचा निषेध, जमातप्रमुखाची टवाळी हे काही विषय. भाषिक संकेतासाठीही संगीताचा वापर केला जातो. इतर संगीतप्रकारांत व्यवसायगीतांचा समावेश होतो. गाईगुरांच्या स्तुतीसाठी, नौका वल्हविताना, प्रमुख व्यक्तींविषयी आदर व्यक्त करण्यासाठी गाणी म्हटली जातात. इतर आदिम संगीतपरंपरांहून आफ्रिकन संगीताचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे व्यावसायिक संगीतकारांना, विशेषतः वादकांना, विशिष्ट प्रसंगी देण्यात येणारे प्राधान्य. बहुसंख्य आफ्रिकी लोकांना गायनवादनादी कला अवगत असतात.

आफ्रिकन निग्रो जमातींत वाद्यांचे वैपुल्य आहे. सहाराच्या दक्षिणेस अनेक महत्त्वाचे वाद्यप्रकार आढळून येतात. त्यांपैकी ‘झांझे’ (सांस) किंवा ‘थंब पियानो’ यांसारखी वाद्ये आफ्रिकेतच निर्माण झाली असावीत व हार्प अथवा झायलोफोन यांसारखी वाद्ये परदेशातून आली असावीत. झांझे व झायलोफोन ही आफ्रिकेत वाजविली जाणारी खास वैशिष्ट्यपूर्ण वाद्ये होत. ढोलांचा वापर हेही आफ्रिकन संगीतातील आगळे वैशिष्ट्य होय. आफ्रिकेत सुषिरवाद्यप्रकारांपैकी शिंगे (हस्तिदंती, लाकडी तसेच जनावरांची), बासऱ्या, पॅनपाइप इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तंतुवाद्यांमध्ये गजांचे विविध प्रकार, झिथर, हार्प वगैरे प्रचारात आहेत. आघाती वाद्यांचे रॅटल्स, घंटा इ. प्रकार रूढ आहेत. ही आफ्रिकन वाद्ये गीतांच्या साथीत व स्वतंत्रपणे वाजविता येतात. समूहवादनात एकाच जातीची वाद्ये (उदा., पाच ढोल अथवा तीन झायलोफोन) किंवा भिन्न जातींची वाद्ये (हार्प, झांझे, रॅटल्स ही एकत्रितपणे वा शिंग, घंटा, झायलोफोन अशा समूहाने) वाजविण्याच्या पद्धती आहेत.

बऱ्याचशा आफ्रिकन संगीतरचना ‘सोलो’ पद्धतीच्या म्हणजे गायक-वादकांनी व्यक्तिशः सादर करावयाच्या असल्या, तरी संगीतनिर्मितीची एक खास वैशिष्ट्यपूर्ण पद्धती म्हणजे सामूहिक पद्धतीच्या संगीतात प्रमुख गायक व त्याचे साथीदार यांच्यात अथवा दोन समूहांत चालणारी साद-प्रतिसाद पद्धती होय. हा साद-प्रतिसाद गायन व वादन या दोन्ही क्षेत्रांत असतो. उत्तर व दक्षिण अमेरिकेतील निग्रो लोकसंगीतात हा प्रकार विशेषत्वाने आढळतो.

आफ्रिकन संगीताचे तालबद्धता हे सर्वांत लक्षणीय वैशिष्ट्य होय. अनेक गानछंदांच्या मिश्रणातून ही तालबद्धता गुंतागुंतीची बनली आहे. एकाच वेळी अनेक भिन्न भिन्न तालांचा आविष्कार म्हणजे तालबद्ध बहुधूनपद्धती हे आफ्रिकन संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य होय. त्यामानाने सुसंवादी रचनेचा विकास कमी प्रमाणात झाल्याचे जाणवते. भौगोलिक व सांस्कृतिक भिन्नतेनुसार आफ्रिकन संगीताच्या वेगवेगळ्या शैली अस्तित्वात आहेत. ॲ लेन मेरिअमने आपल्या आफ्रिकन म्युझिक या ग्रंथात आफ्रिकन संगीतशैलीचे नॉर्थ-आफ्रिकन, सूदान, द ईस्ट हॉर्न, द वेस्ट कोस्ट, सेंट्रल आफ्रिका, द ईस्ट कोस्ट, द बुशमनहॉर्टेटॉट एरिया असे सात प्रकार केले आहेत.

साधारणतः विसाव्या शतकाच्या मध्यापासून पश्चिमी यूरोपीय व अरबी संगीताचा प्रभाव आफ्रिकन निग्रो संगीतावर पडला आहे. तालबद्धता, बहुधूनपद्धती यांसारख्या संगीतघटकांचे आफ्रिकी गुणधर्म अद्याप टिकून असले, तरी सुसंवादी रचना, स्वरसप्तक पद्धती यांसारख्या त्यांतील अविकसित घटकांवर यूरोपीय-अमेरिकन संगीताचे वर्चस्व जाणवते.

नृत्य : आफ्रिकन जमातींमध्ये नृत्य ही दैनंदिन जीवनातील एक अत्यावश्यक बाब आहे. रोजच्या जीवनातील घटनांचे अत्यंत वास्तव प्रतिबिंब त्यांच्या नृत्यप्रकारांत दिसते. उदा., निलोटिक जमातीत गुरे राखणे, युद्धावर जाणे अशा प्रसंगावर आधारित नृत्ये आहेत. बहुधा आफ्रिकन नृत्य हे धार्मिक विधींवर आधारलेले असते. योरुबा जमातीचे लोक आपापल्या देवदेवतांचे नाट्यीकरण करतात. तसेत विद्युतदेवता, नागदेवता यांचे प्रतीकरूप प्रकटन नर्तक करतात. विशिष्ट मुखवटे वापरून भुताखेतांचे, प्राण्यांचे प्रतीकात्मक आविष्कार नृत्यांतून घडविले जातात. बैल, हत्ती वगैरे प्राण्यांच्या हालचाली नृत्यांमधून व्यक्त केल्या जातात. मृत्यू वा पुनर्जन्म यांचे प्रतीकरूप दर्शन लहान मुले घडवितात. पाऊस, धनधान्यसमृद्धी तसेच शिकार वा युद्ध यांतील यश यांसाठी करावयाच्या प्रार्थना नृत्यद्वारा केल्या जातात. विशिष्ट प्रसंगी स्त्रीपुरुष दोन रांगा करून प्रणयाराधनपर नृत्यमिश्रित मूकनाट्ये सादर करतात.


कनिष्ठ कला :आफ्रिकेतील रहिवासी विणकाम, बुरूडकाम, धातुकाम, काष्ठतक्षण इ. कलांमध्ये कुशल असतात. रूआंडा-ऊरूंडी प्रदेशातील लोक हत्यारे, दागिने, स्वयंपाकाची भांडी इ. वस्तू अलंकृत आकारांनी सजवितात. मातीच्या छोट्या बाहुल्या व खेळणी काँगोत सापडतात. काही भागांत मातीच्या भांड्यांचा गळा बाटलीवजा उभट असतो. मध्य काँगोतील मातीची भांडी गोलाकार असून त्यांचा गळा अरुंद व तोंडे लहान असतात. काँगो व कासाई नद्यांच्या किनारी प्रदेशातील जमातींत मातीच्या भांड्यांना मानवी आकार देऊन ती रंगवितात. पूर्व केन्यातील अकाम्बा कलाकार गोलाकाल तळ असलेल्या भांड्यांवर आपले बोधचिन्ह काढतो अथवा कोरतो. टांगानिकातील लोक भांड्यांवर छोटे छोटे उंचवटे ठेवतात. बान्योरो लोक ग्रॅफाइटच्या भुकटीने भांड्यांवर उत्कृष्ट नक्षीकाम करतात. त्यांच्या भांड्यांचा आकार भोपळ्यासारखा असतो. युगांडा व रूआंडातील कलाकार दोन अथवा अधिक तोंडांची भांडी तयार करतात. बापेडी लोक आपल्या भांड्यांना शहामृगाच्या अंड्याचा आकार देतात.

पश्चिमी कलाक्षेत्रावरील परिणाम :१९०४ च्या सुमारास आफ्रिकन निग्रो कला पॅरिसमधील अनेक कलावंतांच्या दृष्टिपथात आली. सेझान, गोगँ व व्हान गॉख यांच्या चित्रकलेच्या प्रभावाने आफ्रिकन कलेसंबंधीची अभिज्ञता वाढली. त्याचप्रमाणे आफ्रिकी कलेला जागतिक कलासंप्रदायात महत्त्वाचे स्थानही लाभले. विसाव्या शतकातील कलासंप्रदायांशी असलेले आफ्रिकी कलेचे संबंध फ्रेंच रंगभारवाद व घनवाद आणि जर्मन अभिव्यक्तिवाद यांच्या परिशीलनातून स्पष्ट होतात. १९०४-५ मध्ये मॉरिस द व्ह्लामँक याने पॅरिस येथे निग्रो शिल्पकला प्रसृत केली व तदनंतर यूरोपीय कलेतील आदिम प्रवाह अधिकच प्रभावी झाला. आंद्रे दरँ व पिकासो यांनी निग्रो कलेचा विशेष पुरस्कार केला. पिकासोच्या प्रारंभीच्या घनवादी कलेवर आयव्हरी कोस्टमधील मुखवटे व मूर्तिशिल्प यांचा प्रभाव दिसून येतो. आंरी मातीस, ब्राक, मोदील्यानी, कॉन्स्टंटीन ब्रांकूश, लीपशीत्स, किर्खनर इ. कलावंत कमीअधिक प्रमाणात आफ्रिकी कलेने प्रभावित झाले. कोणत्याही कलाविष्कारात मूलभूत असणाऱ्या प्रतिरूपणाच्या व आकृतिबंधाच्या घटकांची जाणीव पुन्हा एकदा प्रकर्षाने निर्माण करण्यात आफ्रिकी कलेचा फार मोठा वाटा आहे. (चित्रपत्रे १०, १७).

पहा : आदिम कला निग्रो कला प्रागैतिहासिक कला.

संदर्भ : 1. Bascom, W. R. &amp Gebauer, Paul, Handbook of West African Art, Milwaukee (Wisconsin), 1953.

2. Bohannan Paul, Artist and Critic in an African Society, London, 1961.

3. Elisofon, Eliot &amp Fagg, William, The Sculpture of Africa, London, 1958.

4. Leiris, Michel &amp Delange, Jacqueline Trans, Ross, Michael, African Art, New York, 1968.

5. Radin, Paul &amp Sweeney, J. J. Ed., African Folktales and Sculpture, New York, 1964.

 

दिवाकर, प्र. वि. इनामदार, श्री. दे.


आफ्रिकेतील कला

पश्चिम आफ्रिकेतील योरुबा व अशांटी जमातींचे काष्ठशिल्प मागे त्यांच्या वस्त्रकलेचा एक नमुना. स्मारकशीर्ष, ब्राँझ माध्यम, बेनिन, नायजेरिया. मूर्तिशिल्प, काष्ठमाध्यम, पश्चिम काँगो, मध्य आफ्रिका. शंखशिपल्यांची आकृती, न्यू हेब्रिडीझ. डोगोन जमातीचे मूर्तिशिल्प, काष्ठमाध्यम, द. आफ्रिका. एक मुखवटा, मध्य काँगो


आफ्रिकेतील कला

यातुमूर्ती : सोंग्ये जमात, लोमामी, काँगो माध्यमे : काष्ठ, ताम्र, लोह, मणी, काळविटाची शिंगे इ. स्त्री-मुखवटा : पुनू जमात, गाबाँ माध्यम : चिनी चिकणमातीने पांढरे केलेले लाकूड. सिंह-मुखवटा : बांबारा जमात, माली रंगीत काष्ठमाध्यम.  स्मारकपूर्ती : न्देन्गेसे जमात, मध्य काँगो रंगीत काष्ठमाध्यम.  प्रसाधन पेटी : कूब्रा जमात, कासाई, मध्य काँगो काष्ठमाध्यम. पळी : सेनुफो जमात, आयव्हरी कोस्ट ब्राँझमाध्यम.  सोंगो कड्याच्या पृष्ठभागावरील रंगीत पाषाण : डोगोन जमात, माली वालुकाश्म माध्यम. मातीचा दिवा : बारिबा जमात, डाहोमी पक्वमृदामाध्यम.  धार्मिक विधीचे मृत्पात्र : अशांटी जमात, घाना पक्वमृदामाध्यम.  बाहुली : न्गवाटो जमात, दक्षिण आफ्रिका माध्यमे : सुकी फळे, मणी, साली, चिंध्या.  मुखवटा : बोझो जमात, माली माध्यमे : रंगीत लाकूड, धातू व काच.  एक मूर्तिशिल्प : व्हीली जमात, काँगोचा मुखाकडील प्रदेश माध्यमे : हस्तिदंत, धातूचे पत्रे, मणी, आरसा.