आब्रूत्सी, ड्यूक ऑफ द : (२९ जानेवारी १८७३ –१८ मार्च १९३३). इटालियन नाविक अधिकारी, गिर्यारोहक व समन्वेषक. जन्म माद्रिद. १८७०-७३ पर्यंत स्पेनचा राजा असलेला ड्यूक ऑफ आओस्टा हा याचा पिता. लेगहॉर्न नाविकशाळेत शिक्षण झाल्यानंतर याला नौदलात भराभर बढती मिळाली. समन्वेषणाच्या आवडीमुळे १८९७ मध्ये याने अलास्कामधील ५,४८६ मी. उंचीचे सेंट इलायस पर्वतशिखर काबीज केले. या शिखरावर गेलेला हा पहिलाच गिर्यारोहक. १८९९ मध्ये उत्तर ध्रुवाच्या शोधार्थ याने ८६,० ३४’ अक्षांशापर्यंत जाऊन नकाशे काढले. आफ्रिकेताल ५,११९ मी. उंचीच्या रूवेनझोरी पर्वतावर जाणारा हा पहिलाच (१९०६). तेथील जुन्या शिखरांना याने मार्गारीटा व ॲलेक्झांड्रा ही नावे दिली. १९०९ मध्ये याने हिमालयाच्या केन्टू शिखरावर ६,९०३ मी. पर्यंत चढण्याचा विक्रम केला. पहिल्या महायुद्धात याने एड्रिॲटिक नौदल विभागाचे आधिपत्य केले होते.
चाफेकर, शं. गं.