आबायडॉस : (१) तुर्कस्तानमधील प्राचीन स्थळ. दार्दानेल्स सामुद्रधुनीच्या अत्यंत अरुंद, मोक्याच्या जागी थ्रेसीयन लोकांनी वसविले. इ. स. पू. सातव्या शतकात मायलीशियनांनी येथे वसाहत केली. इ. स. पू. ४८० मध्ये ग्रीसवरील स्वारीत इराणचा बादशहा सायरस याने होड्यांच्या पुलावरून येथून आपले सैन्य पार केले. मॅसिडॉनचा पाचवा फिलिप याला येथे कडवा प्रतिकार झाला होता. बायझंटिन काळापर्यंत येथे जकात वसूल केली जाई. हीरो आणि लीअँडर या प्रेमिकांची लोककथा येथेच घडली. मायलीटस, इराण, अथेन्स, स्पार्टा, मॅसिडोनिया, रोम, बायझंटिन असे सत्तांतर होत होत अखेर १३५०च्या सुमारास ते तुर्कांच्या हाती आले.

(२) ईजिप्तमधील प्राचीन स्थळ. हे नाईलच्या डाव्या तीरावर, कैरोच्या दक्षिणेस ५४७ किमी. आहे. प्राचीन ईजिप्शियन राजघराण्यातील लोकांची ही दफनभूमी असल्यामुळे, त्या काळी या स्थळाचा संबंध ऑसिरिस देवतेशी लावला गेला. येथे आपले दफन व्हावे, निदान आपली स्मारकशिला येथे असावी असे धार्मिक, श्रद्धाळू ईजिप्शियनांना वाटे. सेटी पहिला व रॅमसीझ दुसरा यांनी येथे थडगी व मंदिरे बांधली. सेटीच्या मंदिरातील भिंतीवर ईजिप्तच्या प्राचीन राजांची महत्त्वाची सचित्र यादी आहे. येथील उत्थितशिल्प व त्यावरील रंग प्रेक्षणीय आहेत.

जोशी, चंद्रहास