आदिनाथ : जैनांचे पहिले तीर्थंकर, वृषभनाथ (किंवा ऋषभनाथ) हे त्यांचे दुसरे नाव, जन्मस्थळ अयोध्यानगरी, मरुदेवी व नाभिराज हे मातापिता. त्यांनी तत्कालीन समाजाला ‘असि’ (शस्त्र), ‘मषि’ (लेखन), ‘कृषि’, ‘विद्या’, ‘शिल्प’ व ‘वाणिज्य’ या सहा व्यवहारांचा उपदेश देऊन मार्गदर्शन केले. आदिनाथ व महावीर यांनीच छेदोपस्थापन नावाच्या (म्हणजे प्राक्तन पापाचे छेदन करण्याकरिता प्रायश्चित्ते घेऊन आत्म्याला आत्यंतिक संयमात स्थापन करणे) तपाला महत्त्व दिले, चक्रवर्ती भरत व वीरशिरोमणी बाहुबली हे त्यांचे प्रसिद्ध पुत्र. वैराग्यप्राप्तीनंतर राज्याचा त्याग करून आदिनाथांनी दीक्षा घेतली व घोर तप केले. केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जैन धर्माचा उपदेश केला. आदिनाथांच्या योगाने जैन धर्म व वैदिक धर्म यांचा विभक्त असलेला सांधा एकरूप होतो. वायु, ब्रह्मांड, अग्नि, विष्णु, मार्कंडेय, कूर्म, लिंग, वराह, स्कंद व भागवत या वैदिक मार्गीय पुराणांमध्ये परमहंस, अवधूत, योगी जटाधारी म्हणून आदिनाथांचा निर्देश आला आहे. कैलास पर्वतावर त्यांना मोक्षप्राप्ती झाली.
पहा : तीर्थंकर.
पाटील, भ. दे.