आदर्शवाद, राजकीय : राजकीय आदर्शवाद व यूटोपिया ह्यांतील भेद ध्यानी घेणे आवश्यक आहे. यूटोपियात केवळ स्वप्नरंजन असते सुखी, तृप्त, परिपूर्ण अशा मानवी समाजाचे केवळ काल्पनिक चित्र त्याच्यात रंगवलेले असते. उलट राजकीय आदर्शवादात जी राजकीय व सामाजिक व्यवस्था आदर्श म्हणून प्रतिपादण्यात आलेली असते, ती वैयक्तिक व सामाजिक कृतीचे साध्य म्हणून स्वीकारण्यात आलेली असते. आदर्श असल्यामुळे ही व्यवस्था जरी संपूर्णपणे व परिपूर्णतेने प्रत्यक्षात उतरविता येणे अशक्य असले, तरी शक्य तितक्या विशुद्ध स्वरूपात तिला प्रत्यक्षात मूर्त करण्याची व्यक्तींची व समाजाची जबाबदारी असते. ही आदर्श व्यवस्था म्हणजे प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या सामाजिक व राजकीय व्यवस्थांचे मूल्यमापन करण्याचा मानदंड असतो ते केवळ स्वच्छंदाने रंगविलेले समाजचित्र नसते. माणसाच्या गरजा, प्रवृत्ती व शक्ती ह्यांची मिळून बनलेली मानवी प्रकृती आणि मानवी परिस्थिती ह्यांना साजेशी अशी ही व्यवस्था आहे, हे दाखवून देण्याचा आदर्शवाद्यांचा प्रयत्न असतो. तिच्यात सहभागी होऊनच व्यक्तींना आपल्या जीवनाचे साफल्य, सार्थकता लाभू शकते, असा ह्या आदर्श व्यवस्थेचा दावा असतो.
राजकीय आदर्शवादाची सुरवात पाश्चात्त्य परंपरेत ⇨प्लेटोपासून झाली, असे म्हणता येईल. प्लेटोच्या म्हणण्याप्रमाणे मानवी व्यक्ती मानवी समाजाची लहान प्रतिकृती असते आणि म्हणून समाजाची घडण व व्यक्तीची घडण ह्यांत मूलगामी साम्य असते. व्यक्तीच्या घडणीत तीन घटक असतात : बुद्धी, सत्त्व आणि वासना. माणसाचे कल्याण कशात असते आणि ते कसे साधावे याचे आकलन बुद्धीला होते हे कल्याण साधण्यासाठी माणसाच्या वासनांचे दमन करण्याचे कार्य सत्त्वाचे असते आणि जे आदेश बुद्धी देते आणि सत्त्व ज्यांची अंमलबजावणी करते, त्या आदेशांचे पालन करणे हे कार्य वासनांचे असते. माणसाच्या आत्म्याचे हे जे तीन घटक आहेत आणि त्यांची विवक्षित कार्ये आहेत, त्यांना अनुसरून समाजातही तीन वर्ग असतात आणि त्यांची विवक्षित कार्य असतात. मानवी श्रेयाचे अंतिम दर्शन ज्यांना घडलेले असते, अशा तत्त्ववेत्त्यांचा खाजगी मालकी नसलेला सत्ताधारी वर्ग. धोरण ठरविणे हे ह्या वर्गाचे कार्य असते. ह्या धोरणाची अंमलबजावणी करणारा सहायकांचा वर्ग असतो आणि हे धोरण पाळणे हे ज्याचे कार्य आहे, असा सर्वसामान्य नागरिकांचा वर्ग असतो. ज्या समाजाचे हे तीन घटक आपापली कार्ये सुसंगतपणे पार पाडीत असतात, तो समाज न्यायावर आधारलेला असतो. असा समाज आदर्श होय. उलट एखाद्या समाजात विविध वर्गांच्या परस्परसंबंधींची व कार्यांची ही सुसंगती जर बिघडलेली असेल, तर तो समाज त्या प्रमाणात भ्रष्ट, विकृत असतो. उदा., जर सत्ता तत्त्ववेत्त्यांच्या हाती न राहता सैनिकांच्या किंवा धनिकांच्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या हाती असेल, तर समाजातील विविध वर्गांच्या श्रेष्ठत्व-कनिष्ठत्वाच्या परस्परसंबंधांची जी स्वाभाविक व योग्य अशी व्यवस्था आहे, तिच्यापासून हा समाज विचलित झालेला असतो. असा समाज न्यायावर आधारलेला नसतो व म्हणून त्यातील व्यक्ती स्वतःचे खरे सुख, कल्याण साधू शकत नाहीत.
आदर्श राज्यव्यवस्थेविषयीच्या ⇨ॲरिस्टॉटलच्या विचारांवर प्लेटोच्या विचारांची गडद छाया आहे. प्लेटोप्रमाणे ॲरिस्टॉटलसुद्धा समाज व्यक्तींचा केवळ समूह नसतो अवयवाचा जिवंत देहाशी जसा संबंध असतो, तसाच व्यक्तीचा समाजाशी सेंद्रिय संबंध असतो, ही भूमिका स्वीकारतो. आदर्श सामाजिक व्यवस्थेत सहभागी होऊनच व्यक्ती स्वतःचे कल्याण साधू शकते. माणसाचे अंतिम व पूर्ण कल्याण कशात असते ह्याचे आकलन बुद्धीला होते व म्हणून बुद्धी हेच मानवी व्यवहाराचे नियमन करणारे तत्त्व असले पाहिजे. बुद्धीने स्वतःच्या इच्छांचे आणि वासनांचे नियमन करणाऱ्या व स्वतःचे कल्याण साधणाऱ्या व्यक्ती सद्गुणी असतात व सद्गुणी व्यक्तींच्या हातात राज्यसत्ता असणे ही आदर्श स्थिती आहे. मग एकाच सद्गुणी व्यक्तीच्या हातात सत्ता असली किंवा अनेकांच्या हाती असली किंवा सर्व नागरिकांच्या हाती असली तरी हरकत नाही. आदर्श राज्याची (व म्हणून सत्ताधाऱ्यांच्या सद्गुणांची व शहाणपणाची) कसोटी ही, की त्यातील कायदे सर्व समाजाच्या हिताचे असतात. पण सत्ताधारी व्यक्ती किंवा वर्ग जर स्वार्थाने स्वतःच्या हितासाठी कायदे करीत असेल, तर ती राज्यव्यवस्था भ्रष्ट असते.
ज्या नगरराज्यांच्या संदर्भात प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ह्यांनी आपले राजकीय आदर्श रेखाटले, ती ग्रीक नगरराज्ये ॲरिस्टॉटलनंतर हळूहळू संपुष्टात आली व प्रथम मॅसिडोनियन साम्राज्यात व नंतर रोमन साम्राज्यात विलीन पावली. राजकीय अनिश्चिततेच्या आणि पुनर्घटनेच्या ह्या काळात राजकीय तत्त्वज्ञानाची पुनर्रचना प्रामुख्याने स्टोइक तत्त्ववेत्त्यांनी केली. माणूस विवेकशील प्राणी आहे व म्हणून सर्व मानव, मानव म्हणून समान आहेत आणि त्यांची प्रतिष्ठा समान आहे, हे स्टोइक विचाराचे मुख्य सूत्र होते. बुद्धीला नैसर्गिक कायद्याचे (नॅचरल लॉ) आकलन होते, माणसामाणसांतील संबंधांची व व्यवहाराची उचित अशी व्यवस्था ह्या नैसर्गिक कायद्यावर आधारलेली असते, ह्या नैसर्गिक कायद्यात न्यायाचे आदर्श तत्त्व मूर्त झालेले असते आणि म्हणून राज्यात प्रचलित असलेले कायदे ह्या नैसर्गिक कायद्याशी सुसंगत असले पाहिजेत, अशी स्टोइक भूमिका होती. ग्रीक नगरराज्यांत सहभागी असलेल्या स्वतंत्र नागरिकाच्या जागी विवेकशील मानवी व्यक्तीची प्रतिष्ठापना स्टोइक तत्त्ववेत्त्यांनी केली, त्याप्रमाणे ग्रीक नगरराज्याच्या जागी जागतिक नगराची, सबंध मानवजातीशी समव्याप्त असणाऱ्या समावेशक समाजाची, स्थापना केली. विवेकशील मानव जागतिक नगराचा नागरिक असतो समग्र मानवजातीचा घटक म्हणून तो स्वतःकडे पाहतो. जागतिक नगराची ही कल्पना स्टोइक तत्त्ववेत्त्यांच्या व त्यांच्या रोमन अनुयायांच्या दृष्टीने काही प्रमाणात रोमन साम्राज्यात मूर्त झाली होती. ह्यामुळे रोमन साम्राज्याचे, बळाने अंकित केलेल्या प्रदेशांचा व वंशांचा समूह, असे पाशवी स्वरूप न राहता त्याला नैतिक अधिष्ठान व दिशा प्राप्त झाली. नैसर्गिक कायद्याचा आदर्श स्वीकारून रोमन कायदेपंडितांनी प्रस्थापित रोमन कायद्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या. विवेक आणि न्याय ह्यांवर आधारलेले सबंध मानवजातीला व्यापणारे एक राज्य, हा आदर्श माणसांच्या जाणिवेत स्थिर झाला.
ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाल्यानंतर राजकीय आदर्शवादाला वेगळे वळण लागले. आध्यात्मिक कल्याण माणसाचे सर्वश्रेष्ठ साध्य आहे, ख्रिस्ती चर्च मानवजातीच्या आध्यात्मिक कल्याणाचा विश्वस्त आहे आणि ऐहिक कल्याण गौण आहे, अशी ख्रिस्ती भूमिका आहे. ‘ईश्वराचे देणे ईश्वराला द्या व सम्राटाचे देणे सम्राटाला द्या,’ ह्या वचनानुसार चर्चचे आध्यात्मिक कल्याणाचे क्षेत्र आणि राज्यव्यवस्थेचे ऐहिक क्षेत्र ह्यांची फारकत करण्यात आली. पण ह्या क्षेत्रांच्या परस्परसंबंधाविषयी दोन भिन्न दृष्टिकोण ख्रिस्ती विचारात आढळतात. ⇨ टॉमस अक्वाय्नसच्या मताप्रमाणे आध्यात्मिक कल्याण ऐहिक कल्याणाला पूरक असते. न्यायाच्या आधारावर समाजात शांती व सुव्यवस्था निर्माण करणे आणि नागरिकांचे ऐहिक कल्याण साधणे, हे राज्यव्यवस्थेचे कार्य आहे. आदर्श राज्यव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करताना अक्वाय्नस ॲरिस्टॉटलच्या मतांचा अनुवाद करतो. म्हणजे आदर्श सामाजिक व्यवस्थेत चर्च आणि राज्यसंस्था ह्या दोहोंनाही स्थान आहे आणि नागरिकांचे ऐहिक कल्याण साधणाऱ्या राज्यसंस्थेचे कार्य माणसांचे आध्यात्मिक कल्याण साधणाऱ्या चर्चच्या कार्याला पोषक आणि साहाय्यक आहे. दुसरा दृष्टिकोण ⇨ सेंट ऑगस्टीनच्या विचारात प्रतिबिंबित झालेला आढळतो. ह्या दृष्टिकोणाप्रमाणे आध्यात्मिक कल्याण ऐहिक कल्याणाला पूरक नाही, त्या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि त्यांच्यातून एकाची निवड करावी लागते. आध्यात्मिक कल्याण साधायला पोषक ठरेल, अशी व्यवस्था निर्माण करणे हे राज्यसंस्थेचे कार्य नव्हे तर समाजात शांती राखणे आणि ऐहिक कल्याणाच्या मागे लागलेल्या आणि आध्यात्मिक कल्याण निवडलेल्या अशा दोन्ही प्रकारांच्या व्यक्तींना ऐहिक जीवनात जे स्वास्थ्य आणि साधनसंपत्ती लाभते ती त्यांना प्राप्त होईल, अशी सार्वजनिक व्यवस्था निर्माण करणे हे राज्यसंस्थेचे कार्य आहे. पण त्याबरोबरच ख्रिस्ती श्रद्धेचे आणि चर्चचे रक्षण करण्याची जबाबदारी राज्यसंस्थेवर आहे, ही गोष्टही काहीशा अनिच्छेने आणि विसंगती पतकरून ऑगस्टीनने स्वीकारली. आदर्श राज्यव्यवस्थेविषयीचा ख्रिस्ती विचार ह्या वैचारिक चौकटीतच विकसित झाला. केवळ ऐहिक बाबींपुरता विचार करायचा, तर विवेकाला प्रतीत होणाऱ्या न्यायाच्या तत्त्वांवर किंवा नैसर्गिक कायद्यांवर आधारलेली राज्यव्यवस्था आदर्श होय, ह्या स्टोइक मतावर हा विचार आधारलेला होता. पण ख्रिस्ती श्रद्धेचे ऐहिक मार्गांनी संरक्षण करणे, उदा., पाखंडी मतांबद्दल शासन करणे, ही जबाबदारीही ख्रिस्ती विचाराने राज्यसंस्थेवर टाकली होती.
ज्या सामाईक व्यवस्थेत सहभागी होऊन प्रत्येक व्यक्तीला आपले हित साधता येते, ती व्यवस्था आदर्श होय आणि अशा व्यवस्थेचे जतन करणे हे राज्यसंस्थेचे कार्य आहे, ही कल्पना आधुनिक काळात व्यक्तिवादाचा उदय झाल्यानंतर मागे पडली. प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे स्वतःचे हित साधायचे असते, ते साधण्याचे स्वातंत्र्य तिला असले पाहिजे, व्यक्तींनी आपापले हित साधण्यासाठी परस्परांशी केलेल्या करारांतून राज्यसंस्था व सामाजिक व्यवस्था निर्माण होते आणि ह्या करारांचे पालन होते हे पहाणे एवढेच राज्यसंस्थेचे कार्य आहे, ही कल्पना दृढ झाली. पण ⇨हेगेलच्या विचारात राजकीय आदर्शवादाचे पुनरुज्जीवन झाले.
हेगेलच्या म्हणण्याप्रमाणे कल्पनेने आदर्श निर्माण करून तो वस्तुस्थितीवर लादायचा नसतो. जे वास्तव असते, ते विवेकशील असते हा त्याचा सिद्धांत होता. तेव्हा वास्तवाची विवेकशीलता समजून घेणे, म्हणजे वास्तवात मूर्त झालेला आदर्श समजून घेणे, हे तत्त्वज्ञानाचे कार्य आहे. संकल्प म्हणजे उद्दिष्टांची सुसंगत व्यवस्था हे विवेकाचे रूप आहे आणि हा संकल्प, म्हणजे सुसंगत उद्दिष्टांची व्यवस्था समाजजीवनात मूर्त झालेली असते आणि ह्या सामाजिक जीवनात सहभागी होऊन व्यक्ती ही उद्दिष्टे साधते उदा., कुटुंब ह्या संस्थेत कुटुंबियांची समान उद्दिष्टे मूर्त झालेली असतात व कुटुंबाचा एक घटक म्हणून कुटुंबाशी तादात्म्य पावून जगण्याने व्यक्तीला आपल्या साफल्याचा प्रत्यय येतो. पण आर्थिक आवश्यकतेमुळे व्यक्तींना कुटुंबाबाहेरील व्यक्तींशी देवाणघेवाणीचे संबंध जोडावे लागतात आणि ह्या सर्व व्यक्तींच्या वैयक्तिक हितांचे रक्षण करण्यासाठी ह्या व्यवहाराचे नियमन करणारे कायदे व त्यांची अंमलबजावणी करणारे तटस्थ सरकार अस्तित्वात येते. ही नागरिक व्यवस्था होय. पण ह्या क्षेत्रात व्यक्तींचे हित स्वार्थी असते, त्यांचे इतर व्यक्तीशी असलेले संबंध नकारी असतात म्हणजे एकाचे हित दुसऱ्याच्या हिताशी विरोधी असते व त्याला छेद देते. परस्परविरोधाचे निराकरण करून एकात्म, सुसंगत व्यवस्था प्रस्थापित करणे हे विवेकाचे स्वरूप आहे. कौटुंबिक जीवनातील एकात्मता व समरसता आणि नागरिक जीवनातील भेद ह्यांचा समन्वय राज्य ह्या संस्थेत होतो. व्यक्ती राज्याशी तादात्म्य पावते, त्याची उद्दिष्टे स्वतःची उद्दिष्टे म्हणून स्वीकारते, राज्यातील तिच्या स्थानाशी निगडित असलेली कर्तव्ये पार पाडण्यात स्वतःचे हित पाहते. राज्याचे स्वरूप असे असते व म्हणून राज्य विवेकशील असते कारण त्याच्यात व्यक्तींच्या हिताचा, एकात्मतेचा आणि भेदांचा सुसंगत समन्वय झालेला असतो. राज्याची एकात्मता राज्याचा प्रमुख असलेल्या राजात आणि त्याच्या संविधानात मूर्त झालेली असतेपण हे संविधान कोणी बनवलेले नसते, राज्याच्या जीवनातून ते स्वाभाविकपणे उदयाला आलेले असते. नागरिक व्यवस्थेतील जमीनदार, व्यापारी इ. वर्ग ह्या संविधानाचे घटक असतात.
पण⇨ मार्क्सच्या म्हणण्याप्रमाणे ह्या वर्गांतील परस्परविरोध इतके मूलगामी असतात, की त्यांचा समन्वय करणे अशक्य असते. राज्यसंस्थेचे कार्य राज्याची एकात्मता साकार व सावयव करणे हे नसते. राज्य आणि त्याचे सरकार ही पिळणाऱ्या वर्गाने पिळल्या जाणाऱ्या वर्गाच्या विरोधाला दडपण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा असते. वर्गविहीन समाजरचनेत राज्य ही संस्थाच नष्ट होईल. अशा समाजात सर्व व्यक्तींच्या हिताचा समन्वय साधलेला असेल व समाज आदर्श असेल, पण त्याला राज्याचे रूप असणार नाही. उलट टी. एच्. ग्रीन वगैरे आदर्शवाद्यांनी हेगेलच्या राज्यविषयक विचारांची चौकट स्वीकारून राज्यसंस्थेत सर्व व्यक्तींच्या हिताचा समन्वय प्रत्यक्ष साधणे व हेगेलने रेखाटलेल्या आदर्शाला अधिकाधिक पूर्णतेने प्रत्यक्षात उतरविणे हे आजचे ऐतिहासिक कार्य आहे, ही भूमिका स्वीकारली.
प्लेटोचा व विशेषतः हेगेलचा आदर्श राज्यवाद यांच्यातच आधुनिक फॅसिस्ट, नाझी वा कम्युनिस्ट हुकूमशाहीची बीजे वा प्रेरणा आहेत, असे अनेक राजकीय विचारवंतांचे म्हणणे आहे. परंतु हेगेलच्या मते धर्म, तत्त्वज्ञान व कला हे राज्यसत्तेच्या नियंत्रणापासून मुक्त असे स्वातंत्र्याचे क्षेत्र होय. परंतु आधुनिक हुकूमशाही राज्यांच्या विचारसरणीत धर्म, तत्त्वज्ञान व कला ही नियंत्रणमुक्त असे स्वातंत्र्याचे क्षेत्र म्हणून मान्य नाही.
समाज ही सावयव वस्तू असून व्यक्ती ह्या समाजाचे अवयव होत, असे प्लेटो, ॲरिस्टॉटल व हेगेल हे मानतात. हा सावयवतेचा सिद्धांत मान्य केला, म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क आपोआप अमान्य ठरतो. हुकूमशाहीत व्यक्तींच्या हक्कांची कल्पना नसते, राज्याचा हुकूम किंवा कायदा हा समाजाच्या सामुदायिक हितसंबंधांच्या कल्पनेवर आधारलेला असतो. व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हे तत्त्व त्यात उपेक्षिले जाते, नाकारलेले असते सामुदायिक हिताच्या सबबीवर व्यक्तींचा वा व्यक्तींच्या हिताचा बळी दिला जातो. प्लेटो, ॲरिस्टॉटल वा हेगेल यांच्या विचारसरणीप्रमाणे सामुदायिक हितसंबंधांशी सुसंगत जीवन जगणाऱ्या व्यक्तींचा विकास अपरिहार्यपणे होतोच असे म्हणता आले, तरी राज्याचे व्यक्तिमत्त्वाच्या विकासावरील लक्ष सावयवत्वाच्या कल्पेनेमुळे ढळते किंवा उपेक्षिले जाते, ही गोष्ट मानावीच लागते.
आधुनिक काळात मानवांच्या नैसर्गिक मूलभूत हक्कांवर आधारलेल्या उदारमतवादी लोकशाही राज्याचे तत्त्व हासुद्धा एक राजकीय आदर्शवादच आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुभाव हे हक्क अबाधितपणे वाढीस लावणे व त्यांच्या योगे व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा अधिकाधिक विकास साधणे, हा उदारमतवादी लोकशाहीचा आदर्श होय. या आदर्शाच्या मुळाशी समाज ही सावयव वस्तू आहे असे गृहीत धरलेले नसते समाज हा व्यक्तींचाच बनलेला असून व्यक्तींचे जास्तीत जास्त हित साधण्याकरिता व वरील मानवी हक्कांच्या जोपासनेकरिता व वाढीकरिता लोकशाही राज्याची स्थापना करणे आवश्यक ठरते.
पहा : यूटोपिया.
संदर्भ : 1. Hutchins, R. M. Ed. Great Books of the Western World : Vols. 7 and 46. Chicago, 1952.
2. Roy, M. N., New Humanism, Calcutta, 1961.
रेगे, मे. पुं.
“