आत्मा : या शब्दाचे चार अर्थ होतात : (१) प्रत्येक जिवंत व्यक्तीच्या अंतर्यामी राहून तिच्या सर्व जीवनव्यापारांचे नियंत्रण करणारी देहभिन्न सूक्ष्म सद्वस्तू. मृत्युसमयी ही स्थूल देहाला सोडून जाते. (२) एकामागून एक असे अनेक अनुभव आपणास येत असतात. त्यांना आश्रयभूत असणारे स्थिर द्रव्य म्हणजे आत्मा. लहानपणी प्राथमिक शाळेत गेलेला तो मी आज कॉलेजमध्ये शिकत आहे, असा तादात्म्य प्रत्यय येतो, या प्रत्ययाचा विषय आत्मा. जी लेखणी मी पाहतो, तिलाच मी स्पर्श करीत आहे हे भिन्न अनुभवांतील ऐक्य संपादण्याचे कार्य आत्म्याकडून होते. (३)’मी ज्ञानी आहे’, ‘मी सुखी आहे’, ‘मी दुःखी आहे’ इ. ठिकाणी ‘मी’ अथवा ‘अहं’ म्हणून ज्याचा प्रत्यय येतो तो आत्मा. (४) जो स्वतःच्या ज्ञानाचा विषय होत नाही तो केवल-प्रमाता म्हणजे आत्मा. घटादी पदार्थांच्या ज्ञानाप्रमाणे त्याचे ज्ञान निर्माण होत नाही वा तसे ज्ञान होण्याची गरज नाही कारण तो स्वयंप्रकाश आहे.
पहा : आत्ममीमांसा
दीक्षित, श्री. ह.