आत्मपरित्राण : शरीरधारणा हे जीवात्म्याचे बंधन आहे. पापाचे आणि दुःखाचे त्याला बंधन आहे. या बंधनातून सुटण्याची ज्या जीवात्म्यांना आर्त इच्छा होते, त्यांनी प्रयत्‍न केल्यास व तो प्रयत्‍न सर्व शक्ती एकवटून केल्यास, ते मानवी जीवात्मे मुक्त होऊ शकतात, असा जगातील उच्च धर्मांचा एक सिद्धांत आहे. यहुदी, ख्रिस्ती, हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम या धर्मांमध्ये हा सिद्धांत गृहीत धरला आहे.  जॉन कॅल्व्हिनसारख्या कित्येक धर्माचार्यांच्या मते, केवळ ईश्वरी कृपेमुळेच काही जीवात्मे मुक्त होतात.

जे धर्म सर्वज्ञ व सर्वसत्ताधीश परमेश्वर मानतात, त्या धर्मांच्या सिद्धांतांप्रमाणे ईश्वरास सर्वभावे शरण जाणे आणि धर्मात सांगितलेले प्रमुख विधिनिषेध निष्काम बुद्धीने पाळणे, हा मोक्षमार्ग होय.  मोक्ष  म्हणजे देहाच्या बंधनातून जीवाची कायम सुटका, आत्म्याची शुद्ध स्थिती वा ईश्वराचे अनंतकालपर्यंत प्राप्त होणारे सांनिध्य व त्याचा साक्षात्कार होय. जीवात्मा व ईश्वर हे भिन्न आहेत, असे यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम व हिंदू या धर्मांतील द्वैती मानतात. त्यांच्या मते हे सांनिध्य प्राप्त झाले, तरी ईश्वराशी एकरूपता प्राप्त होत नाही. जीवात्मा हा ईश्वराचा अंश आहे, असे जे हिंदू मानतात, त्यांच्या मताने जीवात्मा ईश्वराशी एकरूप होतो ही एकरूपता म्हणजे एक प्रकारचे सांनिध्यच होय. परमेश्वर मानणारे सर्व धर्म ईश्वरास तारक समजतात ईश्वर भक्तास पापातून तारतो असे, हे धर्म मानतात.

बौद्ध व जैन हे धर्म, परमेश्वर म्हणजे सृष्टिकर्ता आहे, असे मानत नाहीत परंतु मनुष्यशरीर धारण करणारा जीवात्मा स्वतःच्या प्रयत्‍नाने कर्मबंध तोडू शकतो व पापातून आणि दुःखातून मुक्त होतो, असे मानतात. या प्रयत्‍नात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या व्रतांचे निरपवाद पालन करावे लागते. ध्यान, धारणा व समाधी यांच्या योगाने शुद्धज्ञान प्राप्त झाल्याने अखेर बंधातून मोक्ष प्राप्त होतो. 

संदर्भ : 1. Braden, C. S. Man’s Quest for Salvation, 1941.

         2. Parker, J. W. The Idea of Salvation in the World’s Religions, London. 1935

जोशी, लक्ष्मणशास्त्री