हृदयविकार : शरीराच्या सर्व ऊतकांना जिवंत ठेवण्यासाठी रक्त पुरविणाऱ्या हृदय या इंद्रियाची कार्यक्षमता सदैव टिकून राहणे अत्यावश्यक असते. हृदयविकार ही संज्ञा सामान्यपणे हृद् रोहिणीतील अवरोधामुळे निर्माण होणाऱ्या वेदनाजनक व अनेकदा मृत्यूकडे नेणाऱ्या परिस्थितीसाठी वापरली जाते. या कारणांमुळे सामान्य माणसाच्या मनात सतत एक प्रकारची धास्ती (हृदयाच्या विकारांबद्दल) असते; परंतु हृदयाचे विकार विविध प्रकारचे असतात. ते प्रत्येक वेळीच गंभीर नसतात; थोड्या प्रयत्नाने ते टाळताही येतात. 

हृदयविकाराचे वर्गीकरण शारीरीय रचनेनुसार पुढील प्रकारांत करता येते : (१) अंतःस्तराचे, (२) हृदयाच्या झडपांचे, (३) हृद्स्नायूंचे, (४) परिहृदयाचे, (५) आवेगवाहक ऊतकांचे, (६) हृद् रोहिणीचे, (७) उपजत दोषजन्य. 

कोणत्याही प्रकारचा विकार असला तरी त्याचा परिणाम कमी-अधिक प्रमाणात हृदयाच्या कार्यक्षमतेवर होतो. आसपासच्या विद्युत् क्षेत्रात तो प्रतीत होतो. त्यामुळे सामान्यतः हृदयाच्या ध्वनीचे स्टेथॉस्कोपने परीक्षण, रक्तदाबाचे मापन, विद्युत् हृल्लेखन, मनगटातील नाडीचे परीक्षण ( वेग, नियमितता, लय इ.) या प्राथमिक चाचण्या नेहमी केल्या जातात. रुग्णास जाणविणाऱ्या लक्षणांपैकी धाप लागणे, छातीत धडधडणे, छातीत दुखणे, विशेषतः डाव्या बाजूस प्रारंभ होऊन वेदना डाव्या खांद्यात व करंगळीपर्यंत हातात पसरणे, विश्रांत स्थितीत खूप घाम येणे, एकाएकी शुद्ध हरपणे किंवा कोसळून पडणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे यांची सविस्तर माहिती घेतली जाते. विकाराची नक्की जागा आणि गांभीर्य समजून घेण्यासाठी पुढील प्रगत परीक्षणे उपलब्ध आहेत : रक्तातील वसा द्रव्याची पातळी मोजून रक्तवाहिनी काठिण्याची शक्यता आजमावणे, हृदयाच्या प्रत्येक कप्प्यातील रक्तदाब व कार्यक्षमता यांचे परीक्षण करण्यासाठी ध्वनिहृल्लेखन, डॉप्लर परीक्षण, छातीला पट्टा बांधून ( होल्टर) २४ तास हृल्लेखन, हृद् रोहिणीलेखन, हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या नलिकेच्या मदतीने सुषिरी (कॅथेटर) प्रवेशन, रक्तामधील क्लथन प्रक्रियेत सहभागी घटकांचे मापन, हृदयाच्या ऊतकास इजा झाली असल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या किंवा संबंधित विकारादी घटकांचे रक्तातील प्रमाण इत्यादी. या क्षेत्रातील संशोधनातून निदानास व प्रगतीच्या मापनासाठी उपयुक्त असे नवीन घटक व नवीन तंत्रे पुढे येत आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी आणि तिची परिणामकता वाढविण्यासाठी अचूक निर्णय घेणे सुलभ होत आहे. 

अंतःस्तराचे विकार : हृदयाच्या चार कप्प्यांना आतून अस्तरा-सारखे असलेले आणि झडपांच्या पृष्ठभागावरील अंतःस्तराचे आवरण गुळगुळीत असल्याने रक्तप्रवाह त्यावरून विना अवरोध आणि क्लथनन होता वाहत असतो. बालवयात सांधे सुजून ताप येण्याच्या विकारामुळे (संधितापामुळे) किंवा प्रौढांमध्ये शरीरात अन्यत्र असलेल्या सूक्ष्मजीवांच्या संक्रामणामुळे अंतस्तराचा शोथ होऊ शकतो. सूक्ष्मजंतू शरीरभर पसरलेले असतात. अंतःस्तरावर आधीच झालेल्या किरकोळ क्षतांवर किंवा झडपांवर येऊन काही जंतू तेथे वाढू लागतात. रक्तातील काही क्लथनकारी घटक आणि सूक्ष्मजीव यांच्या संयोगाने निर्माण झालेली अगदी सूक्ष्म अशी वाढ नंतर मोठ्या आकाराची होते. कधीकधी त्यामुळे अल्पतीव्र जंतुजन्य अंतःस्तरशोथ ही स्थिती निर्माण होते. या वाढीमुळे एकतर हृदयाच्या कप्प्यांमध्ये किंवा महारोहिणीत रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो किंवा वाढीचा एखादा भाग निसटून रक्तप्रवाहात अंतर्कीलन निर्माण करतो; तो मेंदू, फुप्फुसे किंवा अन्यत्र जाऊन अडकल्यामुळे त्वरित गंभीर परिणाम घडू शकतो. 

अशाच प्रकारचा अंतःस्तरशोथ कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर, कर्करोगा-मध्ये, कृत्रिम अवयवांच्या आरोपणानंतर किंवा अस्वच्छ सुईने अंतःक्षेपण घेणाऱ्या व्यसनासक्त व्यक्तीमध्येही होऊ शकतो. प्रतिजैविकांच्या शोधानंतर संधितापाचे प्रमाण आता कमी झाले, तसेच वेळच्या वेळी निदान होऊन उपचार झाल्यामुळे जंतुजन्य अंतःस्तरशोथ व त्यातून उद्भवणारी गुंतागुंत टाळणे शक्य झाले आहे. जवळजवळ सर्वच शल्यकर्मांमध्ये यासाठी प्रतिजैविकांच्या प्रतिबंधक मात्रा दिल्या जातात. 

हृदयाच्या झडपांचे विकार : हे मुख्यतः दोन प्रकारचेअसतात : (अ) झडप असलेला मार्ग संकोचनाने अरुंद होऊन रक्तप्रवाहात अडथळा येणे आणि (आ) झडप व्यवस्थित बंद होत नसल्याने पुढे गेलेले रक्त त्यावरील दाब कमी झाल्यावर – म्हणजे अलिंद किंवा निलयाच्या शिथिलन अवस्थेत – अंशतः परत येणे. 

विकारग्रस्ततेचे प्रमाण सर्वांत अधिक डाव्या अलिंद-निलय मार्गातील द्विदल झडप आणि डाव्या निलयातून महारोहिणीत जाणाऱ्या महारोहिणी-झडप यांमध्ये आढळते. अंतःस्तराच्या विकारांप्रमाणेच झडपांचे विकार संधितापातून उद्भवू शकतात. हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतरचा तो एक संभाव्य दुष्परिणामही असू शकतो. वृद्धावस्थेत झडपेच्या दलांवर कॅल्शियमाचा थर बसणे, ऊतकांचे शिथिलीकरण होऊन त्यांचा चिवटपणा किंवा स्थितिस्थापकत्व कमी होऊन झडप ओघळणे आणि उपजत दोष ही हृदयविकाराची इतर कारणे आहेत. 

दोषांचे प्राथमिक निदान किंवा दोष असण्याची शंका छाती तपासताना हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजातील बदलावरून केली जाते. सुस्पष्टपणे ऐकू येणाऱ्या दोन ठोक्यांबरोबरच एक अनैसर्गिक आवाज ऐकू येतो. हा ध्वनी छातीच्या कोणत्या भागात सर्वांत अधिक आहे आणि त्याचे हृदयाच्या आकुंचन-प्रसरण चक्रातील स्थान कोणते यावरून कोणत्या झडपेत दोष आहे, याचा अंदाज येतो. सर्वच मर्मरध्वनी झडपांचे दोष दाखवितात असे नाही. 

झडपेच्या दोषामुळे तिच्या अलीकडील क्षेत्रात रक्त साचून त्या कप्प्याचा आकार वाढू लागतो. त्याची कार्यक्षमता कमी होऊन लक्षणे निर्माण होतात. आवश्यक तेव्हा झडपेची दुरुस्ती शस्त्रक्रियेने करता येते. क्षतिग्रस्ततेसाठी कधीकधी कृत्रिम झडपेचे आरोपण करून कार्यक्षमता सुधारणे आवश्यक ठरते.


हृद्स्नायूंचे विकार : हृद्स्नायूंमध्ये घडून येणाऱ्या ठोस बदलांनुसार पुढील प्रकारचे विकार संभवतात. (१) हृदयाचे विस्फारण घडविणारे संचयी विकार : यात दोन्ही निलयांमध्ये रक्त साठत असल्याने त्यांचा आकार वाढतो. संधिवात, मधुमेह, अवटु-न्यूनता, पूर्वी झालेले विषाणु-संक्रामण, हृद् रोहिणी विकार, मादक द्रव्यांचे सेवन, रक्तदाब व मद्यासक्तता यांसारख्या विविध कारणांनी हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्याने रक्ताचा संचय झालेला आढळतो. क्ष-चित्रणात हृदयाचा आकार वाढलेला दिसतो व फुप्फुसीय रक्तवाहिन्यांमध्येही रक्तसंचय आढळतो. 

(२) स्नायूची अतिपुष्टता करणारे विकार : रक्तक्षेपणाचा भार वाढल्यामुळे असा फरक होऊ शकतो. उदा., उच्च रक्तदाब, महारोहिणी झडपेचे आकुंचन. मुख्यतः डाव्या निलयात हा फरक अधिक जाणवतो. पोष ग्रंथीच्या दोषामुळे निर्माण झालेली अतिवृद्धी असलेल्या व्यक्तींमध्येही हा विकार दिसतो. कौटुंबिक इतिहासात इतर व्यक्तींमध्ये अशीच स्थिती सापडण्याची शक्यता दिसते. 

(३) हृदयाच्या कप्प्याची क्षमता हलकेहलके कमी करणारे (क्षमता र्‍हासकारी) विकार : हा मुख्यतः हृद्स्नायूंच्या सर्वांत आतील स्तराचा विकारगट असतो. ॲलर्जीजन्य किंवा इतर प्रतिक्रिया निर्माण होऊन या स्तरात तंतुमय ऊतकांची निर्मिती होते. तसेच त्यालगत रक्तक्लथन होऊन घनास्र निर्माण होऊन हळूहळू कप्प्यांचा अधिकाधिक भाग व्यापला जातो. त्यामुळे हृदयाची विशेषतः निलयाची क्षमता घटत जाते. या शोथ प्रक्रियेचे नक्की कारण निश्चित करणे कठीण आहे. लफ्लरच्या विकारात फुप्फुसाच्या ऊतकात रक्तानुरागी कोशिकाधिक्य आढळते. दक्षिण भारतात क्षमता र्‍हासकारी विकाराचे प्रमाण अधिक दिसते. 

(४) आवक मर्यादाकारक विकार : या दुर्मिळ प्रकारात निलयाची आकुंचनशक्ती अबाधित असते; परंतु स्नायूच्या अंतःस्तराचा भाग कडक झालेला असतो. त्यामुळे शिथिलन कमी होऊन रक्ताची आवक कमी होते आणि निलय पूर्ण भरण्याआधीच ते आकुंचन पावू लागते. या विकाराचे कारण पिष्टाभ र्‍हास किंवा लफ्लरच्या विकाराची पूर्वावस्था असे असू शकते. काही रुग्णांत कारण अज्ञातच असते. 

परिहृदयशोथ : परिहृदयाच्या दोन स्तरांमध्ये जंतुसंक्रामण किंवा विषाणुसंक्रामण झाल्यास त्याचा शोथ होऊ शकतो. त्यातील द्रवाचे स्वरूप बदलल्याने आणि द्रवाचा संचय झाल्याने हृदयाच्या हालचालीस बाधा येते. दीर्घकालिक संक्रामण (उदा., क्षयरोग) किंवा कर्करोगाचे आक्रमण, किरणोत्सारी उपचार, महारोहिणीच्या फुगवट्यातून रक्त झिरपणे व हृदयविकाराच्या झटक्यानंतर स्नायूंमध्ये निर्माण झालेले दोष या कारणांनीही या पोकळीत द्रव साठू शकतो. या द्रवामुळे किंवा शोथामुळे खोकला, झोपल्यावर छातीत दुखणे, बारीक ताप आणि छातीत दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे उद्भवतात. तीव्र शोथाचे रूपांतर दीर्घकालिक शोथात झाल्यास स्तरात तंतुल ऊतक निर्माण होतो व स्तर जाड होतो. थकवा, धाप लागणे, खोकला व पाय सुजणे अशी लक्षणे हृदयाच्या हालचालीवर मर्यादा पडल्यामुळे निर्माण होतात. शस्त्रक्रियेने पटलाचा बराचसा भाग काढून उपचार करतात. तीव्र शोथावर प्रतिजैविके, शोथरोधक औषधे आणि आवश्यक तर सुईने द्रव काढून टाकणे असे उपचार करून हृदयाची कार्यक्षमता सुधारता येते. [→ परिहृदयशोथ].

आवेगवाहक ऊतकातील दोष : हृदयाचे नैसर्गिक स्पंदन महानीलांच्या मीलनातून निर्माण होणाऱ्या कोटराच्या अलिंदाशी होणाऱ्या संयोगामध्ये असलेल्या कोटर-अलिंद पर्व या विशेष ऊतकातून निर्माण झालेल्या आवेगांमुळे होत असते. या स्वयंप्रेरित ऊतकाच्या कार्यावर अनुकंपी व परानुकंपी अशा दोन्ही तंत्रिका तंत्रांचे नियंत्रण असते. तसेच रक्तातील ॲड्रेनॅलीन व तत्सम पदार्थ, अवटू ग्रंथींचे थायरॉक्सीन संप्रेरक यांचाही परिणाम होत असतो. या नैसर्गिक स्पंदनित्राच्या (गतिकारकाच्या) नियंत्रणाखाली असलेले अलिंद-निलय पर्व, हिस तंतुगुच्छ व त्याच्या डाव्या-उजव्या शाखा आणि हृदयाचे स्नायूयांना स्वतःची आवेगनिर्मितीची क्षमता असते; परंतु ती कोटराच्या आवेगांच्या गैरहजेरीतच प्रकट होऊ शकते. तसेच हृदयविकारामुळे अल्परक्तता निर्माण झाल्यास अनैसर्गिक स्थानांपासून आवेग निर्माण होऊन त्यामुळेही हृदयाची तालबद्धता बिघडू शकते. 

हृदयातील विद्युत् वाहक ऊतकांची रचना : (१) उजवे अलिंद (कर्णिका), (२) डावे अलिंद, (३) उजवे निलय (जवनिका), (४) डावे निलय, (५) हिस तंतुगुच्छ, (६) हिस गुच्छाची डावी शाखा, (७) हिस गुच्छाची उजवी शाखा, (८) अलिंद-निलय पर्व, (९) कोटर-अलिंद पर्व.

तालबद्धतेमधील दोषांमुळे व्यक्तीस डाव्या कुशीवर निजले असता आपल्या हृदयाच्या ठोक्यांची जाणीव होऊ शकते. छातीत धडधडणे, डोळ्यापुढे अंधारी येणे व अचानक शुद्ध हरपणे यांसारखे लक्ष वेधून घेणारे परिणाम होऊ शकतात, परंतु सौम्य दोषांमुळे कधीकधी काहीही जाणवत नाही. नित्याच्या किंवा शल्यचिकित्सेपूर्वी केलेल्या वैद्यकीय तपासणीत हे दोष उघड होतात. हृदयातील आवेगांच्या निर्मितीत किंवा वहनात दोष निर्माण झाल्यामुळे पुढील प्रकारचे लक्षण समुच्चय ( संलक्षणे) उद्भवू शकतात : 

(१) अस्वस्थ कोटर संलक्षण : वृद्ध व्यक्तींमध्ये नैसर्गिक गतिकारकातून आवेगांची निर्मिती दोषमय असते. उदा., वेग कमी होणे (कोटर हृद्मंदता) दीर्घ काळ मंदगती नंतर अचानक अलिंदातून निर्माण झालेले द्रुत आवेग (मंदद्रुत संलक्षण) काही काळ टिकणे कोटर व अलिंद यांमध्ये रोध निर्माण होऊन खालच्या पातळीवरील गतिकारकाकडे ताबा जाणे (कोटर स्थगन). या सर्व प्रकारांमध्ये रुग्णाला दमल्यासारखे वाटते, अशक्तपणा जाणवतो व कधीकधी घेरी येते. 

(२) अलिंदातून अस्थानी ठोके पाडणारी आवेग निर्मिती, ॲड्रेनॅलिनासारखा परिणाम घडविणारी औषधे किंवा मद्यपान यामुळे याचा उद्भव होतो. त्यामुळे काहीही गंभीर परिणाम होत नाहीत. 

(३) संवेगी अलिंदजन्य हृद्द्रुतता : अलिंदातून १६०–२०० प्रतिमिनिट या वेगाने आवेग निर्मिती होते. हे आवेग नेहमीचा मार्ग सोडूनअन्य मार्गाने निलयाकडे जाऊन त्यांचे आकुंचन घडवितात. यामुळे निर्माण होणारी धडधड धोकादायक नसली तरी मनोस्वास्थ्य बिघडविते. थोडा अशक्तपणा जाणवतो. 


(४) अलिंद आस्फारण व विकंपन : अत्यंत जलद गतीने अलिंद आकुंचन पावते, परंतु ठोके नियमित असतात. सर्वच आवेग निलयापर्यंत पोहोचविणे तंतुगुच्छास शक्य नसते. त्यामुळे दर तिसऱ्या किंवा चौथ्या आवेगास एका आकुंचनाचा प्रतिसाद निलयाकडून मिळतो. तरीही नाडीचे ठोके १२० पेक्षा अधिक असतात. रक्तक्षेपण असमाधानकारक असल्याने हृदयात रक्तक्लथनाची शक्यता असते. विकंपनामध्ये अलिंदाचे आकुंचन न होता त्याचे तंतू नुसते वळवळल्यासारखी हालचाल करतात. एकही आवेग तंतुगुच्छातून निलयाकडे जात नाही. त्यामुळे निलयाचे स्वप्रेरित, मंद गतीने आकुंचन सुरू होते. तरीही अलिंदाकडून रक्तप्रवाह व्यवस्थित नसल्याने क्लथनाची शक्यता असतेच. अलिंदाचे आकुंचन आपोआप किंवा औषधोपचारानंतर नियमित होऊ लागले की, तेथील रक्ताची गुठळी निघून शरीरात कुठेतरी अंतर्कीलन होण्याचा धोका असतो. हृदयाचे अन्य विकार, उच्च रक्तदाब, अवटू आधिक्य व संधिताप यांमध्ये अलिंदाच्या या अनियमिततेचा धोका संभवतो. 

(५) वहन अवरोध : अलिंद-निलय पर्वामधून आवेग पुढे जाण्यास अडथळा होण्याच्या या स्थितीचे तीन प्रकार असू शकतात. पहिल्या अवस्थेत सर्व आवेग पुढे जातात, परंतु प्रत्येक वेळी काही मिलिसेकंदांचा विलंब होतो. तरुण वयात, प्रशिक्षित कसरतपटूंमध्ये आढळणारी ही अवस्था निरुपद्रवी असून केवळ परानुकंपी तंत्रिकेचे प्राणेशाचे वर्चस्व दाखविते. दुसऱ्या अवस्थेत अनेक आवेग पुढे जाण्यात अयशस्वी ठरतात. त्यामुळे निलयाची आकुंचने (नाडीचे ठोके) मंद व अनियमित होतात. तिसऱ्या अवस्थेत अवरोध पूर्ण असल्यामुळे अलिंद किंवा कोटरापासून पूर्ण स्वतंत्र असा अलिंद-निलय पर्वाचा किंवा केवळ निलयाचावेग प्राप्त करून नाडी अत्यंत मंद चालते. नाडीचे ठोके ४० प्रतिमिनिटापेक्षा मंद असल्यास कृत्रिम स्पंदनित्राचा वापर आवश्यक ठरतो. अन्यथा रक्तदाब कमी होणे व धाप लागणे अशी लक्षणे जाणवतात. काही व्यक्तींना कायमच अशा स्पंदनित्राचा वापर करावा लागतो. त्याचे आरोपण करता येते. 

(६) अलिंद-निलयात संदेश वहनासाठी एक अतिरिक्त मार्ग असणे : अशा प्रकारचा मार्ग कधीकधी संदेशवहन करून त्यामुळे निलयाला द्रुतगतीने आकुंचन करावयास भाग पडतो. त्यामुळे धडधडणेव धाप लागणे यांसारखी लक्षणे काही काळ आढळतात. जन्मतःच असणाऱ्या अशा मार्गांमुळे निर्माण होणाऱ्या विकारांपैकी वुल्फ-पार्किन्सन-व्हाइट संलक्षण हा विकार सर्वांत अधिक प्रमाणात आढळतो. वयाच्या पहिल्या वर्षापासून वृद्धावस्थेपर्यंत केव्हाही त्याचा उद्भव होतो. प्रत्येक घटना काही तासच टिकते. अन्यथा निरोगी व्यक्तीत त्याचा फारसा दुष्परिणाम होत नाही. परंतु, अलिंदात विकंपन निर्माण झाल्यास हा अतिरिक्त मार्ग द्रुत आवेग अधिक चांगल्या प्रकारे वाहून नेत असल्यामुळे निलयाची गती धोकादायक पातळीपर्यंत वाढून हृदय बंद पडू शकते. 

अशा प्रकारच्या विकारांसाठी वहनाचा वेग कमी करणारी औषधे आणि परानुकंपी तंत्रिकेचा प्रभाव वाढविणारी तंत्रे (उदा., कुंथणे, कॅराटिडवर दाब देणे) उपयोगी ठरतात. घटना अधिक वारंवार व गंभीर झाल्यास हृदयात नलिका घालून त्याद्वारे किरणोपचाराने अतिरिक्त मार्ग निकामी करता येतो. 

(७) निलयाच्या आकुंचनातील लयीचे दोष : येथे निर्माण होणारे अस्थानी ठोके इतर काही दोष नसल्यास निरुपद्रवी असतात. हृदयासइजा करणाऱ्या रोहिणीविकारासारख्या (झटक्यासारख्या) गंभीर आजारातून बरे झाल्यानंतर कधीकधी निलयद्रुततेच्या घटना घडू शकतात. त्यामुळे निलय १२० प्रतिमिनिटापेक्षा अधिक वेगाने धडधडू लागले, तर अस्वस्थता जाणवते. निलयाचा वेग वाढून कधीकधी त्याचे रूपांतर विकंपनात होण्याचा धोका असतो. अशी परिस्थिती रोहिणींच्या दोषामुळे होणे किंवा रक्तदाब फार कमी झाल्यामुळे निलयाची अल्परक्तता किंवा रक्तातील पोटॅशियम घटणे यातून उद्भवू शकते. हृदयातून रक्तक्षेपण पूर्ण थांबल्यामुळे त्वरित उपचाराची आवश्यकता असते. 

हृद् रोहिणी विकार : या विकारासंबंधीचे वर्णन मराठी विश्वकोशा तील ‘हृद् रोहिणी विकार’ या स्वतंत्र नोंदीत केलेले आहे. 

हृदयाच्या रचनेतील उपजत दोष : हृदयाची बहुतांश रचना गर्भाच्या वाढीतील चौथ्या ते सहाव्या आठवड्यात निश्चित झालेली असते. या काळातील जनुकीय परिणामांमुळे किंवा घातक औषधांच्या क्रियेमुळे अथवा रुबेलासारख्या विषाणुसंसर्गामुळे निर्माण झालेले दोष अपत्याच्या जन्मापर्यंत टिकून असतात. तसेच भ्रूणाच्या वाढीच्या संपूर्ण काळात मातेकडून ऑक्सिजनाचा पुरवठा होत असल्यामुळे भ्रूणाची फुप्फुसीय रक्तपुरवठ्याची प्रणाली सुप्तावस्थेत असते. जन्मानंतर काही मिनिटांत ती कार्यशील होते आणि सुमारे दोन आठवड्यांत जन्मपूर्व रचनेतील काही भाग निष्क्रिय होऊन बंद होतात. यातील काही भाग टिकून राहिल्यामुळेकाही उपजत दोष निर्माण होतात. हृदयविकारांमधील सु. १ % विकार रचनेतील उपजत दोषांमुळे असतात. यातील महत्त्वाचे दोष असे

(१) आंतरअलिंदीय किंवा आंतरनिलयी पटलात छिद्र असल्यामुळेरक्ताचा बराचसा भाग डाव्या बाजूकडून उजवीकडे आणि त्यामुळे फुप्फुसांकडे जातो. फुप्फुसातील रक्तसंचयामुळे दम लागणे, घाम येणेआणि शरीराच्या इतर भागास अपुरा रक्तपुरवठा झाल्याने वाढ कमीहोणे ही लक्षणे दिसतात. अलिंद पटलातील दोष लवकर दृष्टीस येतातव अर्भकावस्थेत शस्त्रक्रियेने दुरुस्त करावे लागतात. 

(२) भ्रूणावस्थेत फुप्फुसीय रोहिणीला महारोहिणीस जोडणारा मार्ग (आदिसंयोजक), जो एक-दोन दिवसात बंद होतो, तो टिकून मोकळा राहणे. या मार्गाने आता महारोहिणीकडून फुप्फुसीय रोहिणीकडे रक्तप्रवाह वाहतो. परिणामतः फुप्फुसात अधिक रक्त साठते. मूल एक वर्षाचे झाल्यावर शस्त्रक्रियेने हा मार्ग बंद करता येतो. 


(३) महारोहिणी झडपेचे संकोचन व दोनच पाकळ्या असणे, यामुळे निलयास अधिक जोर लावून काम करावे लागते. नलिकेच्या साहाय्याने झडपेपर्यंत एक फुगा नेऊन नंतर तो फुगा फुगवून हा दोषदुरुस्त होतो. अन्यथा शस्त्रक्रिया करावी लागते. फुप्फुसीय रोहिणीतील झडपेत संकोचन असल्यास शरीर निळे पडते. अशा अर्भकांमध्ये प्रोस्टाग्लँडिन वर्गातील ॲल्प्रोस्टॅडिल हे औषध देऊन आदिसंयोजक मार्ग बंद होणे टाळून शक्य तेवढ्या लवकर तसाच एखादा कृत्रिम मार्ग तयार करणे आणि झडपेचे संकोचन काढणे यासाठी शस्त्रक्रिया कराव्या लागतात. 

(४) महारोहिणीचे संकोचन : रोहिणीचा आदिसंयोजकाच्या जोडापाशी काही भाग अरुंद झालेला असतो. त्यामुळे महारोहिणीच्या कमानीनंतरच्या सर्व भागास अपुरा रक्तपुरवठा होतो व तेथील रक्तदाब कमी असतो. उदा., डावा हात, मांडी. याउलट अलीकडच्या भागासउजवा हात, मस्तक यात रक्ताधिक्य असते. महारोहिणी झडपेतही बहुधा दोनच पाकळ्या असतात. हृदयास अतिरिक्त काम पडल्यामुळे त्याचीक्षमता कमी होण्याची शक्यता असते. सुमारे दोन-तीन आठवड्यांत शस्त्रक्रिया करणे आवश्यक ठरते. 

(५) फॅलटचे चतुष्ठ्य : या विकृतीमध्ये वर उल्लेखिलेली फुप्फुसीय झडप संकोचन आणि निलयातील पटलात छिद्र ही दोन व्यंगे असतातच. शिवाय उजवे निलय अतिपुष्ट (अधिक जाड) असते आणि महारोहिणीचे विस्थापन होऊन तिचा प्रारंभ आंतरनिलयीन छिद्राजवळ होत असल्याने दोन्ही निलयांमधील रक्त महारोहिणीत प्रवेश करते. परिणामतः सर्व शरीर निळसर दिसते. काही अर्भकांमध्ये निळसरपणा सौम्य असतो, त्यामुळे शस्त्रक्रिया काही वर्षांनी केली तरी चालते. काहींमध्ये मात्र मूल रडताना किंवा इतर दाब पडणाऱ्या क्रियांचे वेळी निळेपणा गडद होतो. श्वासास अडथळा होतो आणि शुद्ध हरपते. अशा अर्भकांना ऑक्सिजन देणे, हृदयाचे कार्य वाढू न देणारी औषधे, वेदनाहारके आवश्यक असतात. शक्य तेवढ्या लवकर शस्त्रक्रियेने दोष दुरुस्त करणे आणि महारोहिणी व फुप्फुसरोहिणी यांस जोडणारा तात्पुरता मार्ग तयार करणे हे उपचार उपयुक्त ठरतात. 

(६) महावाहिन्यांची अदलाबदल : या गंभीर प्रकारात महारोहिणी व फुप्फुसीय रोहिणी यांच्या जागा बदलून त्या अनुक्रमे उजव्या आणिडाव्या निलयातून निघतात. त्यामुळे अशुद्ध रक्त पुनःपुन्हा शरीरातून व शुद्ध रक्त फुप्फुसातून फिरत राहते. डाव्या व उजव्या अलिंदामध्ये असलेल्या एका लहानशा छिद्रामुळे नवजात अर्भक काही काळ जिवंत राहते.तत्काळ निदान होऊन काही दिवसात शस्त्रक्रिया केल्यास ते वाचण्याची शक्यता असते.

रक्तात ऑक्सिजन कमी करणाऱ्या इतर काही दुर्मिळ प्रकारांमध्ये (१) त्रिदलीय झडपेचा पूर्ण अभाव असणे, (२) ही झडप नेहमीपेक्षा बरीच खाली असल्यामुळे उजव्या निलयाचा आकार कमी होणे आणि (३) हृदयातून एकच रोहिणीमार्ग निघून नंतर त्याच्या महारोहिणीव फुप्फुसीय रोहिणी अशा दोन शाखा निर्माण होणे यांचा उल्लेखकरता येईल. 

हृत्पात (हृद्पात) : हृत्पात हा स्वतंत्र विकार नसून हृदयाची रक्तग्रहणाची आणि रक्तक्षेपणाची क्षमता अत्यंत कमी झाल्यामुळे निर्माण होणारी अवस्था आहे. ही अवस्था किती जलद निर्माण होते, यानुसार तिला तीव्र किंवा दीर्घकालिक अतिरक्तसंचयी हृत्पात म्हणतात. शरीराला आवश्यक असलेल्या वेगाने हृदय रक्ताची हालचाल करते, तेव्हा त्यात जरूरीप्रमाणे कमी-जास्त क्षेपणाची क्षमता ही त्याची रचना आणि तंत्रिकीय नियंत्रण यांवर अवलंबून असते. रक्ताची मागणी अधिक झाल्यावर हृदयाची क्षेपणक्षमता अधिक वाढून नंतर मर्यादेपलीकडे वाढली नाही तर उच्च उत्क्षेपण हृत्पात निर्माण होतो. उदा., अवटु-आधिक्य, अल्परक्तता, बेरीबेरी, अलिंद-निलयातील किंवा रोहिणी-नीलांमधील अनैसर्गिक जोड, महारोहिणी झडपेतील प्रत्यावहन. 

याउलट रचनात्मक दोषामुळे हृदयाची क्षमता प्रारंभापासूनच कमी होत गेली, तर त्यास निम्न उत्क्षेपण हृत्पात असे म्हणतात. 

हृत्पात डाव्या बाजूमुळे असल्यास त्याचे कारण उच्च रक्तदाब, हृद् रोहिणी विकार व उपजत दोष असू शकते. उजव्या बाजूच्या हृत्पातास फुप्फुसाचे विकार किंवा फुप्फुसीय झडपेचे संकोचन अथवा डाव्याबाजूच्या हृत्पातामुळे फुप्फुसात झालेला रक्तसंचय ही कारणे असू शकतात. यांखेरीज कोणत्याही प्रकारास लठ्ठपणा, मेदकारक आहार, मद्यातिरेक व धूम्रपान यांसारखे घटक मदत करत असतात. मानसिक ताण, भावनाजनक आघात, जंतुजन्य अंतःस्तर शोथ व अंतर्कीलन अशा कारणांमुळे हृत्पाताचा तीव्र आघात होऊ शकतो. 

लक्षणांपैकी थकवा, थोड्या शारीरिक श्रमामुळे दमणूक व धाप लागणे ही लक्षवेधक ठरतात. याशिवाय पायावर सूज येणे, यकृत वाढणे, नीला फुगलेल्या दिसणे, फुप्फुसात द्रवसंचय झाल्याने श्वसनास अडथळा आणि झोपल्यावर विशेष त्रास होणे (बसून राहिल्यास आराम वाटतो) या लक्षणांमुळे हृत्पाताचे निदान निश्चित होते. 

उपाय : हृदयातील दोषांचे निदान करून त्यानुसार उपचार (उदा., आवेग वहनातील दोष कमी करणारी औषधे) करीत असताना लक्षणानुवर्ती उपचारांकडेही लक्ष दिले जाते. उदा., सूज ओसरण्यासाठी मूत्रल औषधे, झोपेसाठी शामक द्रव्ये, आहारातील सोडियमाचे प्रमाण कमी करणे हृदयाची संकोचनक्षमता वाढविणारी डिजिटॅलिस वर्गीय औषधे, श्वसन तंत्रातील संक्रामणासाठी प्रतिजैविके इत्यादी. 

पहा : रक्ताभिसरण तंत्र; विद्युत् हृल्लेखन; हृदय; हृद्रोहिणी विकार. 

श्रोत्री, दि. शं.