हूण :चीनच्या उत्तेरस आणि सायबीरियाच्या दक्षिणेस हिमाच्छादित शिखरे असलेल्या उत्तुंग पर्वतांनी वेष्टिलेला जो मंगोलियाचा प्रदेश आहे, तो हूणांचे मूळ वस्तिस्थान होय. या प्रदेशात भटक्या लोकांचीच वस्ती होऊ शकते. उन्हाळ्यात येथील तृणावृत प्रदेशात आपले पशूंचे कळप चारावे आणि हिवाळ्यात सर्व प्रदेश बर्फाच्छादित झाल्यावर आपले घोडे, उंट, मेंढ्या व गाई-बैल घेऊन आश्रयार्थ दक्षिणेकडच्या प्रदेशाकडे मजल मारावी, अशी त्यांची नेहमीची वृत्ती. या भटक्या वृत्तीमुळे हे लोक काटक असत. कुठेही एक-दोन वर्षांपेक्षा जास्त राहण्याची सवय नसल्यामुळे त्यांना जमिनीचे किंवा स्थावर मिळकतीचे महत्त्व वाटत नसे. कोणी त्यांच्या मार्गात अडथळा आणला, तर त्यास ते निर्दयपणे कापून काढीत. शत्रूंना कंठस्नान घालून त्यांची शिरे आपल्या तलवारींवर लावावी किंवा त्यांना गुलाम करावे आणि त्यांच्या गावांची जाळपोळ करून सर्व प्रदेश बेचिराख करावा, असा त्यांचा रिवाज असे. रुंद डोके, चपटे नाक, बारीक खोल डोळे आणि काळेभोर कडक केस यांमुळे हे लोक शत्रूंना कर्दनकाळ वाटत असत

 

चिनी लोक यांना ह्यूंग-नू (Hiung-nu) असे म्हणत. उत्तरेकडून हे लोक वरचेवर चीनवर आक्रमण करीत. त्यांच्या टोळधाडींपासून आपल्या देशाचे संरक्षण करण्याकरिता चीनचा पहिला सम्राट शिरह्वांगटी (इ. स. पू. २५९–२१०) याने उत्तरेस सु. २,२५३ किमी. लांबीची भिंत बांधली. हे लोक अतिप्राचीन असून त्यांचा अवेस्तात ‘हूनु’ असा उल्लेख आला आहे, असे जे. जे. मोदी यांनी प्रतिपादिले आहे पण इतरांच्या मते हूनु याचा अर्थ पुत्र ( संस्कृत सूनु ) असा आहे

 

हूणांचे त्यांच्या शेजारच्या प्रदेशातील यूए-ची या टोळ्यांशी बिनसल्यामुळे त्या टोळ्यांना पश्चिमेकडे सरकावे लागले आणि त्याचा परिणाम शक आणि नंतर कुशाण लोकांच्या भारतावरील आक्रमणांत झाला. काही काळाने हूणांनीही पश्चिमेकडे प्रयाण केले. त्या वेळी त्यांच्या दोन टोळ्या झाल्या. एक टोळी पश्चिमेस व्होल्गा नदीकडे गेली आणि दुसरी दक्षिणेस ऑक्सस (अमुदर्या) नदीच्या तीरी जाऊन तेथे काही काळ स्थिरावली

 

पहिल्या टोळीने गॉथ लोकांना डॅन्यूब नदीच्या पश्चिमेस पिटाळले. नंतर हूणांनी स्वतः पश्चिमेस आक्रमण करून कालांतराने आपले राज्य पश्चिमेस ऱ्हाईनपासून पूर्वेस मध्य आशियापर्यंत वाढवले. इ. स. ४४५ मध्ये त्यांचा पुढारी अट्टिला याने पूर्व रोमन साम्राज्यावर आक्रमण करून कॉन्स्टँटिनोपलला वेढा घातला. त्याला ते नगर काबीज करता आले नाही पण त्याने सत्तर शहरांना उद्ध्वस्त करून रोमन सम्राटाला जेरीस आणले आणि त्याला २१,००० पौंड सोन्याची जबरदस्त खंडणी देण्यास भाग पाडले

 

इसवी सन ४५१ मध्ये अट्टिलाने पश्चिम रोमन साम्राज्यावर आक्रमण करून मध्य गॉलपर्यंत मुसंडी मारली पण त्याला ऑर्लिऑन्स शहराजवळ पीछेहाट पत्करावी लागली. नंतर चॅर्लोन्सजवळ रोमन आणि गॉथ यांनी एक होऊन एका घनघोर लढाईत अट्टिलाचा पराभव केला. या युद्धात दीड लाख लोक मारले गेले, असे म्हणतात. पुढील वर्षी अट्टिलाने इटलीवर स्वारी करून काही शहरांची लुटालूट व जाळपोळ केली पण तेथेही तो फार काळ राहू शकला नाही. नंतर ४५३ मध्ये त्याचावध झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याचे तुकडे होऊन हूणांचेनाव इतिहासातून नष्ट झाले. अट्टिलाच्या क्रूर कृत्यामुळे त्याला ‘परमेश्वरकृत दंड’ असे नाव देण्यात आले आहे. 

 

ऑक्सस नदीच्या काठी येऊन स्थिरावलेल्या हूणांच्या दुसऱ्या टोळीला एफ्टलाइट (हेफ्टलाइट) असे नाव तिच्या राजवंशावरून पडले आहे.ग्रीक लेखक त्यांना श्वेतहूण म्हणतात. महाभारतात त्यांना हूण (क्वचितहारहूण) असे म्हटले आहे (महाभारत, भांडारकर चिकित्सक आवृत्ती, ‘भीष्मपर्व’, ६.१०.६४). कालिदासाने रघुवंशात (४.६७) वंक्षु नदीच्या तीरावरील हूण वस्तीचा उल्लेख केला आहे. पाठक यांच्या मते, हाकाळ इ. स. ४२५ असावा. याच्या उलट, बुद्धप्रकाश यांनी तो ३९०असा ठरविला आहे (जर्नल ऑफ इंडियन हिस्टरी, खंड ३५, पृ. १३२). हा दुसरा काळ कालिदासाच्या काळाला (४००) समरूप असावा. 

 

ऑक्सस नदीच्या खोऱ्यातून हूणांनी इराण व भारत या दोन्हीदेशांवर आक्रमण केले. इराणचा राजा सॅसॅनिडीवंशीय (सॅसन) प्रथमफीरुझ याने त्यांचे आक्रमण थोपविण्याचा प्रयत्न केला पण तो ४८३ मध्ये मारला गेला. शेवटी कास्त्रौ अनुशीर्वान (५३१–७९) याने तुर्कांच्या साहाय्याने त्यांचा उच्छेद करून ऑक्सस नदीच्या पश्चिमेचा प्रदेश आपल्या राज्यास जोडला आणि पूर्वेचा प्रदेश तुर्कांना दिला. हूणांच्या दुसऱ्या टोळीने भारतावर आक्रमण करून गांधार (पेशावर प्रदेश) काबीज केला. पुढील आक्रमणाला गुप्त सम्राट स्कंदगुप्त (४५५–६७) याने निकराने प्रतिकार केला. ४५८ च्या पूर्वी झालेल्या या घनघोर लढाईचे वर्णन ‘हूणैर्यस्य समागतस्य समरे दोर्भ्यां धरा कम्पिता’ (स्कंदगुप्त आपल्या बाहुबलाने हूणांबरोबर युद्ध करीत असता, पृथ्वी कंपित झाली) या शब्दांत कोरीव लेखात केले आहे. यानंतर जवळजवळ ४० वर्षांपर्यंत हूणांना भारतावर आक्रमण करण्याचे धैर्य झाले नाही.

 

पुढे पाचव्या शतकाच्या अखेरीस हूणाधिपती तोरमाण याने पंजाब प्रदेश काबीज करून मध्य हिंदुस्थानात सागर जिल्ह्यातील एरणपर्यंत आक्रमण केले. एरण येथे त्याच्या कारकिर्दीच्या आरंभीचा लेख सापडला आहे पण त्या भागात त्याची सत्ता १०–१५ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकली नसावी कारण ५१०-११ मध्ये एरण येथेच त्याचे भानुगुप्ताशी युद्ध होऊन त्यात त्याचा पराजय झाला, असे दिसते. तोरमाणाची नाणी उत्तर प्रदेश, राजपुताना, पंजाब आणि काश्मीरमध्ये सापडली आहेत. त्यावरून त्याच्या राज्यविस्ताराची कल्पना करता येते. ७७९ मध्ये रचलेल्या कुवलय-मालानामक प्राकृत चंपूकाव्यात तो चंद्रभागा (चिनाब) नदीकाठच्या पव्वैया गावी राहत असे आणि त्याने जैन धर्माची दीक्षा घेतली होती, असे म्हटले आहे. तोरमाणाचा पुत्र मिहिरकुल याच्या कारकिर्दीच्या शासनवर्ष १५ चा लेख ग्वाल्हेरच्या किल्ल्यात सापडला आहे. त्यात मातृचेटनामक गृहस्थाने गोपगिरीवर सूर्याचे मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. 


 

मिहिरकुलाचे मध्य भारतातील राज्य यापुढे फार काळ टिकलेनसावे कारण उज्जयिनी येथे राज्य करणाऱ्या औलिकरवंशी यशोधर्म राजाने ५३० च्या सुमारास त्याचा मंदसारजवळ पराभव करून तेथे दोन रणस्तंभ उभारले. त्यांवरील लेखांत त्याच्या पराजयाचा उल्लेख आहे. चिनी यात्रेकरू ह्यूएनत्संग (यूआनच्वांग) हा मिहिरकुलाच्या पराजयाचे श्रेय मगधाच्या बालादित्यास देतो. या पराभवानंतर मिहिरकुल काश्मीरात आश्रयार्थ गेला. पुढे त्याने आपल्या आश्रयदात्यास विश्वासघाताने मारून त्याचे राज्य बळकावले आणि बौद्ध धर्माचा छळ आरंभिला. त्याने १,६०० स्तूप व मठ उद्ध्वस्त केले आणि नऊ कोटी उपासकांना ठार मारले, अशी माहिती ह्यूएनत्संग देतो पण तीत फार अतिशयोक्ती आहे. कल्हणाच्या राज- तरंगिणी त तोरमाण व मिहिरकुल यांची नावे येतात पण त्यांस हूणम्हटलेले नाही. शिवाय तोरमाण मिहिरकुलानंतर कित्येक शतकांनी होऊन गेला, असा त्यात उल्लेख आलेला दिसतो. तेव्हा कल्हणास तोरमाण आणि मिहिरकुल यांचा काल व परस्परसंबंध यांविषयी निश्चित माहिती नव्हती, हे उघड आहे. पण मिहिरकुलाच्या क्रूरपणाविषयी राजतरंगिणीतील (३.२९०–२९३) वर्णन ह्यूएनत्संगच्या तद्विषयक वर्णनाशी जुळणारे आहे. 

 

मिहिरकुलानंतर भारतावर हूणांच्या स्वाऱ्या मधूनमधून होतच होत्या. गुप्तांच्या पतनानंतर भारताचे संरक्षण करण्याची जबाबदारी कनौजचे मौखरी आणि ठाणेश्वरचे (स्थानेश्वर) वर्धन या राजवंशांवर आली त्यांनी ती प्राणपणाने पार पाडली. मौखरींच्या शत्रूंच्याही लेखांत त्यांच्या हस्तिसैन्याने हूणांचा धुव्वा उडवल्याचा उल्लेख आहे. ठाणेश्वरच्या प्रभाकरवर्धनाचे ‘हूण हरिणकेसरी’ (हूणरूपी हरिणांना सिंहासारखा) असे वर्णन बाणाने हर्षचरितात केले आहे. पुढे वृद्धावस्थेमुळे स्वतः रणांगणावर जाणे अशक्य झाल्यावर प्रभाकरवर्धनाने आपल्या वीस वर्षे वयाच्या राज्यवर्धननामक पुत्रास हूणांच्या स्वाऱ्यांचा प्रतिकार करण्यास उत्तरापथास (पंजाबात) पाठविले होते. 

 

यानंतर काही कालाने हूणांनी मध्य भारतात राज्य स्थापले असेदिसते. इ. स. सातव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत त्यांची उत्तर भारतातील अनेक राजांशी युद्धे किंवा शरीरसंबंध झाल्याचे कोरीव लेखांत उल्लेख आहेत. बंगालचा देवपाल, कनौजचा महेंद्रपाल, उज्जयिनीचे मुंज व सिंधुराज, उदेपूरचे गुहिलपुत्र, शाकंभरीचा विग्रहराज इ. राजांच्या कोरीव लेखांतून त्यांनी हूण नृपतींवर मिळविलेल्या विजयांचे उल्लेख आढळतात. गुहिलपुत्र अल्लट याने हरियदेवीनामक हूण राजकन्येशी विवाह केला होता आणि तिच्या नावे हर्षपूर नगर वसविले होते. त्रिपुरीचा कलचुरिकर्णयाला हूण राजकन्या आवल्लदेवी हिच्यापासून यशःकर्ण देवनामक पुत्रझाला व तो त्याच्यानंतर गादीवर आला. शाकंभरीचा विग्रहराज हा हूण राजवंशी गोविंदाचा नातू होता, असे त्याच्या हरकेलिनाटक नामक संस्कृत नाटकात म्हटले आहे. या उल्लेखांवरून मध्य भारतात कोठेतरी हूणांचेराज्य कित्येक शतके भरभराटीत होते, यात संशय नाही. त्यांचा उल्लेख ‘हूण देश’, ‘हूण मंडल’ इ. नावांनी कोरीव लेखांत येतो. स्वतः याहूणांचा एकही कोरीव लेख सापडला नसल्यामुळे त्यांचे नक्की स्थानमाहीत नाही तथापि मध्य भारतात चंबळा नदीच्या पूर्वतीरावर बाडोलीयेथे एक उत्तुंग शिवायतन असून तेथे हूणविवाह मंडपही आहे. त्यावरूनतेथे हूणांचे राज्य असावे, असा कर्नल जेम्स टॉड याने तर्क केलाआहे (टॉड, राजस्थान, २,५७०). पूर्वोक्त इतर उल्लेखांशी तो विसंगतनसल्याने संभवनीय वाटतो. 

 

यवन, शक, पल्लव इ. परकी लोकांप्रमाणे हूणही भारतात बाहेरून आले. त्यांना काही काळ भारतात प्रतिकार झाला. पुढे त्यांनी हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती स्वीकारून भारतात आपले राज्य स्थापले. तेव्हापासूनते इतर भारतीय राजवंशांत मिसळून गेले. पूर्वी यवन व शकवंशी राजकन्यांचा विवाह महाराष्ट्राचे सातवाहन, आंध्राचे इक्ष्वाकु इ. राजांशीझाले होते. तसेच विवाह पुढे हूण राजकन्यांचे झाले आणि कालांतराने हूणांची गणना क्षत्रियांत होऊ लागली. चंद बरदाईच्या पृथ्वीराजरासो मध्ये हूण वंशाचा बत्तीस क्षत्रिय राजकुलांत समावेश केला आहे. 

 

हूण इराणातून भारतात आल्यामुळे आरंभी इराणी संस्कृतीची छाप त्यांच्यावर होती. मिहिरकुलासारखी नावे इराणी दिसतात. श्वेतहूण हे द्यौ( आकाश) आणि अग्नी यांचे उपासक होते, असे चिनी लेखक सांगतात. ह्यूएनत्संगने झाबुलीस्तान (अफगाणिस्तान) मधील सूर्यमंदिराचे वर्णनकेले आहे. पुढे भारतात आल्यावर हूण हिंदू देवतांचे उपासक झाले. मिहिरकुल शिवोपासक होता. त्याच्या नाण्यांवर नंदीची आकृती असून ‘जयतु वृषभध्वजः’ असा उल्लेख आहे. दुसऱ्या एका हूण नृपतीने बौद्धधर्म स्वीकारला होता, असे चिनी लेखक सांगतात. बामियान येथे बुद्धाला मिथ्र देवाचा पोशाख घातला आहे.

 

हूणांची स्वतंत्र लिपी होती. तिचा ललितविस्तरात उल्लेख आहे. त्यांच्या काही नाण्यांवरील लेख त्या लिपीत आहेत. अफगाणिस्तानात हूणांचे त्या लिपीतील लेख सापडले आहेत. हूणांनी स्वतः नाण्यांचा विशिष्ट प्रकार सुरू केला नाही. तोरमाणाने अफगाणिस्तानात सॅसनियन, भारतात गुप्त आणि काश्मीरात कुशाण पद्धतींची नाणी पाडली. त्यांनी बांधलेल्या देवळांचा शोध लागला नसल्याने त्यांनी एखादी विशिष्ट स्थापत्यपद्धती सुरू केली होती की काय, हे सांगता येत नाही. 

 

हूण हे यवन, शक, पल्लव इ. परकी लोकांनंतर बऱ्याच कालाने भारतात आल्यामुळे त्यांचे उल्लेख प्राचीन स्मृतींत आढळत नाहीत. महाभारतातील काही पर्वांत व विष्णुपुराणादी काही पुराणांत मात्र उत्तरेतील लोकांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. ते चीनजवळच्या प्रदेशातून आले ही माहिती भारतीयांस होती, म्हणून महाभारतातील अनेक पर्वांत त्यांचा चिनीलोकांबरोबर निर्देश केला आहे. आदिपर्वामध्ये (१७५–३८) वसिष्ठाच्या धेनूच्या तोंडातील फेसापासून त्यांची उत्पत्ती चीनादी अनेक म्लेंच्छ वंशीयांबरोबर झाल्याचा उल्लेख आहे पण तो श्लोक भांडारकर संशोधन मंडळाच्या आवृत्तीत आढळत नाही, म्हणून ती कल्पना नंतरची असावी. 

 

पहा : गुप्तकाल. 

मिराशी, वा. वि.