हुस, यान : (सु. १३७०?–६ जुलै १४१५). एक बोहीमियन धर्मसुधारक. त्याचे जर्मन नाव योहानीस हुस फोन हूसनेट्स. त्याचा जन्मसामान्य शेतकरी कुटुंबात हूसनेट्स (झेकोस्लोव्हाकिया) येथे झाला. त्यांने सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन युनिव्हर्सिटी ऑफ प्रागमधून एम्.ए. पदवी घेतली (१३९६). तेथेच त्याला इ. स. १३९८ मध्ये अधिव्याख्यात्याची नोकरी मिळाली. पुढे त्याची विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विद्याशाखेचा विभागप्रमुख म्हणून नेमणूक झाली (१४०१). नंतर त्याची बेथलीअम चॅपेल (ख्रिस्ती प्रार्थनामंदिर) यामध्ये धर्मोपदेशक म्हणून नियुक्ती झाली (१४०२). या चॅपेलची बांधणी इ. स. १३९१ मध्ये प्रागच्या आस्थेवाईक धार्मिक नागरिकांनी केली होती आणि त्यांचा उद्देश बोहीमियन बोली भाषेत धार्मिक कीर्तने व उपदेशपर व्याख्याने करणे हा होता. या चॅपेलचा त्याच्या धार्मिक विचारसरणीवर परिणाम झाला. तो जॉन विक्लिफ या धर्मसुधारकांच्या साहित्याकडे आकृष्ट झाला. त्याचे तत्त्वज्ञानविषयक व धर्मशास्त्रीय लेख केवळ त्याने अभ्यासले नाहीत, तर त्यांचा Trialogus चेक भाषेत अनुवादित केला (१४०३). आपल्या उदारमताला फारसा विरोध होणार नाही, हे गृहीत धरून त्याने De Omni Sanguine Christi Glorificato (१४०५) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यात त्याने अलंकारप्रचुर भाषेत ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बहुभक्षकतेवर आणि अद्भुत चमत्कारांविषयी टीकास्त्र सोडले होते. शिवाय श्रद्धावान ख्रिस्ती बांधवांना विनंती केली होती की, त्यांनी येशूविषयीच्या दांभिक प्रचारापासून अलिप्त राहून त्याच्या त्यागी वृत्तीवर विश्वास ठेवावा. 

 

हुस याची दोनदा बिशप आणि पाद्र्यांच्या सभेचे धर्मोपदेशक म्हणून नियुक्ती झाली होती. या पदावर असताना त्याने बोहीमियाच्या प्रांतिक धर्ममंडळात अनेक उपदेशपर व्याख्याने दिली. इ. स. १४०८ मध्ये एका ख्रिस्ती धर्मगुरूंनी आर्चबिशप यांच्याकडे हुस याच्या चर्चविरोधातील वक्तव्याविषयी अधिकृत तक्रार केली. तेव्हा तत्काळ त्याचे पद काढून घेण्यात आले व त्याला धार्मिक कृत्ये करण्यास बंदी घालण्यात आली.त्याची पुनर्नियुक्ती विद्यापीठात झाली (१४०९) पण त्याच्या चर्चविरोधी विधानांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्याने विक्लिफ हे एक सदाचरणी गृहस्थ होते आणि त्यांची ख्रिस्ती धर्माच्या उदारीकरणाचीभूमिका रास्त होती, हे विचार जाहीर रीत्या पुन्हा मांडले. तेव्हा पाचवेपोप अलेक्झांडर यांनी आज्ञापत्र काढून विक्लिफ यांच्या पाखंडी मतांचात्याग करावा आणि सर्व साहित्य जमा करावे, असे फर्माविले. एवढेच नव्हे, तर आर्चबिशपांनी जाहीर रीत्या विक्लिफ यांच्या लेखनाच्या २०० प्रती चौकात जाळल्या आणि त्याला, त्याच्या अनुयायांना व काही मित्रांना धर्मबहिष्कृत केले. दरम्यान हुस याने तेविसावे जॉन पोप या नवनियुक्त धर्मगुरूंकडे निषेध नोंदविला आणि विनंती केली. या वेळी त्याच्या अनुयायांनी त्याच्या बाजूने आम्हाला उपदेशपर व्याख्याने द्या म्हणून आग्रह धरला. तेव्हा त्याने बेथलीअम प्रार्थनामंदिरात प्रवचनास सुरुवात केली. तसेच प्राग विद्यापीठात त्याच्या बचावात्मक धोरणासही प्रारंभ झाला होता आणि विक्लिफ याच्या प्रबंधांचा प्रसार-प्रचारही पूर्ववत सुरू झाला होता. राजा व राणी यांनी तसेच काही बोहीमियन सरदार व सनदी नोकर यांनी रोमला विनंती अर्ज पाठवून पाचवे पोप यांचे आज्ञापत्र रद्द करण्याची मागणी केली तथापि मार्च १४११ मध्ये उलट हुस याच्यावर निर्बंध जारीकरण्यात आले आणि सर्व शहर मनाई हुकूमाखाली गेले. तेव्हा प्रागहूनहुस कॉन्स्टन्सला गेला (१४१२). तरीसुद्धा त्याचा लढा चर्चविरुद्ध चालू होता तो ख्रिस्ती धर्मशास्त्रीय तत्त्वांविरुद्ध नव्हता. 

 

अखेर या सर्व खटाटोपांना कंटाळून हुस याने स्वतःहून अलिप्त राहण्याचे ठरविले. त्याने विद्यापीठाच्या धर्मशास्त्रविषयक विद्याविभागाशी असलेले संबंध तोडले. पुन्हा त्याच्याविरुद्ध हुकूमनामा जारी करून त्याच्यासर्व कृतींवर बहिष्कार घालण्याची फर्माने निघाली. सर्वत्र मनाई हुकूम लावण्यात आले. कुणीही त्याला आसरा देऊ नये, अशा सक्त आज्ञाहोत्या. एकूण ख्रिस्ती चर्चने सर्व सूत्रे हाती घेतली होती. तरीसुद्धा हुसयाने प्रचंड पत्रव्यवहार करून Deecclecia (१४१३) हा संकलित ग्रंथ तयार केला. त्यात त्याने आपल्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केलेअसून धर्मसुधारणेची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. तसेच चर्चच्या भ्रष्टाचाराचे, गैरकारभाराचे अनेक किस्से त्यात होते. अर्थात हे सर्व लेखन विक्लिफ याने प्रसृत केलेल्या तत्त्वांवरच आधारित होते. अखेरच्या दिवसांत त्याने सुपर चार, सेन्ट टायरम (इं. भा.) हा ग्रंथ लिहून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखविली आणि आध्यात्मिक तत्त्वांवरील श्रद्धाही प्रदर्शित केली तथापि त्याची कॅथलिक दांभिक धर्मोपदेशकांविषयी, विशेषतः रोमन चर्च आणि आर्चबिशप यांच्या ढोंगीपणाविषयी, विक्लिफ याने केलेली टीका हाच आधार शेवटपर्यंत राहिला. ही तत्त्वनिष्ठा अखेर त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरली कारण त्याची चौकशी करण्यासाठी कॉन्स्टन्स येथे १४१४ मध्ये बोहीमिया व रोमन साम्राज्याचा सम्राट सिगिसमंड यांच्या अध्यक्षतेखाली नवीन मंडळ स्थापन झाले. राजाने त्याच्या जिवास कोणतीही इजा होणार नाही, अशी हमी घेतली पण नंतर त्यांनी विश्वासघात केला. या समितीने हुस याला विक्लिफ याची पंचेचाळीस कलमे चुकीची, प्रचलित धर्माविरुद्ध आणि क्रांतिकारक आहेत, त्यांचा मी धिक्कार करतो, असे सांगावे आणि शपथपूर्वक असे आश्वासन द्यावे की, ‘मी यापुढे त्याच्या तत्त्वांचा प्रसार-प्रचार करणार नाही आणि मध्यवर्ती चर्चशी एकनिष्ठ राहीन’, अशी शपथ घेण्यास फर्माविले तथापि हुस याने आपल्यावरील सर्व आरोप नाकारले. तेव्हा त्याला मृत्युदंडाची शिक्षा फर्माविण्यात आली. त्याला स्टेक (कॉन्स्टन्स) येथे जिवंत जाळण्यात आले व त्याची रक्षा र्‍हाईन नदीत विसर्जित करण्यात आली. त्याच्या साहित्याचा चेक भाषेच्या अभिवृद्धीस हातभार लागला, त्याचप्रमाणे चर्चच्या धर्मशास्त्रीय तात्त्विक भूमिकेत सुधारणा घडविण्यास साहाय्य झाले. De orthographia bohemica (१४१०) हा त्याचा ग्रंथ चेक भाषेतील शुद्धलेखनासंदर्भात महत्त्वाचा मानला जातो. 

 

यान हुस याच्या मृत्यूनंतर हुसाइट्स (यान हुसचे अनुयायी) नावाची धार्मिक चळवळ उद्भवली. यान हुसच्या अनुयायांनी तीत हुसने प्रसृत केलेल्या धर्मसुधारणांना संरक्षण देण्याचे ठरविले. स्ट्रिब्रोचा जाकौबेक हा त्यांचा नेता होता. फेब्रुवारी १४१६ मध्ये प्रागमधील सर्व चर्च त्यांच्या ताब्यात होती. ही चळवळ अनेक वर्षे चालली. 

 

संदर्भ : Spinka, Matthew, John Hus : A Biography, Greenwood, 1978. 

देशपांडे, सु. र.