हुरजूक, नसीमा : (२ सप्टेंबर १९५०). हजारो अपंग व्यक्तींसाठी ‘हेल्पर्स ऑफ द हॅन्डिकॅप्ड’ या संस्थेच्या रूपाने आधारनिर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या. 

 

नसीमा यांचा जन्म सोलापुरातला. त्यांचे पूर्ण नाव नसीमा महंमद अमीन हुरजूक. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत सामान्य आयुष्य जगणाऱ्यासीमायांना ‘पॅराप्लेजिया’ या आजाराने अपंगत्व आले. परावलंबित्वाने खचलेल्या नसीमा यांना त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाने धीर आला. बाबूकाका दिवाण या त्यांच्या-सारख्याच पॅराप्लेजिया या व्याधीने अपंग झालेल्या व्यक्तीच्या प्रेरणेने त्यांनी शिक्षणास सुरुवात केली. बाबूकाका बंगलोरमध्ये अपंगांसाठी काम करीत असत. ते काम त्यांनी पाहिले आणि त्यांचा आदर्श घेऊन कामाला सुरुवात केली. त्या अर्थशास्त्र विषयात बी.ए. झाल्या. वडिलांचे छत्र हरपले तरी चाकाच्या खुर्चीवरून शिक्षण पूर्ण करताना त्यांनी विविध खेळांतही भाग घेतला. मुंबईला राष्ट्रीय अपंग स्पर्धेत चॅम्पियनशिप मिळविली. तसेच १९७३ मध्ये लंडन येथे स्टॉक मँडव्हील गेम्समध्ये भाग घेतला. तेथून घेतलेल्या अनुभवांतून त्यांनी दुर्लक्षित अपंग व्यक्तींसाठी काम करण्याचे ध्येय ठरवले.  

 

कस्टम खात्यात उप-अधीक्षक पदावर काम करत असतानाच अपंग व्यक्तींच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी संघटना उभी करावी, हा विचारनसीमा यांच्या मनात येत होता. १९८३ मध्ये ‘हेल्पर्स ऑफ द हॅन्डिकॅप्ड’ ही संस्था त्यांनी सुरू केली. या कामी पोलिओ झालेलीत्यांची मैत्रीण रजनी करकरे-देशपांडे, त्यांचे पती, तसेच मनोहर देशभ्रतार, श्रीकांत केकडे, अझिज हुरजूक, ईर्शाद हुरजूक, अभिजित गारे, छाया देसाई इत्यादींनी त्यांना सहकार्य केले. समाजामध्ये जगण्यासाठी अपंग व्यक्तींना शारीरिक, बौद्धिक, मानसिक व आर्थिक पातळीवर साहाय्य करणे, हे त्यांच्या संस्थेचे उद्दिष्ट आहे. 

 

अपंगत्वामुळे कोमेजून गेलेल्या अनेक मुलांना व अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी ती संस्था कार्य करते. यामध्ये अपंग व्यक्तींना कृत्रिम साधनांची मदत, शस्त्रक्रियेसाठी व उपचारासाठी मदत, अपंग मुलामुलींना शिक्षणासाठी संधी व मदत अंतर्भूत असते. व्यावसायिक तंत्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी त्या व्यक्तींना सिद्ध केले जाते. याबरोबरच अपंग व्यक्तींतील कलागुण ओळखून त्यांच्या विकासासाठी कार्यक्रमही राबविले जातात. ‘हेल्पर्स ‘च्या माध्यमातून अपंगांचे विवाह ठरविण्याचे प्रयत्नही केले जातात. वरील सर्व उपक्रमांसाठी नसीमा यांनी शाळा, वसतिगृह, पुनर्वसन केंद्र व कार्यशाळा यांचीही निर्मिती केली आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे आहे, तसेच कोल्हापूर जिल्ह्यात उचगाव (ता. करवीर) येथे ‘घरौंदा वसतिगृह’ आहे. कदमवाडी येथे अपंगांसाठी प्रशिक्षण केंद्र आहे. शिवाय पुणे, कुडाळ (सिंधुदुर्ग) इ. ठिकाणीही त्यांचे प्रकल्प सुरू आहेत. अपंग व्यक्तींच्या सेवेसाठी परिपूर्ण सुविधा असलेल्या अशा त्या संस्था आहेत. 

 

या कार्याचा परिचय अधिकाधिक लोकांना व्हावा व त्याबाबत जागृती व्हावी, यासाठी नसीमा यांनी आपल्या जीवनावर आधारित चाकाचीखुर्ची (२००१) हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले आहे. त्याचा इंग्रजी अनुवाद आशा देवधर यांनी नसीमा : द इन्क्रेडिबल स्टोरी (२००५) ह्या शीर्षकाने केला असून गगनाला पंख नवे ही त्यावर आधारितसी. डी. उपलब्ध आहे. याशिवाय त्याचे गुजराती, तेलुगू, कन्नड इ. भारतीय भाषांत अनुवादही झाले आहेत. त्यांच्या कार्याची दखल विविध संस्थांनी व महाराष्ट्र शासनाने घेतली. त्यांना ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’ (१९९६), ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ (२००६), सह्याद्री वाहिनीचा ‘रत्नशारदा पुरस्कार’, दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा ‘आदंदमयी पुरस्कार’, यशवंत प्रतिष्ठान (अहमदनगर) यांच्या वतीने ‘कृतज्ञता पुरस्कार’ (२०१३) इ. जवळजवळ पन्नासहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. साठीनंतरही त्या तरुणाईच्या उमेदीने कार्यरत आहेत.

 

संदर्भ : कुलकर्णी, सुहास, संपा. खरेखुरे आयडॉल्स, पुणे, २००७

देशपांडे, विनीता विश्वनाथ