हुगळी-चिनसुरा : पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर. लोकसंख्या ५५,२०,३८९ (२०११). हे कोलकात्याच्या उत्तरेस ३२ किमी.वर हुगळी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. हे रस्ते, लोहमार्ग यांचे प्रस्थानक असून प्रसिद्धराष्ट्रीय महामार्ग ग्रँड ट्रंक रोड येथून जातो. तसेच येथे चार लोहमार्गस्थानके आहेत. 

 

पोर्तुगीजांचे पश्चिम बंगालमधील हे प्रसिद्ध व्यापारी ठाणे व बंदर होते. पोर्तुगीजांनीच या शहराची स्थापना केली (१५७९). मोगल सम्राट शाहजहानने यावर १६३२ मध्ये केलेल्या हल्ल्यात पोर्तुगीजांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. इंग्रजांचे पश्चिम बंगालमधील प्रमुख व्यापारी ठाणे म्हणून यास १६५१–९० पर्यंत महत्त्व होते. डचांनी १६५६ मध्ये चिनसुरा येथे व्यापारी ठाणे सुरू केले होते. त्यांनी १८२५ मध्ये चिनसुरा इंग्रजांना इंडोनेशियातील सुमात्रा बेटाच्या बदल्यात दिले होते. मराठ्यांनी १७४२ मध्ये या शहरावर हल्ला केला होता. येथे १८६५ मध्ये नगरपालिका स्थापन झाली आहे. 

 

हुगळी-चिनसुरा हे औद्योगिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असून येथे भात गिरण्या, ताग गिरण्या, रबरापासून विविध वस्तुनिर्मिती इ. उद्योग विकसित झाले आहेत. येथे कलकत्ता व बरद्वान विद्यापीठांशी संलग्न महा-विद्यालये आहेत. येथील आर्मेनियन चर्च, ॲना मॅरिया सुलिव्हॅन स्मारक, बंकीम भवन, संदेश्वर मंदिर, हुगळी इमामबारा (१८६१), श्रीराम-सीता मंदिर, इ. ठिकाणे प्रसिद्ध आहेत. 

गाडे, ना. स.