हुक, रॉबर्ट : (१८ जुलै १६३५–३ मार्च १७०३). इंग्रज भौतिकीविज्ञ. त्यांनी १६६० मध्ये भौतिकी विषयातील ⇨ स्थितिस्थापकतेसंबंधीचा ‘हुक नियम’ शोधून काढला. तसेच त्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय असे संशोधन केले.
हुक यांचा जन्म फ्रेशवॉटर (आइल ऑफ वाइट, इंग्लंड) येथे झाला. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड येथे झाले. १६५५ मध्ये बॉइलियन (गेरिक) हवेचा पंप तयार करण्याकरिता त्यांनी ⇨ रॉबर्ट बॉइल यांचे साहाय्यक म्हणून काम केले. त्यांची १६६२ मध्ये लंडन येथील रॉयल सोसायटीच्या प्रयोगशाळेत अभिरक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. ते १६६३ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो झाले. त्यांची १६६५ मध्ये ग्रेशम महाविद्यालयात भूमितीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.
हुक यांच्या स्थितिस्थापकतेसंबंधीच्या नियमानुसार घन पदार्थ किंवा वस्तू (उदा., धातू, लाकूड) ताणली गेली असता तो ताण लावलेल्या प्रेरणेला समानुपाती (प्रमाणात) असतो. त्यांचा हा नियम स्थितिस्थापक पदार्थ, प्रतिबल व प्रतिविकृती यांचा अभ्यास करण्याकरिता मूलभूतठरला. पदार्थांवर क्रिया करणाऱ्या प्रेरणा प्रतिबलाने आणि ताण हा प्रतिविकृतीने व्यक्त करतात, म्हणून प्रतिविकृती ही प्रतिबलाच्या प्रमाणात असते. हुक यांनी या नियमाचा वापर घड्याळातील समतोल स्प्रिंगाचे अभिकल्प तयार करण्याकरिता केला.
हुक हे ग्रेगरियन परावर्तित दूरदर्शक तयार करणाऱ्यांपैकी एक होते. त्यांनी १६६४ मध्ये मृग नक्षत्रातील तारादर्शकत्व असलेल्या ट्रॅपिझियमा-मधील पाचवा तारा शोधून काढला. त्यांनी गुरू ग्रह स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असल्याचे सर्वप्रथम सुचविले. एकोणिसाव्या शतकात ग्रहांच्या परिभ्रमणाची वेगराशी निश्चित करण्याकरिता हुक यांनी तयार केलेल्या मंगळ ग्रहाच्या आरेखनांचा वापर करण्यात आला.
हुक यांच्या मायक्रोग्रॅफिया (१६६५ इं. शी. ‘स्मॉल ड्रॉइंग्ज ‘) या ग्रंथात त्यांनी हिमतुषारांच्या स्फटिकीय संरचनेचे सचित्र वर्णन केले आणि रेशीम किड्याच्या सूतकताई पद्धतीप्रमाणे कृत्रिम तंतू तयार करता येण्याच्या शक्यतेसंबंधी सांगितले. त्यांनी सूक्ष्ममानीय जीवाश्मांसंबंधी केलेल्या अभ्यासाचा उपयोग पुढे क्रमविकास सिद्धांत मांडण्यात झाला. त्यांनी बुचाचे अतिशय पातळ काप सूक्ष्मदर्शकातून पाहिले, त्यावेळी त्यांना या कापात मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे संरचना असलेले अनेक कप्पे दिसले. त्यांनी या प्रत्येक कप्प्यांना ‘सेल’ (कोशिका) हे नाव सर्वप्रथम दिले.
लंबकाच्या गतीचा वापर करून गुरुत्वाची प्रेरणा मोजता येऊ शकते असे हुक यांनी १६६६ मध्ये सुचविले. त्यांनी पृथ्वी आणि चंद्र सूर्याभोवती दीर्घवर्तुळाकार मार्गाने फिरतात असे दाखविण्याचा प्रयत्न केला. १६७२ मध्ये त्यांनी विवर्तन आविष्काराचा शोध लावला. याकरिता त्यांनी प्रकाशाच्या तरंग सिद्धांताचा उपयोग केला. १६७८ मध्ये त्यांनी ग्रहांच्या गतीचे वर्णन करण्याकरिता व्युत्क्रमी वर्ग नियम तयार केला.या नियमांचा वापर नंतर ⇨ सर आयझॅक न्यूटन यांनी सुधारित रूपातकेला. सर्व पदार्थ तापविल्यावर प्रसरण पावतात, हवा ही कणांनी बनलेली असून ते कण एकमेकांपासून सापेक्षत: दूर अंतरावर असतात असे हुक यांनी प्रथमत: सांगितले.
हुक यांचे लंडन येथे निधन झाले.
खोब्रागडे, स्नेहा दिलीप
“