हिल, आर्चिबॉल्ड व्हिव्हिअन : (२६ सप्टेंबर १८८६–३ जून १९७७). ब्रिटिश शरीरक्रियावैज्ञानिक आणि जीव-भौतिकीविज्ञ. त्यांना १९२२ सालचे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक विषयाचे नोबेल पारितोषिकओटो फ्रिट्झ मायरहोफ यांच्यासमवेत विभागून मिळाले. स्नायूंमध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या संदर्भातील संशोधनासाठी त्यांना हे पारितोषिक मिळाले. त्यांच्या या संशोधनामुळे ऑक्सिजनाच्या अनुपस्थितीत कार्बोहायड्रेटांचे लॅक्टिक अम्लाच्या निर्मितीसह झालेल्या भंजनामुळे स्नायूंच्या प्रेरणेचा उगम समजण्यास मदत झाली. 

 

आर्चिबॉल्ड व्हिव्हिअन हिल
 

हिल यांचा जन्म ब्रिस्टल (ग्लॉस्टरशर, इंग्लंड) येथे झाला. त्यांचे शिक्षण ब्लंडेल्स स्कूल व ट्रिनिटी कॉलेज येथे झाले. ते १९०७ मध्ये गणिताचे तिसरे रँग्लर झाले. सन १९१०–१६ या काळात ते ट्रिनिटी कॉलेजमध्ये फेलो होते. 

 

हिल यांनी केंब्रिज विद्यापीठात स्नायू आणि तंत्रिका ऊतक यांच्या शरीरक्रियावैज्ञानिक ऊष्मागतिकीचे संशोधन करण्यास सुरुवात केली (१९११–१४). बेडकातील मांड्यांच्या स्नायूंचा अभ्यास करीत असताना त्यांनी असे दाखवून दिले की, स्नायूंच्या क्रियाशील अवस्थेत सामान्य स्थितीच्या पुनर्प्राप्तीसाठी ऑक्सिजन वायूची आवश्यकता असते, तर आकुंचनासाठी नसते. या शोधामुळे स्नायूंचे आकुंचन होताना स्नायू कोशिकांमध्ये घडणाऱ्या अनेक जीवरासायनिक विक्रिया-संबंधीच्या संशोधनाकरिता पाया पक्का होण्यास मदत झाली. 

 

हिल यांनी मँचेस्टर विद्यापीठ, ब्रॅकनबर्ग येथे शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक (१९२०–२३) आणि युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे शरीरक्रियाविज्ञानाचे जॉड्रेल प्राध्यापक (१९२३–२५) म्हणून काम केले. ते १९२६ पासून निवृत्त होईपर्यंत (१९५१) रॉयल सोसायटी-मध्ये फाउलरटन संशोधन प्राध्यापक होते. त्यांनी हीमोग्लोबिनाद्वारा ऑक्सिजन स्वीकारण्याच्या प्रमाणाबाबत ‘हिल समीकरण’ मांडले. १९३० मध्ये त्यांनी सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविण्यास सुरुवात केली आणि नाझी जर्मनीतील निर्वासितांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. त्यांनी १९४०–४५ दरम्यान केंब्रिज विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून ब्रिटिश संसदेत काम केले. तसेच भारत शासनाला स्वातंत्र्योत्तर सुरुवातीच्या काळात वैज्ञानिक ध्येयधोरणे ठरविण्यासाठी मदत केली. दुसऱ्या महायुद्धानंतर ते पुन्हा वैज्ञानिक संशोधनाकडे वळले आणि स्नायूंच्या शरीरक्रियाविज्ञाना-बाबतचे महत्त्वपूर्ण शोधनिबंध प्रसिद्ध केले. या शोधनिबंधांचा उपयोग आज देखील संशोधक करतात. हिल यांनी मस्क्युलर ॲक्टिव्हिटी (१९२६), मस्क्युलर मूव्हमेंट इन मॅन (१९२७) आणि लिव्हिंग मशिनरी (१९२७) हे ग्रंथ लिहिले. 

 

हिल यांचे केंब्रिज (इंग्लंड) येथे निधन झाले. 

कानिटकर, बा. मो. वाघ, नितिन भरत