हिरेरो : (हेरेरो) . नैर्ऋत्य आफ्रिकेतील बांतू भाषा बोलणारा आदिम जमातींचा एक समूह वा गट. त्यांचे मूळ गट हिरेरो व त्याचा एक भाग एम्बांदेरू मध्य नामिबिया व बोट्स्वाना यांतील काही भूप्रदेशात राहतात, तर त्यातील अन्य गट, विशेषतः हिम्बा काओकोव्हिल्ड या नामिबियाच्या क्षेत्रात आणि अंगोलाच्या दक्षिण भागात राहतात. हे लोक हिरेरो हीच भाषा बोलत असून ती भाषा बांतू भाषेच्या जवळची आहे. या भाषेत विविध बोलीभाषाही आहेत. हिरेरो हे पारंपरिक दृष्ट्या गुरेपालक असून मोठ्या प्रमाणावर मेंढ्या व शेळ्यांचे कळप पाळत आणि त्यांचे दूध व मांस यांवर निर्वाह करीत. त्यामुळे त्यांचा झाडाझुडपांच्या गवताळ प्रदेशांत संचार असे.
हिरेरोंच्या म्हणण्यानुसार हिंबा, टजिंबा, एम्बांदेरू, कवांडू या त्यांच्या उपशाखा आहेत. कुवाले, झेंबा, हेकवाना, टजिविकवा हे अंगोलातीलकाही समूह आहेत. ते नियमितपणे अंगोला ते नामिबिया असा प्रवास करतात. टजिंबा हे हिरेरो बोली बोलत असले, तरी त्यांची शारीरिकठेवण निराळी आहे. आजही ते शिकारी अवस्थेतच आहेत.
सतराव्या-अठराव्या शतकांत हिरेरो पूर्वेकडून आजच्या नामिबियामध्ये स्थलांतरित होऊन सुरुवातीस गुराखी म्हणून स्थिरस्थावर झाले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास यूरोपियन वसाहतवाद्यांच्या संपर्कात ते आल्यानंतर त्यांच्यापैकी बऱ्याच गटांनी या पारंपरिक व्यवसाया-शिवाय उद्यानविद्येत लक्ष केंद्रित केले आणि हिरेरोंचे पुन्हा स्थलांतरहोऊ लागले. डमरलंड येथे जर्मन वसाहतवाद्यांनी हिरेरोंकडून जमिनीघेऊन शेतघरे (फार्म हाउसेस) बांधण्यास सुरुवात केली. हळूहळू जर्मन वसाहतीचा कायदा या भागास लागू होऊन हा परिसर ‘जर्मन कॉलनी’ म्हणून उदयास आला. स्थानिकांना दिल्या जाणाऱ्या भेदभावाच्या वागणुकी-मुळे जर्मन वसाहतवादी आणि हिरेरो गुराखी यांच्यात संघर्ष सुरू झाला. यूरोपियनांचे व्यापारी मार्ग, रेल्वे मार्ग यांमुळे हिरेरोंसाठी संघर्ष आणि स्थलांतर ही नित्याची बाब बनली. या सर्व संघर्षात जर्मनांची सरशी होऊन सर्व मालकी त्यांच्याकडे गेली.
हिरेरो भाषा आणि त्यांची भटकी जीवनशैली यांशिवाय हिरेरो समाज हा काही एकजिनसी समाज नाही. स्थलांतराबरोबरच पाश्चिमात्य संपर्कामुळे त्यांच्या मूळ संस्कृतीवर पाश्चिमात्य जीवनाचा प्रभाव पडला आहे. नामिबियन हिरेरोंमध्ये तो विशेषत्वाने दिसतो. तरीही त्यांची समाईक भाषा हा त्यांच्यातील एक मोठा दुवा आहे.
हिरेरोंमध्ये आईवडिलांच्या दोन्ही घराण्यांचा वारसा मुलांमध्ये राहतो. संपत्तीचा वारसाही दोन्हीकडून येतो. त्यांची स्वतःची आरोग्य उपचार पद्धती आहे. औषध देणारा वैदू किंवा भगत समलैंगिक संबंध ठेवतो. त्याचे समाजातील स्थान वेगळे असते. हिरेरोंचा पारंपरिक धर्म सारखा असून पितरांच्या पूजेला त्यात विशेष महत्त्व आहे तथापि अनेक हिरेरोंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे.
कुलकर्णी, शौनक
“