हिराकूद : भारताच्या ओडिशाा राज्यात, महानदीवर उभारलेला बहूद्देशीय प्रकल्प. हा संबळपूरच्या उत्तरेस १० किमी., राष्ट्रीय महामार्ग ६ पासून ६ किमी. व हिराकूद रेल्वे स्थानकापासून ८ किमी.वर आहे. या प्रकल्पात हिराकूद, तिकरपारा, नारज या धरणांचा समावेश होतो. हिराकूद हे भारस्थायी, काँक्रीट व मातीचे संयुक्त धरण असून आशियातील मोठे व मातीचे लांब धरण म्हणून यास महत्त्व आहे. 

 

महानदीला १९३७ मध्ये आलेल्या मोठ्या महापुरानंतर भारतरत्न स्थापत्य अभियंता विश्वेश्वरय्या यांनी तिच्या त्रिभूज प्रदेशातील पूरप्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी, महानदी खोऱ्यात पाणीसाठा करण्याबाबत सूक्ष्म निरीक्षण करण्याचे प्रस्तावित केले होते. ओडिशा प्रांताचे तत्कालीन राज्यपाल हॉथ्रोन लेबिस यांनी १५ मार्च १९४६ रोजी या प्रकल्पाची कोनशिला बसविली. धरण कामास १९४८ मध्ये सुरुवात झाली व जानेवारी १९५७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याचे उद्घाटन केले. जलसिंचन व जलविद्युत्निर्मिती या दोन्ही क्षेत्रांत हा प्रकल्प १९६६ पासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला. 

 

हिराकूद धरण
 

महानदीतील हिराकूद (हिऱ्यांचे बेट) बेटावरून या प्रकल्पास हिराकूद हे नाव देण्यात आले आहे. हे धरण लामडुंग्री व चंडिलीडुंग्री या डोंगरांदरम्यान बांधण्यात आले आहे. मुख्य धरणाची लांबी ४.८ किमी. आहे. मुख्य धरणाशिवाय दोन्ही बाजूच्या डोंगरांदरम्यानचे भाग बांध घालून सलग करण्यात आले असून त्यांच्यासह धरणाची एकूण लांबी २५.८ किमी. आहे. मुख्य धरण काँक्रीटचे असून याच्या दोन्ही बाजूंस मातीच्या भिंती आहेत. काँक्रीटच्या भिंतीची उंची ६७.९६ मी. व मातीच्या भिंतीची उंची ५७.९१ मी. आहे. धरणाच्या जलाशयाचे क्षेत्रफळ ७४३ चौ.किमी. असून धरणाची जलधारणक्षमता ८२५ कोटी घ.मी. व जलधारणक्षेत्र ८३,४०० चौ.किमी. आहे. धरणाच्या दोन्ही बाजूंस कालवे काढण्यात आले असून कालव्यांची एकूण लांबी सु. ८८८ किमी. आहे. त्यांद्वारा संबळपूर, बरगड, बोलानगीर, सुबरणपूर या जिल्ह्यांतील खरीप व रब्बी हंगामातील पिकांखालील २,३५,४७७ हे. क्षेत्रास जलसिंचन होते. धरणावर गांधी मिनार व नेहरू मिनार हे दोन निरीक्षण मनोरे आहेत. या धरणाखाली बुर्ला व चिपीलीमा या दोन जलविद्युत्निर्मिती केंद्रांतून जलविद्युतनिर्मिती करण्यात येत असून त्यांची जलविद्युतनिर्मिती क्षमता ३०७.५० मेवॉ. आहे. 

 

या बहूद्देशीय योजनेमुळे महानदीच्या विस्तृत प्रदेशातील ९,५०० चौ.किमी. क्षेत्राचे पूरनियंत्रण झाले आहे. तसेच जलसिंचन सुविधेमुळे संबळपूर जिल्ह्यात तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या प्रदेशास ओडिशाचे तांदळाचे कोठार मानतात. हिराकूद ॲल्युमिनियम प्लँट, ब्रिजराजनगर येथील कागद कारखाना, राजगंजपूर येथील सिमेंट कारखाना तसेच राउरकेला येथील लोह-पोलाद कारखाना यांशिवाय करक, पुरी, संबळपूर, मयूरभंज, बोलानगीर इ. जिल्ह्यांतील लहान-मोठ्या कारखान्यांना येथील वीजनिर्मितीचा फायदा झालेला आहे. त्याच्या जलाशयात मासेमारीही चालते. याचे नजीक देब्रीगढ अभयारण्य विकसित करण्यात आलेले असून धरण परिसरास अनेक पर्यटक भेट देतात. 

आवटी, अनिता जयपाल