हिदायतुल्ला राष्ट्रीय विधि विद्यापीठ : छत्तीसगढ राज्यातील कायदेविषयक शिक्षण देणारे निवासी विद्यापीठ. ते देशातील सहा विद्यापीठांपैकी एक असून हिदायतुल्ला राष्ट्रीय विधी विद्यापीठअधिनियम क्र. १० (२००३) अन्वये त्याची स्थापना रायपूर येथे करण्यात आली (२८ जानेवारी २००४). कायदेविषयक प्रगत ज्ञान व संशोधन यांचा प्रसार-प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय विकास साध्य करण्याच्या भूमिकेशी सुसंगत अशी विद्यापीठाची कार्यपद्धती आहे. त्याला अनुसरून विद्यार्थी व विद्याव्यासंग यात उत्तरदायित्व निर्माण करून विधी क्षेत्रातील कायद्यांची समाजात जागृती निर्माण करण्याचे कौशल्य त्यांच्यात वृद्धिगंत करून त्यांना उत्तम वकिलीचे प्रशिक्षण देणे, हे विद्यापीठाचेप्रमुख उद्दिष्ट आहे. छत्तीसगढ राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश हे या विद्यापीठाचे कुलपती असतात. विद्यापीठ अनुदान आयोग त्यास सर्व प्रकारची अनुदाने देतो. ती पात्रता त्यास प्रथमपासून प्राप्त झाली आहे. बी.ए. आणि बी.एस्सी., एल्एल्.बी., एल्एल्.एम्. व विधी विषयात पीएच्.डी. या पदव्यांच्या अध्यापनाची-मार्गदर्शनाची येथे सोय आहे. यांशिवाय या पदव्यांसोबत भाषा, वैकल्पिक विधी व कायदे या अंतरक (कोअर) विषयांचे शिक्षण सक्तीचे असते. विद्यापीठाचा वैशिष्ट्य-पूर्ण घटक गुण म्हणजे त्याच्या सहा विद्याशाखा आणि त्यांच्या अंतर्गत कार्यरत असलेली प्रत्येक विद्याशाखेची सहा केंद्रे होत. त्या विद्याशाखा अशा : (१) सामाजिक विज्ञाने व कायदेविषयक कार्यपद्धती, (२) संवैधानिक आणि प्रशासकीय कार्यपद्धती, (३) आंतरराष्ट्रीय विधी अध्ययन, (४) विज्ञान, तंत्रविज्ञान आणि निरंतर विकास, (५) व्यवसाय आणि जागतिक श्रमिक विधी विकास व न्याय, (६) प्रशासन, निरंतर व निदानीय विधी अध्ययन. विद्यार्थ्यांना न्यायालयातील कार्यपद्धती अंगवळणी पडावी किंवा तिचा परिचय व्हावा यासाठी वादविवाद, अभिरूप न्याया-लयाची कार्यशाळा प्रत्येक षण्मास परीक्षेच्या वेळी घेतली जाते. त्यामुळे देशातील अन्य विधी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचारविनिमय घडून येतो.तसेच न्यायिक व्यावहारिक प्रशिक्षण मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याला मार्च-एप्रिल दरम्यान सहा ते आठ आठवडे सामाजिक समूह, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आदींमधून वर्गपरत्वे उमेदवारी करावी लागते. विद्यापीठात वादविवाद मंडळ, क्रीडा मंडळ, सांस्कृतिक मंडळ वगैरे मंडळे असून त्यांतून विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी उत्तेजन दिले जाते. 

भटकर, जगतानंद