हिटाइट : तुर्कस्तानातील प्राचीन ॲनातोलिया भूभागातील इंडो- -यूरोपियन भाषिक समूहातील लोक व त्यांची संस्कृती. बहुतेक पुरातत्त्वज्ञ हिटाइट लोक हे काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील मध्य आशियातूनइ. स. पू. २००० च्या पूर्वसंध्येला तुर्कस्तानात आले असावेत, या मताचे आहेत. त्यांची इ. स. पू. १९००–१२०० दरम्यान ॲनातोलियात अधिसत्ता होती. प्रारंभी त्यांनी हळूहळू तेथील लोकांवर वर्चस्व प्रस्थापित करून व्यापारी मार्ग व धातूच्या संसाधनावर ताबा मिळविला (इ. स. पू. १७५०). त्यांच्या प्रारंभीच्या राजाने नगरराज्यांना जिंकून त्याचे एक संघराज्य केले. नंतर त्यांचा राजा पहिला हटुसिलिस (कार. इ. स. पू. १६५०–१६२०) याने सभोवतीचा प्रदेश जिंकून बोगाझकई (हॅटुसस) येथे राजधानी स्थापून प्रारंभीच्या हिटाइट साम्राज्याचा पाया घातला.त्याने बोगाझकई शहराला तटबंदी बांधून त्यात प्रासाद व मंदिरेबांधली. त्या मंदिरांतील याझिलिकया या हिटाइट देवतेचे मंदिर भव्यअसून कोटाच्या महाद्वारावर सिंह, लढवय्ये यांची उठावदार शिल्पे कोरली होती तथापि हटुसिलिस युफ्रेटीसच्या उत्तरेकडील व्यापारी मार्ग हस्तगत करण्यात अयशस्वी ठरला. त्यानंतर त्याचा नातू पहिला मुरशिलिश याने अलेप्पो घेऊन युफ्रेटीस नदीपासून बॅबिलोनपर्यंतचा प्रदेश पादाक्रांत केला( इ. स. पू. १५९५) आणि ॲमोराइटांना नामोहरम केले. त्याच्या खुनानंतर राज्यात अनागोंदीस प्रारंभ झाला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या तेलिपिनस( कार. इ. स. पू. १५००–१४५०) याने काही प्रमाणात राज्याची घडी नीट बसविण्याचा प्रयत्न केला परंतु हुरियनांनी मितानीचे राज्य संघटित केले होते. त्यांनी उत्तर सिरिया काबीज केला. तसेच ईजिप्तने भूमध्य-सामुद्रिक प्रदेशाच्या पूर्व किनाऱ्यावर आक्रमण केले. त्यामुळे हिटाइट साम्राज्याचा संकोच झाला (इ. स. पू. १४५०). त्याच सुमारास टुढालियस याने नवीन घराण्याची स्थापना करून हिटाइट नवसाम्राज्याची पायाभरणी केली. त्याच्या आधिपत्याखालील लष्कराने उत्तर सिरियावर वर्चस्व मिळवून ॲनातोलियाच्या पश्चिम व वायव्य भागांत स्वाऱ्या केल्या आणि पूर्वेकडील इसुवा जिंकून मध्य-पूर्वेतील तांब्याच्या खाणींवर वर्चस्व मिळविले पण पश्चिम ॲनातोलियातील अर्झाबच्या राजाने हिटाइटांच्या राज्य विस्तारास पायबंद घातला.
सुप्पिलुलियमसच्या (इ. स. पू. १३८०–१३४६) कारकिर्दीत हिटाइटांचे साम्राज्य मेसोपोटेमियातील बहुतेक प्रदेशांवर पसरले होते. हिटाइट साम्राज्याचा हा सुवर्णकाळ होय. त्याने इसुवा पादाक्रांत करून मितानी राज्य उद्ध्वस्त केले. तिसऱ्या आमेनहोतेप (इ. स. पू. १४४५–१३७२) नंतर ईजिप्तची लष्करी सत्ता कमकुवत झाल्यावर मितानीने हिटाइटांचे मांडलिकत्व पतकरले. नंतर हिटाइटांनी इ. स. पू. १३६० मध्ये त्यांची राजधानी वॅसक्कनी लुटली. उत्तर सिरियाचे पुनर्घटन केले. कारकेमिशच्या सभोवती छोट्या नगरराज्यांचे कडे निर्माण केले. अर्झाबवर ताबा मिळविला. सुप्पिलुलियमसने हिटाइटांचा राज्यसंघ बळकट केला आणि अनेक नगरराज्यांना मांडलिक केले.
सुप्पिलुलियमसनंतर दुसरा मुरशिलिश (कार. इ. स. पू. १३४५–१०) व पुढे मुबातलिस (कार. इ. स. पू. १३१०–१२९४) यांच्या कारकिर्दीत सिरियाच्या वर्चस्वासाठी हिटाइट व ईजिप्त यांत संघर्षउद्भवला आणि त्यातून इ. स. पू. १२७४ मध्ये ओरेंटिस नदीकाठी कादेश येथे युद्धास सुरुवात झाली. या अनिर्णित घनघोर युद्धाचा शेवट शांतता तहात झाला आणि हिटाइट राजकन्या दुसऱ्या रॅमसीझशी विवाहबद्धझाली. त्यानंतरच्या तिसऱ्या हटुसिलिसच्या वेळी (इ. स. पू. १२८७–१२६५) अर्झाब व अन्य मांडलिक नगरराज्यांनी राज्यसंघातून फुटून स्वातंत्र्य जाहीर केले आणि चौथ्या टुढालियसच्या वेळी (इ. स. पू. १२६५–१२४०) राज्याचा संकोच होऊन तांब्याच्या खाणीवरील मालकी ॲसिरियाकडे गेली. तिसऱ्या सुप्पिलुलियमसच्या कारकिर्दीत (इ. स.पू. १२२५–१२००) यूरोपच्या आग्नेय भागातून फ्रिजियन जमातींनी ॲनातोलियात घुसखोरी केली. त्यांनी व्यापारी मार्ग बंद करून अर्झाब उद्ध्वस्त केले. बोगाझकई लुटली. त्यामुळे हे नवसाम्राज्य संपुष्टात आले. त्यानंतर हिटाइटांची छोटी नगरराज्ये कशीबशी तग धरून होती. त्यातून कारकेमिशचे नव-हिटाइटांचे नगरराज्य उदयास आले (इ. स. पू. १०५०–७००). अखेरीस ॲसिरियनांनी ते पादाक्रांत करून हिटाइट राजांना मांडलिक केले.
हिटाइट हा एक अनिर्बंध राज्यसंघ होता तथापि त्यांनी मध्य-पूर्वेत साम्राज्य स्थापून अनेक नगरराज्यांवर अधिसत्ता मिळविली. त्यांनी वास्तुकला, शिल्पकला, वाङ्मय यांत प्रगती केलेली होती. बोगाझकई, टेल-एल् अमार्ना, कारकेमिश या प्राचीन नगरांतील उत्खननांत मिळालेल्या शिलालेखांवरून आणि लिखित मृण्पत्रांवरून हिटाइट संस्कृतीची वैशिष्ट्ये ज्ञात होतात. लोखंड गोळा करून त्याची आयुधे तयार करण्याची विद्या त्यांना साध्य झालेली असल्याने शेजारच्या राज्यांना लोखंड व लोखंडी आयुधे पुरविणे, हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. किंबहुना लोखंडाचा उपयोग वस्तुनिर्मितीसाठी करणारे ते कदाचित पहिले राज्यकर्ते असावेत. प्रथम व द्वितीय साम्राज्यकाळात दोन वेगवेगळ्या भाषा आणि लिपी–क्यूनिफॉर्म व हायरोग्लिफिक – त्यांनी वापरली होती. त्यातून त्यांचे राजकीय पत्रव्यवहार, तहनामे, हुकूमनामे, पुराणग्रंथ, अश्वविद्या, विधिसंहिता आणि वैद्यकशास्त्रावरील ग्रंथ आढळतात. त्यांचा हिटाइट-बॅबिलोनियन-सुमेरियन शब्दकोश उपलब्ध आहे. प्राचीन शहराच्या ठिकाणी बळकट तटबंद्या, मोठे दगडी प्रासाद यांचे अवशेष आढळले असून तेथील द्वार-शाखांवर अर्ध-उठावात शिल्पकाम केलेले आढळले. त्यांनी वास्तूच्या सजावटीसाठी शिल्पाचा सर्वप्रथम वापर केला असावा. हिटाइटांच्या कलेवर प्रारंभी सुमेरियन व नंतर ईजिप्शियन कलाप्रवाहाची छाप आढळते. चंद्र, सागर, शेत, नगरदेवता, मातृदेवता यांची पूजा, प्रार्थना व यज्ञ यांद्वारे उपासना केली जाई. त्यांची मुख्य देवता सूर्य असून ते राजाला सूर्याचा अवतार मानीत. त्यांचा विश्वात्मक देववाद हा बॅबिलोनिया, ॲसिरिया व हुरियन चरेश्वरवादाची उसनवारी होता. त्यांच्या कथा-पुराणे व चालीरीतींवर बॅबिलोनियन संस्कृतीचा प्रभाव असून ॲसिरियन कला, वास्तुशिल्प यांवर हिटाइट संस्कृतीचा प्रभाव आढळतो.
संदर्भ : 1. Ceram, C. W. The Secret of the Hitites, London, 1956.
2. Garstang, John, The Hitite Empire, Gordon Press, 1976.
3. Held, Warren H. and Others, Beginning Hitite, Bloomington, 1988.
माटे, म. श्री.
“