हिंगीस, मार्टिना : (३० सप्टेंबर १९८०). आंतरराष्ट्रीय ख्यातीची स्विस महिला टेनिसपटू. तिचा जन्म स्लोव्हाकियातील कॉशित्से या शहरात एका सधन व क्रीडाप्रेमी कुटुंबात झाला. आई मेलनी मॉलीतोरोव्हा व वडील कारोल हिंगीस हे दोघेही टेनिस खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे बालपणापासूनच मार्टिनाला टेनिसमध्ये रुची होती. वयाच्या चौथ्या वर्षीच तिने टेनिसच्या सामन्यात सहभाग घेतला (१९८३). ती सहा वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. पुढे ती आपल्या आईसोबत स्वित्झर्लंडमधील त्रूपाक येथे स्थायिक झाली. 

मार्टिना हिंगीस

मार्टिना हिने फ्रेंच ओपनमधील कुमार गटातील टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकाविले (१९९३ १९९४) . चौदाव्या वर्षापासून तिने व्यावसायिक टेनिसमध्ये खेळण्यास सुरुवात केली. पुढे तिने ग्रँडस्लॅम एकेरीत तीन वेळा ऑस्ट्रेलियन ओपन (१९९७ १९९८ १९९९), दोन वेळा फ्रेंच ओपन (१९९७ १९९९), अमेरिकन ओपन (१९९७), विंबल्डन (१९९७), या स्पर्धा जिंकून जागतिक क्रमवारीत आपले स्थान निश्चित केले (३१ मार्च १९९७). ग्रँडस्लॅम दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन (१९९८) स्पर्धा जिंकून जागतिक क्रमवारीत तिने प्रथम स्थान पटकाविले (८ जून १९९८).  

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारीमार्टिना ही सर्वांत लहान टेनिसपटू ठरली (१९९७). १९९७ च्या एका कॅलेंडर वर्षातील सहा महिन्यांत तिने टेनिसचे ३७ सामने जिंकून नवाविक्रम प्रस्थापित केला. विंबल्डनमध्ये विजेतेपद पटकविणारी सर्वांतलहान टेनिसपटू म्हणून तिची नोंद द गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्येझाली (१९९९). असामान्य गुणवत्ता, कौशल्य आणि जिद्द ही त्रिसूत्री आणि दोन्ही हातांनी जबरदस्त ताकदीने मारलेला पार्श्वहस्त (बॅकहँड) टोला यांच्या जोरावर तिने वयाच्या विशीच्या आतच आंतरराष्ट्रीय टेनिसपटू होण्याचा मान मिळविला. दरम्यान पायाच्या दुखापतीमुळे तिने टेनिस-मधून काही काळ निवृत्ती घेतली (२००३). या सुमारास तिने फक्त मनोरंजनासाठी टेनिस, अश्वारोहण व अभ्यास यांत लक्ष केंऽद्रत करण्याचे ठरविले. पुढे उपचार आणि पुरेशा विश्रांतीनंतर तिने टेनिसमध्ये पुनर्प्रवेश केला (२००६). दुसऱ्या पदार्पणातच तिने ग्रँडस्लॅम मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजेतेपद मिळविले (२००६). २००७ मधील विंबल्डन स्पर्धेत उत्तेजक द्रव्य चाचणीत ती दोषी आढळली तथापि तिने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. अखेर तिने प्रासंगिक व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली (२००७). पुढे ती थिबॉल्ट हतीन या २४ वर्षीय फ्रेंच अश्वारोहणपटूशी विवाहबद्ध झाली (२०१०). त्यानंतर लिंड्से डेव्हनपोर्टच्या साथीत तिने खुल्या दुहेरीस्पर्धेत मार्टिना नवरातिलोव्हा आणि याना नोव्हॉत्ना या जोडीचा पराभव करून रोलां गॅरोस विमेन्स लिजेंड पदक मिळविले (५ जून २०११). मार्टिनाने आपल्या टेनिसच्या कारकिर्दीत ४० एकेरी (सिंगल्स) आणि३६ दुहेरी (डबल्स) स्पर्धा जिंकल्या असून तिने जागतिक स्तरावर एकेरीतील पहिला क्रमांक सुमारे २०९ आठवडे उपभोगला. टेनिस या नियतकालिकाने २००५ मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट ४० खेळाडूंमध्ये तिचा समावेश केला होता. 

मार्टिनाच्या टेनिसमधील कर्तृत्वाबद्दल तिला विविध मानसन्मानमिळाले. टेनिस नियतकालिकाचे ‘फीमेल रूकी ऑफ द यिअर’ ॲवॉर्ड (१९९५) विमेन्स टेनिस असोसिएशनचे (डब्ल्यू.टी.ए.) ‘मोस्ट इम्प्रेसिव्ह न्यूकमर’ ॲवॉर्ड (१९९६) व ‘टीम ऑफ द यिअर’ या पुरस्काराची सहमानकरी (१९९८ १९९९) बीबीसी क्रीडाविभागाचे ‘पर्सनॅलिटीऑफ द यिअर’ ॲवार्ड (१९९७) लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स ॲकॅडेमीचे ‘वर्ल्ड कमबॅक ऑफ द यिअर’ ॲवार्ड (२००६) इ. पुरस्कार तिला लाभले. टाइम या नियतकालिकाने टेनिसमधील तीस ख्यातकीर्त खेळाडूंमध्ये तिचा समावेश केला (२०११). मार्टिनाने लिअँडर पेसच्या साथीने मिश्र दुहेरी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजेतेपद मिळविले (२०१५). 

मिठारी, सरोजकुमार