हॉकी : भारताचा राष्ट्रीय खेळ. इतर परदेशी खेळांप्रमाणेच हॉकी हा खेळ भारतात ब्रिटिश सैनिकांद्वारेच प्रविष्ट झाला. या खेळाचा इतिहास खूपच मनोरंजक आहे. ईजिप्तमध्ये इ. स. पू. ४००० वर्षांपूर्वीची हॉकी- सदृश रेखाटलेली चित्रे उपलब्ध आहेत. प्राचीन ग्रीसमध्ये इ. स. पू. पाचव्या शतकातील एका भित्तिचित्रात दोन स्पर्धक लाकडाच्या फळकुटाने चेंडू-सारख्या वस्तूवर प्रहार करीत असल्याचे दृश्य आहे. मध्ययुगात यूरोपात हॉकीसारख्या खेळाला हर्लींग (आयर्लंड), शिंटी (स्कॉटलंड), बॅन्डी( वेल्स-इंग्लंड) अशी नावे प्रचलित होती. भारतात पंजाबमध्ये अशाच प्रकारचा ‘खिद्दी खुंडी’ नामक खेळ होता. गाल्वेच्या (आयर्लंड) कायद्यात १५२७ मध्ये सर्वप्रथम हॉकी या शब्दाचा वापर अधिकृतपणे करण्यात आला. १८६१ मध्ये ब्लॅक हीथ रग्बी अँड हॉकी क्लबची स्थापना इंग्लंडमध्ये झाली. इंग्लंडमध्येच १८८६ मध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना झाली व सुसूत्र नियमावली तयार करण्यात आली. ऑलिंपिक सामने सुरू झाल्यावर दुसऱ्याच वर्षी त्यांत हॉकीचा अंतर्भाव करण्यात आला. हॉकीच्या खेळाची अधिकृत नियमावली तयार झाल्यापासून त्याच्या स्वरूपात आमूलाग्र बदल झाला. शिवाय तो कमी खर्चाचा खेळ असल्या-मुळे सर्व स्तरांतील लोकांना परवडणारा ठरला. तो अनेक देशांचा राष्ट्रीय खेळ झाला असून केन्या, जपान, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, भारत या पूर्वेकडील देशांत अत्यंत लोकप्रिय आहे. भारतात कलकत्ता( कोलकाता) येथे १८८५ मध्ये पहिला हॉकी क्लब स्थापन झाला. इंडियन हॉकी फेडरेशनची स्थापना ७ नोव्हेंबर १९२५ रोजी झाली. १९२८ मध्ये ॲम्स्टरडॅम ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघाने हॉकीचे सुवर्णपदक प्राप्त केले आणि त्यानंतर १९३२–५६ पर्यंत ऑलिंपिकमधील हॉकीच्या सुवर्णपदकांवर फक्त भारताचेच नाव कोरले गेले. १९६४ आणि १९८० मध्ये पुन्हा भारताने ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदके मिळविली. १९७० च्या दशकात कृत्रिम हिरवळीवर सामने खेळवले जाऊ लागले आणि भारतीय संघाच्या खेळाला उतरती कळा लागली. १९७१ पासून हॉकीचे विश्वचषक सामने सुरू झाले. दर चार वर्षांनी हे जागतिक सामने होतात.
महिला संघांमध्ये हॉकीचा खेळ खेळविण्यात आल्याचा इतिहासतसा अलीकडचाच आहे. पूर्वी ब्रिटिश विद्यापीठांमधून मुलींमध्ये हॉकी खेळली जात होती पण महिलांची हॉकी संघटना ही १९२७ मध्येसर्वप्रथम स्थापन झाली आणि महिला हॉकी संघ देशपरत्वे तयार झाले. मॉस्को येथील ऑलिंपिकमध्ये महिला हॉकी सामने प्रथम घेण्यात आले (१९८०). त्यांच्यासाठी हॉकीचे स्वतंत्र नियम नाहीत.
हॉकीचे क्रीडांगण : ९१·४० मी. लांब आणि ५५ मी. रुंद( म्हणजेच १०० × ६० यार्ड) एवढ्या आकाराच्या आयताकृती क्रीडां-गणामध्ये हा खेळ खेळला जातो. लांबीला बाजू रेषा व रुंदीला गोल रेषा म्हणतात. क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूंना गोल रेषेवर मध्यभागी ३·६६ मी. (१२ फूट) रुंद व २·१४ मी. (७ फूट) उंच गोल असतात. गोलाच्या बरोबर मधल्या भागापासून १४·६३ मी.चे (१६ यार्ड) अर्धवर्तुळ असते, त्याला स्ट्राइकिंग सर्कल (डी सर्कल) म्हणतात. प्रत्येक गोलाच्या मध्यबिंदूपासून लंब अंतरावर ६·४० मी.वर केलेल्या खूणेस ‘पेनल्टीस्पॉट’ म्हणतात. डिफेंडिंग म्हणजे प्रतिस्पर्ध्यापासून आपल्या गोलाचे संरक्षण करणे. इव्हेडिंग म्हणजे संरक्षकापासून तो चेंडू पळवून नेणे, म्हणजेच तो ड्रिबल (हळूहळू पुढे नेणे) करत किंवा पास करत आपल्या बाजूच्या खेळाडूंच्या हवाली करून प्रतिपक्षाच्या गोलावर तुटून पडणे. चेंडू स्वतःच्या नियंत्रणात ठेवता येणे, ही या खेळातली सर्वांत महत्त्वाची बाब आहे. हॉकीचा सामना दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात ११ खेळाडू असतात. त्यांपैकी ५ फॉरवर्ड, ३ हाफ बॅक, २ बॅक आणि १ गोलरक्षक (गोलकीपर) अशा क्रमाने आपापल्या जागेवर क्रीडांगणात उभे राहतात तथापि सोयीनुसार इतर रचनाही ते वापरतात.
खेळाडूंच्या जागा :सेंटर फॉरवर्ड : सेंटर फॉरवर्डवर असलेल्या खेळाडूचे मुख्य उद्दिष्ट प्रतिपक्षावर गोल करणे हे असते. सेंटर हाफ : हा एकाच वेळी संरक्षणाचा आणि दुसऱ्या गोलावर तुटून पडण्याचे काम करत असतो. सेंटर हाफ हा प्रामुख्याने गोल करण्याच्या मध्यवर्ती भूमिकेत असतो. राइट हाफ आणि लेफ्ट हाफ : हे प्रतिपक्षावर हल्ला चढवणारे आणि फॉरवर्डला हल्ला चढवण्याच्या कामी मदत करणारे खेळाडू असतात. राइट बॅक आणि लेफ्ट बॅक : हे सर्व संघाचे संरक्षक आधार असतात. गोलरक्षक : हा प्रतिपक्षाच्या हल्ल्यापासून आपल्या गोलाचे संरक्षण करतो.
गोल तीन प्रकारे केला जातो : (१) मैदानी गोल : चेंडू संरक्षक फळीला चकवत गोलापर्यंत घेऊन जाऊन तो गोलरक्षकालाही चकवून गोलपोस्टला लक्ष्य करणे. (२) पेनल्टी कॉर्नर : संरक्षक खेळाडूंपैकी कोणी नियमाचा भंग केला, प्रतिस्पर्धी खेळाडूला जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला, तर प्रतिस्पर्धी संघाला पेनल्टी कॉर्नर बहाल केला जातो. कॉर्नरसाठी कोपऱ्यातील निशाणाच्या दोन्ही बाजूंस प्रत्येकी ४.५९ मी. अंतरावर खुणा केलेल्या असतात. यासाठी गोलाच्या दोन्ही बाजूंस गोल-स्तंभापासून ४.५९ मी व ९.१८ मी. अंतरावर गोल रेषेवर आतील बाजूस खुणा केलेल्या असतात. खेळाडूंपैकी एकजण कॉर्नरचा ताबा घेतो आणि इतर खेळाडू तो चेंडू गोलात ढकलण्यासाठी सिद्ध होतात. यालाच गोल चढवणे म्हणतात. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे खेळाडू स्ट्राइकिंग वर्तुळाच्या बाहेरच असणे आवश्यक असते. या वेळी त्या गोलरक्षकाला मदत करण्यासाठी गोलात गोलरक्षक धरून पाच खेळाडू उभे केले जातात. नवीन नियमाप्रमाणे (२०१४) ओन गोल किंवा सेल्फ गोल म्हणता येईल, त्यात बदल झाला आहे. प्रतिपक्षाच्या खेळाडूने टोलवलेला चेंडू जर गोलपोस्टमध्येच (सर्कलमध्ये असताना) राहिला आणि तो जर सर्कलबाहेर (डी) गेला नाही आणि त्याने जर गोल रेषा पार केली असेल, तर तो गोल धरण्यात यावा. दुसरा नियम असा की, आक्रमकाने (ॲटॅकर) टोलवलेला चेंडू जर तो परतवून लावण्यापूर्वी सर्कलमध्ये असतानाच बचावफळीच्या ( डिफेंडर) खेळाडूच्या शरीराला स्पर्श करून गेला असेल, तर तोही गोल मानण्यात यावा. (३) पेनल्टी स्ट्रोक : पूर्वी ७० मिनिटांचा हा खेळ ३५ मिनिटांच्या दोन अर्ध्या भागांत विभागलेला होता. मध्यांतर पाच मिनिटांचे असे. नवीन नियमाप्रमाणे (२०१४) हा कालावधी ६० मिनिटांचा केला असून एकूण २० मिनिटांची दोन मध्यांतरे असतील. यात कोणीच गोल करू शकले नाही, तर तो खेळ बरोबरीत झाला असे मानले जाते. पुन्हा १० मिनिटे जादा खेळ होतो व त्यातही निकाल लागला नाही, तर प्रत्येक संघास पाच-पाच पुश दिले जातात.
काठी (स्टिक) : हॉकीची काठी ही लाकडाची असून तिचे वजन पुरुषांसाठी ७९४ ग्रॅ.पेक्षा जास्त नसावे व महिलांसाठी ६५२ ग्रॅ.पेक्षाजास्त नसावे. इंग्रजी कॅपिटल ‘जे’ अक्षराच्या आकाराची काठी असूनतिचे पाते एका बाजूने चपटे व मागील बाजूने लांब असते. ते ५.१२ सेंमी. पेक्षा रुंद नसावे. कोणत्याही खेळाडूने काठीच्या मागील बाजूने खेळूनये, असा नियम आहे. खेळाडूची काठीवर असणारी पकड ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे.
चेंडू : चेंडू शक्यतो पांढऱ्या रंगाचा असतो. त्याचे वजन १५५.९ ग्रॅ. ते १६३ ग्रॅ. असते. त्याचा परीघ २२.४ सेंमी. ते २३.५ सेंमी. असतो.
गणवेश : प्रत्येक संघाचा गणवेश ठरलेला असतो मात्र गोल-रक्षकाचा पोशाख वेगळा असतो. क्रिकेटच्या यष्टिरक्षकाप्रमाणे पॅड्स, ग्लोव्ह्ज व शिरस्त्राण (हेल्मेट) यांसारखी इतर संरक्षक साधनेही तो वापरतो. महिलांसाठी स्कर्ट वापरण्याविषयी नियम आहे पण अलीकडे स्कर्ट आणि आतल्या बाजूला सायकलिंगसाठी वापरण्यात येणारे स्कोर्ट्स( स्कर्ट आणि शॉर्ट्स यांचे एकत्रीकरण) वापरतात. कोणत्याही स्त्री अथवा पुरुष खेळाडूने अंगावर दागिने घालू नयेत, असा नियम आहे. या खेळात दोन पंच असतात. प्रत्येकजण मैदानाच्या अर्ध्या भागावर नियंत्रण ठेवतो.
खेळाडूंना त्यांच्या गैरवर्तनाबद्दल शिक्षेलाही सामोरे जावे लागते.एखाद्या खेळाडूने पहिल्यांदा चूक केली असेल तर त्याला समज दिली जाते. त्यानंतर त्याला इशारा देण्यात येतो. तो हिरव्या रंगाच्या कार्डाने पंचांकडून व्यक्त होतो. पिवळे कार्ड ज्याला दाखविण्यात येते, त्याला खेळातून तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केले जाते. त्यानंतरही त्याच्या हातून गैरवर्तन घडल्यास त्याला लाल कार्ड दाखवले जाते. तो खेळाडूत्या सामन्यापुरता बाहेर बसतो. ब्रूमी एरिक पिनिंजर (१९०२–९६) हा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविणारा (१९२८) पहिला भारतीय हॉकी खेळाडू असून सी. देशामुथू हा हॉकी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा भारताचा सर्वांत लहान खेळाडू होय. आंतरराष्ट्रीय सामन्यांत हॉकीचे हजार गोल करणारा मेजर ⇨ ध्यानचंद हा एकमेव भारतीय हॉकीपटू असून त्यास पद्मभूषण ह्या किताबाने गौरविले आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्त्रियांच्या हॉकीसाठी ‘महाराजा रणजितसिंग सुवर्णपदक’ आणि उत्कृष्ट महिला खेळाडूस ‘ट्रॉमी एमार सुवर्णपदक’ दिले जाते.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने हॉकीच्या जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाला नववे स्थान जाहीर केले (२०१४). हेग येथे झालेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकाविले (२०१४).
वरील मैदानी हॉकीप्रमाणेच बर्फावरील हॉकी हाही खेळ विशेष लोकप्रिय आहे.
पहा : ध्यानचंद बर्फावरील खेळ.
संदर्भ : धरम, विनोद, आंतरराष्ट्रीय विविध खेळ, मुंबई, १९९९.
गोखले, अरविंद व्यं.
“