हार्टमान, एडूआर्ट फोन : (२३ फेब्रुवारी १८४२–५ जून १९०६). जर्मन तत्त्वज्ञ. त्याचा जन्म बर्लिन येथे झाला. त्याचे पूर्ण नाव कार्ल रॉबर्ट एडूआर्ट फोन हार्टमान. त्याने काही काळ लष्करी प्रशिक्षण घेतले तथापि गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो तत्त्वज्ञानाकडे वळला. त्याच्या द फिलॉसफी ऑफ द अन्कॉन्शस (१८८४, इं. भा.) या ग्रंथामुळे तो प्रसिद्धीस आला. त्याने व विख्यात जर्मन तत्त्वज्ञ ⇨ आर्थर शोपेनहौअर याने मिळून ? हेगेल याच्या अतिरेकी बुद्धि-वादाविरुद्ध पहिले जोरदार बंड उभारले. बुद्धी ही विश्वाचा आधार आहे, हे हेगेल याचे म्हणणे खोडून काढण्यासाठी या दोघांनी असे प्रतिपादन केले की, बुद्धी ही मानवाच्या उत्क्रांतीनंतरच निर्माण झाली असून अखिल विश्वाची उभारणी केवळ त्यात दडलेल्या सहजप्रवृत्ती अथवा इच्छाशक्तींवर चालत असते. शोपेनहौअर याने विश्वनिर्मात्या शक्तीला ‘अंध’ म्हटले आहे, याचे कारण हेच. हार्टमान यानेही विश्वाच्या मूलतत्त्वाला ‘अचेतन’ म्हटले आहे. याचा अर्थ त्यात चैतन्य अथवा बुद्धी नसते हे नसून, ते (चैतन्य) या तत्त्वाचा विकास झाल्यावरच निर्माण होते, असे त्याचे मत आहे. अचेतन एकाच वेळी विचारात्मक व इच्छात्मक असते, असे तो मानतो आणि वैज्ञानिक सत्याकडे साशंकपणे पाहतो. विज्ञान हे परिकल्पना किंवा गृहीतक( हायपॉथिसिस) आहे. त्यात खरेपणाची संभावना कमी-अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे आपण बाह्य जगातील काही गुणांचीच निवड करतो व इतरांकडे दुर्लक्ष करतो. ही निवड करण्याचा निकषही पारिकाल्पनिक असल्याने जसजसा आपला वास्तविकतेशी संबंध कमी होत जाईल, तसतसे तिच्यातले सत्याचे प्रमाण घटत जाईल. शक्ती, जडता, घनत्व इ. सर्वोच्च वैज्ञानिक परिकल्पनांमध्ये तर ही गोष्ट निर्विवादपणे प्रत्ययास येते.
हार्टमानच्या मते, बाह्य जगतासारखी काहीतरी एक वस्तू आहे वया विश्वातील निसर्गनियम सत्य आहेत, ही एक सिद्धांतपरिकल्पनाआहे. भौतिक विज्ञानात जसजशी आपली प्रगती होईल, तसतसे प्रत्येक निसर्गनियमांच्या संभाव्यतेचे प्रमाण कदाचित ठरविता येईल परंतु ह्यामुळे संभाव्यतेची लक्ष्मणरेषा ओलांडून निश्चिततेच्या कक्षेत आपण कधीही पदार्पण करू शकणार नाही. हार्टमान याची तात्त्विक पद्धतीदेखील एक सिद्धांत परिकल्पनाच आहे कारण जे अचेतन ज्ञान-क्रिया व वास्तवजगाचे सामान्य कारण आहे असे आपण मानतो, ते इतर कारणांप्रमाणेच पारिकाल्पनिक होय.
हार्टमानच्या मते, मानवाची उत्पत्ती झाल्यापासून इच्छाशक्ती व बुद्धी यांमध्ये फारकत झाली असून दोघांमध्ये सतत संघर्ष चालू आहे. जेव्हा निराशावाद्याच्या जाणत्या मनात या द्वंद्वातून बुद्धीची सोडवणूक होते, त्यावेळीच आपण अस्तित्वाच्या दुःखातून मुक्त होतो. तो पुढे असेहीम्हणतो की, वास्तविक सर्व सुबुद्ध लोकांनी सांसारिक दुःखातून आपली सोडवणूक करून घेण्याकरिता सामूहिक प्रयत्न करायला हवा. त्यांनी अनस्तित्वाचा ध्यास घेतला पाहिजे. सभ्यतेचा अर्थच मुळी जीवितेच्छा नाहीशी करून, अस्तित्वाच्या संकटातून अचेतनाची क्रमाक्रमाने सुटका करून घेणे हा आहे. सुख हे केवळ मृगजळ असून त्यामागे धावण्यात अर्थ नाही. आत्महत्या किंवा स्वार्थीपणाचा कोणताही मार्ग निंदनीय आहे. मानवाने दुःखातून संपूर्ण सुटका होईतोवर जगण्याचा प्रयत्न करावा व सामाजिक विकासासाठी झटावे. तसे केल्यास नीतिमत्तेमुळेही जीवनातले दुःख कमी होते, असे प्रत्ययास येईल.
ग्रॉस लिक्टरफेल्ड (जर्मनी) येथे त्याचे निधन झाले.
दाभोळे, ज. रा.
“