हार्व्हर्ड विद्यापीठ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक प्रतिष्ठित, प्राचीन व प्रख्यात विद्यापीठ. मॅसॅचूसेट्स बे कॉलनीच्या विधी समितीने सार्वमत घेऊन १६३६ मध्ये या विद्यापीठाची स्थापना केली. प्रमुख विद्यापीठ क्षेत्र चार्ल्झ नदीच्या काठी बॉस्टनच्या पश्चिमेस काही किमी.वर आहे. याचे पहिले महाविद्यालय न्यूटाउन येथे सुरू झाले. चार्ल्सटाउनचा मंत्री जॉन हार्व्हर्ड याने स्वतःची २६० पुस्तके आणि आपल्या जमीनजुमल्यापैकी अर्धी संपत्ती या विद्यापीठास दिली. त्याच्या दातृत्वाच्या सन्मानार्थ या विद्यापीठास त्याचेच नाव देण्यात आले (१६३९). सुरुवातीस महाविद्यालयाचे व्यवस्थापन चर्चद्वारे केले जाई. त्यानंतरच्या पुढील दोन दशकांत हळूहळू महाविद्यालय प्रथम धर्माधिष्ठित जाचातून मुक्त झाले व नंतर राजकीय वर्चस्वातून बाहेर पडले (१८६५). हार्व्हर्डमधील माजी विद्यार्थ्यांनी व्यवस्थापक मंडळाचे सदस्य निवडून एक कार्यकारी मंडळ स्थापन केले आणि हार्व्हर्डमधील ज्येष्ठ प्राध्यापक चार्ल्स विल्यम एलियट यांची व्यवस्थापक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात (१८६९–१९०९) हार्व्हर्डचा चेहरामोहरा बदलला. दैवतशास्त्र, विधी आणि वैद्यक यांच्या स्वतंत्र विद्याशाखा सुरू केल्या पण धोरण धर्मातीत ठेवले. तसेच कला व शास्त्र विद्याशाखा स्थापण्यात आल्या (१८९०). नवीन रॅडक्लिफ महाविद्यालय स्थापन करण्यात आले (१८९४). त्यांनी फ्रान्स व जर्मनी येथून विद्वान प्राध्यापकांची देवघेव सुरू करून काही अभ्यागत प्राध्यापक नेमले. प्रशासनात शिस्त आणून ॲथलॅटिक्सच्या खेळात सुधारणा केल्या. त्यांच्या निवृत्तीच्या वेळी हार्व्हर्ड ही एक देशातील प्रभावशाली शिक्षणसंस्था म्हणून नावलौकिक पावली होती.

 

हार्व्हर्डमधील प्राध्यापक जेम्स ब्रायंट कोनट अध्यक्ष असताना (१९३३–५३) त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या व जागतिक महामंदीच्या संकटातून विद्यापीठास बाहेर काढले. अभ्यासक्रमात बदल घडवून आणला. विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरील बंधने शिथिल केली. १९७७ मध्ये विद्यापीठा-तील पदवी महाविद्यालय रॅडक्लिफ महाविद्यालयात विलीन करून सह-शिक्षणाला सुरुवात झाली. २००७ मध्ये ड्रू गिल्पन फॉस्ट या पहिल्या महिला विद्यापीठाच्या अठ्ठाविसाव्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. बॉस्टनच्या वायव्येला ५.५ किमी. अंतरावर केंब्रिज येथे हार्व्हर्ड यार्डच्या परिसरात सु. ८५ हे. क्षेत्रावर विद्यापीठाच्या शैक्षणिक संस्था पसरल्या आहेत. विद्यापीठाच्या संकुलात एकूण ११ शैक्षणिक विभाग असून १० विद्याशाखा आणि रॅडक्लिफ महाविद्यालय हे प्रगत अध्ययन केंद्र आहे. यांशिवाय व्यावसायिक प्रशाला व हार्व्हर्ड स्टेडियम चार्ल्झ नदीच्या पलीकडे अल्स्तोन येथे १४५ हे. क्षेत्रावर पसरले आहे. वैद्यकीय, दंत व सार्वजनिक आरोग्यप्रशाला लाँगवूड वैद्यकीय परिक्षेत्रात आहेत. हार्व्हर्ड विद्यापीठ ग्रंथालय संयुक्त संस्थानातील सर्वांत मोठे ग्रंथालय असून जगातील मोठ्या ग्रंथालयांपैकी एक आहे. त्यात एक कोटी ग्रंथ असून तीन स्वतंत्र वास्तूंत ते विभागले आहे. ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते यांचा संग्रह असून प्रगत अभ्यासाचे संशोधन केंद्र आहे. सर्व विषयांच्या पुस्तकांबरोबरच चिनी व जपानी भाषेतील शेकडो ग्रंथ येथे आहेत. तसेच माजी राष्ट्राध्यक्षांच्या संग्रहातील काही मौलिक ग्रंथही येथे आहेत.

 

हार्व्हर्ड विद्यापीठात ४६ पदवीपूर्व अभ्यासक्रम, १३४ पदवी अभ्यासक्रम आणि ३२ व्यावसायिक अभ्यासक्रमांची सोय आहे. २००८-०९ या शैक्षणिक वर्षात हार्व्हर्ड विद्यापीठातून १,६६४ विद्यार्थ्यांना पदवी, ४०० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, ५१२ विद्यार्थ्यांना पीएच्.डी. आणि ४,४६० विद्यार्थ्यांना व्यावसायिक पदविका-पदव्या बहाल करण्यात आल्या. विद्यापीठात २००९-१० या शैक्षणिक वर्षात २,४१० प्राध्यापक, अधिव्याख्याते व शिक्षक अध्यापन करीत होते. हार्व्हर्डच्या प्राध्यापकांपैकी अनेकजण प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, संगणक-शास्त्रज्ञ, लेखक, इतिहासकार, राजनीतिज्ञ, मुत्सद्दी आणि विधिज्ञ होऊन गेले असून जॉन ॲडम्स, जॉन क्विन्सी ॲडम्स, रदरफोर्ड हेझ, थीओडर रूझवेल्ट, फ्रँक्लिन डेलॅनो रूझवेल्ट, जॉन एफ्. केनेडी आदी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हार्व्हर्डचे माजी विद्यार्थी होत. इमर्सन, हेन्री डेव्हिड थोरो, जेम्स लोव्हेल, रॉबर्ट फ्रॉस्ट, टी. एस्. एलियट, हेन्री जेम्स इ. साहित्यिकही हार्व्हर्डचे माजी विद्यार्थी होत.

 

चौधरी, शंकर रामदास