हार्ट अर्चिन : हा एक एकायनोडर्माटा संघाच्या एकिनॉयडिया वर्गातील इर्रेग्युलॅरिया उपवर्गातील स्पॅटँगॉयडिया गणामधील सागरी अपृष्ठवंशी प्राणी आहे. त्याच्या शरीराचा आकार हृदयासारखा किंवा अंडाकृती असतो. त्याला समुद्री बटाटा (सी पोटॅटो) देखील म्हणतात. त्याचे केक अर्चिनसमुद्री अर्चिन यांच्याशी बरेच साम्यआहे. त्याच्या जैव विकासक्रमात मूळ अरीय सममितीला गौण द्विपार्श्व सममिती व्यापून टाकते, म्हणून त्याला अनियमित अर्चिन म्हणतात.

 

एकायनोकार्डियम कॉर्‌डॅटम ही सामान्य जाती सर्व समुद्रकिनारी भागांत आढळते. स्पॅटँगस परप्युरिअस ही जाती पश्चिम यूरोप, भूमध्य समुद्र (दक्षिण यूरोप व उत्तर आफ्रिका या भागातील समुद्र) व पश्चिम आफ्रिका या भागांत आढळते. जगातील सर्व उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांतील समुद्रकिनाऱ्यांवर हार्ट अर्चिन आढळत असून काही उथळ पाण्यात (सु. ४८ मी.), तर काही खोल पाण्यात (सु. ४५० मी.पर्यंत) असतात. एकायनोकार्डियम व स्पॅटँगस या प्रजातींतील काही प्राणी खोल चिखलात किंवा वाळूत आढळतात. भरती व ओहोटीच्या खुणांमधील प्रदेशांतही हे सापडतात. समुद्रात वादळे होऊन अनेक हार्ट अर्चिन समुद्रकिनाऱ्यावर फेकले जातात.

 

हार्ट अर्चिनाच्या शरीरावर बारीक काटे असून ते सहज निघूशकतात. हे काटे तपकिरी, पिवळे-तपकिरी, हिरवे व लाल अशा विविध रंगांत आढळतात. या काट्यांमुळे तो इकडून तिकडे जाऊ शकतो. नाल-पादांचा (परावर्तित नळीसारख्या पायांचा) उपयोग चालण्यासाठी होत नाही. अग्र चरणार (विथी) क्षेत्रावर विशेष प्रकारचे नालपाद असतात. हे नालपाद लांब होऊ शकतात. त्याच्या कडांवर चकतीसारखे गोल भाग असतात. हे नालपाद वाळूमधील सेंद्रिय अन्नकण गोळा करतात मुखातील नालपाद हे अन्नकण मुखामध्ये ढकलतात, तसेच याचा वापर श्वसनासाठी देखील होतो. हार्ट अर्चिनामध्ये पक्ष्माभिकामय काटे, मुद्गरिका, गोलेंद्रिये व मुखाजवळ थोड्या संदंशिका असतात.

 

हार्ट अर्चिनामध्ये नर व मादी यांची लिंगे भिन्न असून त्यांचे पुनरुत्पादन लैंगिक व बाह्य फलनाने होते. नर शुक्राणू व मादी अंडी पाण्यात उत्सर्जित करतात. अंडांचे फलन झाल्यानंतर प्लवकासारखे डिंभ निर्माण होतात. ते समुद्राच्या तळाशी जाऊन स्थिरावतात व तेथेच त्यांचा पूर्ण विकास होतो. मुख व गुद्द्वार बहिःकेंद्रक असतात. चरणार क्षेत्रांचे पृष्ठीयभाग पाकळीसारखे असतात.

 

प्रदूषण आणि मानवाचे समुद्रकिनाऱ्यांवर होणारे आक्रमण हे हार्ट अर्चिनासमोरील मुख्य धोके आहेत.

  

जोशी, मीनाक्षी र.