हाबर, फ्रिट्स : (९ डिसेंबर १८६८–२९ जानेवारी १९३४). जर्मन भौतिकीय रसायनशास्त्रज्ञ. ⇨ अमोनियाचे संश्लेषण (कृत्रिम रीत्या) करण्याची पद्धत शोधून काढल्याबद्दल त्यांना १९१८ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी ⇨ कार्ल बॉश यांच्यासमवेत नायट्रोजनाचा वर-खतात वापर करण्याकरिता अमोनियाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी संशोधन केले.
हाबर यांचा जन्म ब्रेस्लौ (जर्मनी) येथे झाला. त्यांचे शिक्षण बर्लिन, हायडल्बर्ग व झुरिक येथे झाले. त्यांनी येना विद्यापीठात कार्बनी रसायनशास्त्र या विषयात संशोधन केले. त्यांना टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कार्लझ्रूए येथीलकनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र हा विषय शिकविण्याची व त्यामध्ये संशोधन करण्याची संधी मिळाली (१८९३). त्यानंतर त्यांनी विद्युत् रसायनशास्त्र व ऊष्मागतिकी यांवर सखोल संशोधन केले. त्यामुळे तेथे त्यांची भौतिकीय रसायनशास्त्राच्या प्राध्यापकपदी (१८९८) आणि बर्लिनमधील कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूटमधील भौतिकीय रसायनशास्त्र विभागाच्या सरसंचालकपदी (१९११) नेमणूक झाली.
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात नायट्रोजन वरखताच्या मागणीत भरपूर प्रमाणात वाढ झाली, परंतु पुरवठा प्रचंड प्रमाणात कमी होतहोता. त्यामुळे वातावरणातील नायट्रोजनाचा उपयोग या हेतूसाठी करूनघेणे हा संपूर्ण जगासाठी एक चिंतेचा विषय होता. त्या वेळी हाबर यांनी उच्च वातावरणीय दाबाला नायट्रोजन व हायड्रोजन यांच्या एकत्रीकरणाने अमोनियाचे संश्लेषण करण्याची पद्धती शोधून काढली. ही पद्धती मोठ्या प्रमाणात अमोनिया निर्मिती करणाऱ्या पद्धतीत रूपांतरित करण्यासाठी आणि उपयोगात आणण्यासाठी हाबर यांनी कार्ल बॉश यांच्याकडे सुपूर्त केली. यातूनच ‘हाबर-बॉश’ पद्धती अस्तित्वात आली. अमोनियाचा उपयोग कच्चा माल म्हणून फक्त वरखतांच्या निर्मितीसाठीच नाही, तर नायट्रिक अम्लनिर्मितीसाठीही महत्त्वाचा आहे. नायट्रिक अम्लाचा उपयोग रासायनिक उच्च स्फोटके व दारूगोळा यांच्या निर्मितीसाठी केला जातो व त्यांचा वापर युद्धामध्ये महत्त्वाचा आहे.
पहिल्या महायुद्धाच्या काळात हाबर हे जर्मन युद्ध खात्याच्या रासायनिक विभागाचे प्रमुख होते. रासायनिक युद्धतंत्राच्या विकासासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिल्यामुळे त्यांना रासायनिक युद्धतंत्राचे जनक मानलेजाते. त्यांनी बनविलेल्या काच विद्युत् क्लृप्तीमुळे पातळ काचेच्या तुकड्यातून विद्युत् वर्चस् म्हणजेच हायड्रोजनाची संहती मोजता येते.विद्युत् रसायनशास्त्र विषयातील त्यांचे आणखी (दुसरे) अन्वेषण म्हणजे इंधन कोशिका (पेशी), स्फटिकमय लवणांचे (क्षारांचे) विद्युत् विच्छेदन आणि हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साइड व कार्बनाच्या ऑक्सिडीकरणातील मुक्त ऊर्जेचे मापन हे होय.
विषारी वायूंपासून शस्त्र बनविण्यात हाबर यांचा मोठा सहभाग होता. वायप्रेसवर झालेल्या हल्ल्यात क्लोरीन वायू वापरण्याचा सल्लाही त्यांनीच दिला होता. विषारी वायूंच्या परिणामाबद्दल त्यांनी अभ्यास केला.त्यांनी वायूची संहती व आवश्यक उद्भासन वेळ याची साध्या गणितीय संबंधात (सूत्रात) मांडणी केली, हे सूत्र ‘हाबरचा नियम’ म्हणून ओळखले जाते.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीची झालेली प्रचंड हानी भरून काढण्यासाठी हाबर यांनी समुद्राच्या पाण्यापासून सोने तयार करण्याची योजना आखली, यात त्यांना अपयश आले असले, तरी समुद्रातून ब्रोमिनाचे निःसारण (निष्कर्षण) करण्याचा मार्ग मात्र यामुळे खुला झाला. त्यांनी १९३३ सालामध्ये नाझींच्या ज्यूविरोधी धोरणामुळे सरसंचालक पदाचा राजीनामा दिला आणि केंब्रिज विद्यापीठातील नोकरीचा स्वीकार केला.
हाबर यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांनी लिहिलेल्या पुढीलकाही पुस्तकांमुळे त्यांचा नावलौकिक आणखी वाढला : Grundriss der technischen Elektrochemie auf theoretischer Grundlage (१८९८ इं. शी. ‘द थेरॉटिकल बेसिस ऑफ टेक्निकल इलेक्ट्रोकेमिस्ट्री’) आणि Thrmodynamik technischer Gas reaktioner [१९०५ इं. भा. द थर्मोडायनॅमिक्स ऑफ टेक्निकल गॅस रिॲक्शन (१९०८)].
हाबर यांचे बाझेल (स्वित्झर्लंड) येथे निधन झाले.
जमदाडे, ज. वि. मगर, सुरेखा अ.
“