हानोई : सोशॅलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएटनामची राजधानी. लोकसंख्या ६८,४४,१०० (२०१० अंदाजे ). हे दक्षिण चीनी समुद्रापासून सु. १४० किमी.वर रेड नदीकिनारी वसलेले आहे. हे व्हिएटनामचे प्रमुख सांस्कृतिक, औद्योगिक व शैक्षणिक केंद्र आहे. देशातील इतर शहरांशी हे रस्त्यांनी व हायफाँग बंदर, हो-चि-मिन्ह नगर व चीनच्या युनान प्रांतातील कुनमिंग या शहरांशी लोहमार्गाने जोडलेले आहे. येथे दोन विमानतळे आहेत.

 

इतिहासपूर्व काळापासून येथे वसाहत होती. ली राजघराण्याचा शासक ली थाई तो याच्या कारकीर्दीत येथे राजधानी करण्यात आली. येथे व्हिएटनामची राजधानी १८०२ पर्यंत होती. एन्गायेन राजवटीत येथून राजधानी हूवे येथे हलविण्यात आली. ली घराण्याच्या कारकीर्दीत (१४२८–१७८७) यास ‘डाँग किन्ह’ व नंतर टाँकिन म्हणत. १८३१ मध्ये एन्गायेन राजवटीत याचे ‘हानोई’ (दोन नद्यांमधील शहर) असे नामकरण करण्यात आले. १८८२ मध्ये हे फ्रेंचांच्या आधिपत्यात आले व १८८७ मध्ये फ्रेंच इंडोचायनाचे प्रमुख प्रशासकीय केंद्र बनले. १९०२ मध्ये फ्रेंच इंडोचायनाची राजधानी येथे करण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धकाळात हे जपानच्या अखत्यारित होते. ऑगस्ट १९४५ मध्ये व्हिएटनामी कम्युनिस्ट नेता हो-चि-मिन्ह याच्या नेतृत्वाखाली व्हिएटनामींनी याचा ताबा घेतला मात्र फ्रेंचांनी १९४६ मध्ये ते पुन्हा जिंकून घेतले. हानोई त्यांच्या अंमलात ७ मे १९५४ पर्यंत होते. तद्नंतर ते नॉर्थ व्हिएटनाममध्ये समाविष्ट झाले व डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ व्हिएटनामची (उत्तर व्हिएटनाम) येथे राजधानी करण्यात आली. व्हिएटनाम युद्धात (१९६५, १९६८, १९७२ मधील) अमेरिकेच्या बाँबहल्ल्यात या शहराची अतोनात हानी झाली होती. दक्षिण व्हिएटनामच्या १० एप्रिल १९७५ च्या पराभवानंतर २ जुलै १९७६ पासून द सोशॅलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएटनामची राजधानी येथे आहे.

 

व्यापारात अग्रगण्य असलेले हे शहर १९५४ पासून औद्योगिक केंद्र बनले आहे. येथे विद्युत् जनित्रे, कापड, रसायने, प्लायवुड, वाहने, अन्नप्रक्रिया इ. निर्मिति उद्योग चालतात. याच्या आसमंतात भात, ऊसा-सारख्या नगदी पिकांचे उत्पादन होते. हानोई हे शैक्षणिक केंद्र असूनयेथील नॅशनल इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी, व्हिएटनाम नॅशनल युनिव्हर्सिटी, नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी, हानोई युनिव्हर्सिटी ऑफ फाइन आर्ट इ. प्रसिद्ध आहेत.

 

येथील होआन-किएम सरोवर, को लोआ अंतर्दुर्ग (इ. स. पू.तिसरे शतक), मॉट कॉट (एकखांबी) पॅगोडा (१०४९), टेंपल ऑफ लिटरेचर (१०७०), द टेंपल ऑफ द ट्रंग सिस्टर्स (११४२), द नॅशनल म्यूझीयम ऑफ व्हिएटनामी हिस्टरी, व्हिएटनाम नॅशनल म्यूझीयम ऑफ फाईन आर्ट, हो-चि-मिन्ह कबर, ग्रँड थिएटर (१९०१) इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स चौधरी, शंकर रामदास