हादामार्द, झाक-सॉलोमन : (८ डिसेंबर १८६५–१७ ऑक्टोबर १९६३). फ्रेंच गणितज्ञ. त्यांचे महत्त्वाचे संशोधन फलनक विश्लेषणा संबंधी आहे. एकमात्र बिंदूविषयीचे त्यांचे संशोधन मूलगामी आहे.

 

हादामार्द यांचा जन्म व्हर्साय (फ्रान्स) येथे झाला. त्यांचे शिक्षण एकोल नॉर्मल सुपेरिअर या शाळेमध्ये झाले (१८८४–८८). त्यांनी १८९२ मध्येविज्ञान शाखेची पदवी मिळविली. ते बॉर्दोमधील फॅकल्टी ऑफ सायन्स (१८९३–९७) येथे आणि पॅरिसमधील कॉलेज ऑफ फ्रान्स (१८९७–१९३५), एकोल द पॉलितेक्निक (१९१२–३५) व एकोल सेंट्रल्स देस आर्ट्स एट मॅन्युफॅक्चर्स (१९२०–३५) या सर्व ठिकाणीप्राध्यापक होते.

 

हादामार्द यांनी पुरातन कालापासून प्रसिद्ध असलेली अविभाज्य संख्यांच्या वितरणाची समस्या हाताळली आणि असे दाखवून दिले की, क्ष पेक्षा लहान असणाऱ्या धन अविभाज्य संख्या जवळजवळ क्ष/लॉग क्ष एवढ्या असतात [→ अविभाज्य संख्या]. त्यांनी अर्धवैश्लेषिकतेची संकल्पना मांडली आणि ऑगस्तीन ल्वी कोशी यांच्या समस्येचा विचार करताना या संकल्पनेचा उपयोग केला. अल्पिष्ट रेषेसंबंधीही त्यांनी संशोधन केले. त्यांच्या संशोधनाने व्यापक संस्थितिविज्ञान आणि फलनक विश्लेषण यांच्या विकासास चालना मिळाली. त्यांनी गणितीय भौतिकीत अवकल समीकरणांच्या समाकलनासंबंधीचे सिद्धांत मांडले व महत्त्वाचे निष्कर्षही काढले.

 

हादामार्द यांच्या Lesçons sur le calcul des variations (१९१० इं. भा. ‘लेसन्स ऑन द कॅलक्युलस ऑफ व्हेरिएशन्स’) या ग्रंथामुळे फलनक विश्लेषण सिद्धांताचा पाया घातला गेला. त्यांनीफलनक ही संज्ञा माहीत करून दिली. समाकल समीकरणांमध्ये त्यांचे निर्धारकासंबंधीचे कार्य महत्त्वाचे आहे.

 

हादामार्द यांची १९१२ मध्ये सायन्स ॲकॅडेमीचे सदस्य म्हणून निवड झाली. ते अमेरिकेतील नॅशनल सायन्स ॲकॅडेमी, लंडनची रॉयल सोसायटी आणि सोव्हिएट ॲकॅडेमी या संस्थांचे सदस्य होते. परदेशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या बहाल केल्या होत्या.

 

हादामार्द यांचे सर्व लेखन Oeuvres de Jacques Hadamard या नावाने चार खंडांत प्रसिद्ध झालेले आहे.

 

हादामार्द यांचे पॅरिस येथे निधन झाले.

भदे, व. ग. ओक, स. ज.