हॅलोजने : ⇨ आवर्त सारणीच्या ७ ब गटातील पाच अधातवीय मूलद्रव्यांना हॅलोजने म्हणतात. फ्ल्युओरीन (ऋ), क्लोरीन (उश्र), ब्रोमीन (इी), आयोडीन (ख) व ॲस्टटीन (ईं) ही हॅलोजन मूलद्रव्ये असून या सर्वांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत. लवण तयार करणारे या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून हॅलोजन हे नाव पडले आहे.
बहुतेक हॅलोजने भूकवचात अत्यल्प प्रमाणात आढळतात. सागरी पाण्यातील अनेक लवणे ही धातूंबरोबरची हॅलोजनांची संयुगे असून मीठ वा सोडियम क्लोराइड हे त्याचे सर्वपरिचित उदाहरण आहे. ॲस्टटीन वगळता इतर हॅलोजने वातावरणातही आढळतात. ॲस्टटीन नैसर्गिकरीत्या आढळत नाही. कारण त्याचे सर्व किरणोत्सर्गी (भेदक कणवा किरण बाहेर टाकणारे) समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण भिन्न द्रव्यमानांक असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) अल्पजीवी आहेत. अणुकेंद्रीय विक्रियेद्वारे संश्लेषण (कृत्रिम निर्मिती) करणे हाच ॲस्टटीन मिळविण्याचा एकमेव स्रोत आहे. हॅलोजने (विशेषतः फ्ल्युओरीन) अतिशय विक्रियाशील असल्याने ती निसर्गात संयुगांच्याच रूपात आढळतात. त्यांची बहुतेक धातूंशी व अनेक अधातूंशी विक्रिया होऊन विविध प्रकारची संयुगे (हॅलाइडे) तयार होतात.
सर्व हॅलोजनांचा वास उग्र व न आवडणारा असून ती दाहक आहेत. ती पाण्यात फारशी विरघळत नाहीत. नेहमीच्या तापमानाला फ्ल्युओरीन फिकट पिवळा वायू , क्लोरीन पिवळसर हिरवा वायू , ब्रोमीन लालद्रव आणि आयोडीन गडद निळे घनरूप द्रव्य असते. फ्ल्युओरीन सर्वांत हलके तर ॲस्टटीन सर्वांत जड हॅलोजन आहे. मूलद्रव्याच्या किंवा समस्थानिकाच्या द्रव्यमानाला कार्बनाच्या सर्वांत सामान्य कार्बन-१२ या समस्थानिकाच्या १/१२ द्रव्यमानाने भागिले असता, मूलद्रव्याचे किंवा समस्थानिकाचे सापेक्ष आणवीय द्रव्यमान मिळते. हॅलोजनांची सापेक्ष आणवीय द्रव्यमाने पुढीलप्रमाणे आहेत : फ्ल्युओरीन १८.९९८४०३२, क्लोरीन ३५.४५३, ब्रोमीन ७९.९०४, आयोडीन १२६.९०४४७आणि ॲस्टाटिनाचा सर्वाधिक स्थिर समस्थानिक २०९.९८७१.
हॅलोजनांचे भौतिक गुणधर्म अगदी क्रमबद्ध रीतीने बदलताना दिसतात. वाढत्या अणुभारांनुसार त्यांच्या घनता, वितळबिंदू, उकळबिंदू, क्रांतिक तापमान व दाब, द्रवीभवनाची व बाष्पीभवनाची उष्णता यांत वाढ होत जाते आणि रंगही अधिक गडद झालेले आढळतात. हॅलोजनांचे सर्वसाधारण रासायनिक वर्तन आणि त्यांच्या संयुगांचे गुणधर्म यांच्यात निकटचा सारखेपणा आढळतो. हॅलोजने रासायनिक दृष्ट्या विद्युत् ऋण आहेत. म्हणजे इतर रसायनांना ऑक्सिडीभूत करण्याची (त्यांतून एक इलेक्ट्रॉन काढून घेण्याची) व ऋण विद्युत् भारित होण्याची हॅलोजनांच्या अणूंची प्रवृत्ती असते. कारण प्रत्येक हॅलोजन अणूच्या सर्वांत बाहेरील कक्षेत सात इलेक्ट्रॉन असतात. शिवाय हॅलोजन अणू एक जादा इलेक्ट्रॉन धरून ठेवू शकतात. असा इलेक्ट्रॉन मिळविताना अणू ऑक्सिडीकारक म्हणून कार्य करतो. फ्ल्युओरीन सर्वांत प्रबल ऑक्सिडीकारक व अतिशय विक्रियाशीलही आहे. वाढत्या अणुभारानुसार हॅलोजनांची ऑक्सिडी-करणाची क्षमता कमी होत जाते. हॅलोजनांचे ऋण विद्युत् भारित अणूम्हणजे आयन अतिशय स्थिर आहेत. हॅलोजनांच्या लवणांना हॅलाइडे म्हणतात व ती या आयनांची बनलेली असतात.
हॅलोजनांच्या हायड्रोजनाशी होणाऱ्या विक्रियांमधून हायड्रोजनहॅलाइडे ही अम्ले तयार होतात. यांपैकी हायड्रोजन क्लोराइड हे सर्वांत महत्त्वाचे असून ते पाण्यात विरघळून हायड्रोक्लोरिक अम्ल तयार होते. ही अम्ले व लवणे यांच्या गुणधर्मांमध्ये खुद्द मूलद्रव्यांप्रमाणेच सुसंगत असे परस्परसंबंध आहेत. कार्बनी हॅलोजन संयुगांची स्थिरता सर्वसाधारणपणे आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन व फ्ल्युओरीन या क्रमाने वाढत जाते.
हॅलोजने व त्यांची संयुगे यांचे अनेक उपयोग आहेत. हॅलोजन दिव्यातील (बल्बमधील) आयोडीन व ब्रोमीन वायूंमुळे साध्या दिव्यापेक्षा त्यांचे आयुष्य अधिक असते आणि या वायूंमुळे दिवे काळे होण्यास प्रतिबंधहोतो. ॲल्युमिनियम, पोलाद व टेफ्लॉन (ज्याला खाद्य पदार्थ चिकटतनाहीत असे प्लॅस्टिक) तयार करताना फ्ल्युओराइडे वापरतात. दातांचाक्षय टाळण्यास मदत व्हावी म्हणून दंतधावनांमध्ये (विशेषतः टूथपेस्ट-मध्ये) आणि पिण्याच्या पाण्यात थोड्या प्रमाणात फ्ल्युओराइडे घालतात. कागद व प्लॅस्टिक निर्मितीमध्ये आणि पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणात क्लोरीन व त्याची संयुगे घालतात. रंजके, अग्निरोधक रसायने व औषधे तयार करताना ब्रोमीन वापरतात. छायाचित्रणाच्या फिल्ममध्ये सिल्व्हर आयोडाइड हे आयोडिनाचे संयुग वापरतात. आयोडिनाची इतर काहीसंयुगे पूतिरोधक व जंतुनाशके म्हणून मोलाची आहेत. ॲस्टटिनाचेही महत्त्वपूर्ण वैद्यकीय उपयोग आहेत.
पहा : ॲस्टटीन आयोडीन क्लोरीन, फ्ल्युओरीन ब्रोमीन हॅलोजनीकरण.
संदर्भ : 1. Cotton, F. A. and others Advanced Inorganic Chemistry, 1999.
2. Shriver, D. E. Atkins, P. W. Inorganic Chemistry, 1999.
ठाकूर, अ. ना.
“