हॅरो : ग्रेट ब्रिटनमधील लंडन महानगराचा एक बरो. हा लंडन शहराच्या वायव्येस ३२ किमी.वर आहे. लोकसंख्या ३३,९२८ (२०११). इंग्लंड-मधील महत्त्वाच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठाचे मुख्यालय व लंडन महानगरातील एक व्यापारकेंद्र म्हणून या शहरास महत्त्व आहे. पूर्वी हेशहर मिडलसेक्स या परगण्यात होते. कॅन्टनबरी या परगण्याचा बिशप लॅनफ्रँक याने हॅरो पर्वतावर सेंट मेरी चर्चची उभारणी केली (१०९४). एकोणिसाव्या शतकात याचे नूतनीकरण करण्यात आले. या चर्चभोवतीच या शहराचा विस्तार झाला आहे. १५७२ मध्ये येथे उच्च दर्जाच्या सार्वजनिक ‘हॅरो स्कूल ङ्खची स्थापना करण्यात आली. आजही ही शाळा या शहराचे वैभव आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे शहर युद्ध नियोजनाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. त्या अनुषंगानेच येथे देशाच्या रॉयल एअर फोर्सचे मुख्यालय कार्यरत आहे. १९६५ मध्ये यास लंडन या महानगर-पालिकेच्या एका विभागाचा दर्जा मिळाला. याच्या मध्य भागात महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून बृहत् लंडनमधील ही मोठी गजबजलेली बाजारपेठ आहे. शहरात काचनिर्मिती उद्योग प्रसिद्ध असून चष्मे आणि छाया-चित्रणासाठी आवश्यक वस्तुनिर्मिती उद्योगही येथे भरभराटीस आले आहेत. त्यासाठी शहराच्या पश्चिम भागात व्यावसायिक कलादालन आणि कलागृहांची निर्मिती केली आहे.
सेंट जॉन चर्च (सोळावे शतक), हॅरो स्कूल, हॅरो गार्डन व्हिलेज, हॅरो विल्डस्टोन, हॅरो विल्ड ही महत्त्वाची स्थळे येथे आहेत.
बिराजदार, गोविंद
“