हँग ग्लायडिंग : एक हवाई खेळ. हा खेळ विमानाच्या पायाभूत तत्त्वांवर आधारलेला असला, तरी त्यात कोणत्याही यांत्रिक सुविधेचा वापर नसतो. त्याच्या उड्डाणापासून ते पुन्हा जमिनीवर उतरण्यापर्यंतच्यासर्व क्रिया केवळ चालकाकडून होत असतात. हँग ग्लायडरचा शोध आणि त्याचा ‘क्रीडा-शर्यती ङ्खतील प्रवेश अगदी अलीकडे, म्हणजे विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात झाला.
यंत्राशिवाय ग्लायडरच्या निर्मितीसाठी शंभराहून अधिक वर्षे अनेक संशोधक प्रयत्नशील होते. त्यांतील प्रयोगांतून काहींना स्वतःचा जीवही गमवावा लागला होता. स्वाभाविकपणे चालकाच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांतून काही काळ संशोधन थंडावले होते. अशा अनेक वर्षांच्या प्रयोगांतकाहींना थोडेफार यशही मिळत होते. ज्यांचे प्रयत्न विशेष उल्लेखनीय ठरले, त्यांमध्ये विशेषतः जर्मन अभियंता ऑटो लीलीयेंताल, जॉन लाव्हेझारी (१९०४), फ्रान्सिस रोगॅलो आणि गर्ट्रड रोगॅलो (१९४८), अमेरिकन स्पेस एजन्सी–’ नासा’ (१९५७), अमेरिकन वैमानिक अभियंता बॅरी हिल पाल्मेर (१९६०–६२) यांचा समावेश होतो. अखेरीस ऑस्ट्रेलियन संशोधक जॉन डब्ल्यू. डिकिन्सन यांच्या प्रयत्नाला (१९६३) यश प्राप्त झाले. ‘त्रिकोनी सांगाडा’ (फ्रेम), लवचिक पंख आणि हवेत असताना चक्क पालथे पडून, चौकटीत स्वतःला टांगून घेतलेली चालकाची स्थितीही त्यांच्या ग्लायडरनिर्मितीतील खास वैशिष्ट्ये होत. ‘फेडरेशन एअरोनॉटिक इंटरनॅशनल ङ्खने त्यांना ‘आधुनिक हँग ग्लायडरचे जनक’ या गौरवासह ‘हँग ग्लायडिंग’ ही पदविका बहाल केली (२००६).
हँग ग्लायडरचे वजन कमीत कमी असावे याच दृष्टिकोनातून त्याची रचना केली जाते. हवाई छत्रीच्या (पॅराशूट) कापडापेक्षाही थोडे अधिकच बळकट आणि चिवट असे खास बनावटीचे कापड त्याच्या पंखांसाठी वापरता येते. पाण्यावरच्या नौकांच्या शर्यतींत त्याच्या शिडांना जे महत्त्व असते, तेच हँग ग्लायडरमध्ये त्याच्या पंखांना असते कारण ही दोन्हीवाहने वाऱ्याच्या वेगानेच पुढे न्यावयाची असतात. त्यासाठीच पंख आणि शिडांची कौशल्यपूर्ण हालचाल केली जाते. हँग ग्लायडरची बाकीची सर्व रचना ॲल्युमिनिअमसारख्या वजनाने कमी असणाऱ्या धातूंद्वारे केलीजाते. विशेषतः पंखांना आधार देणाऱ्या छोट्या-मोठ्या पोकळ नळ्याआणि वाहनाचा कणा मानल्या जाणाऱ्या त्रिकोनी सांगाड्यातील पोकळ,पण दणकट नळ ॲल्युमिनिअमचेच असतात. त्याशिवाय सांगाडा एकमेकांना जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोऱ्या खास नायलॉन धाग्याच्या असतात.
हँग ग्लायडरचा त्रिकोनी सांगाडा पंखाच्या मध्यावरील आडव्या खांबावर लटकाविलेला असतो. तो सांगाडा म्हणजे जणू विमानाचे ‘कॉकपिट् ङ्खच होय. त्यातूनच चालक वाहनाचे नियंत्रण करतो. चालकाचा पोशाख वैमानिकासारखाच सुरक्षेच्या सर्व सुविधांनी आणि उपकरणांनी परिपूर्ण असतो. त्रिकोनी सांगाड्याच्या खालची लवचिक दांडी हातात धरून तो चक्क पालथे पडून आणि त्याच्या कंबरेभोवती बांधण्यात आलेल्या( ॲल्युमिनिअमची कड असलेल्या) कातडी पट्ट्याने तो स्वतःला सांगाड्यात टांगून घेतो. त्याचे पाय मागील बाजूस ठेवतो. म्हणजेच स्वतःला जमिनीला समांतर ठेवूनच चालक वाहन पुढे नेत असतो. त्यासाठी तो आपले शरीर ‘मागे-पुढेङ्ख करीत वाहनाच्या वेगावर, तर डाव्या-उजव्या कुशीला वळत आपल्या शरीराच्या वजनाने वाहन हवे तसे वळवू शकतो. चालकाचे पालथ्या अवस्थेतील पाय एका दांडीवर टेकलेले असतात.
वाऱ्याचा दाब, त्यातील उष्ण-थंड प्रवाह आणि त्याची दिशा यासर्वांचा एकत्रित ताळमेळ आणि समन्वय साधत हँग ग्लायडर वेगाने पुढेनेणे म्हणजेच चालकाच्या कौशल्याची, धिटाईची आणि प्रसंगावधानाची परीक्षाच असते. चालकाच्या कौशल्यातून हँग ग्लायडर तीन हजार मी. उंच आणि शेकडो किमी. दूर अंतरापर्यंत जाऊ शकतो. बहुसंख्य चालक हँग ग्लायडरच्या उड्डाणासाठी डोंगरमाथा अगर त्याचे शिखर पसंत करतात. काही अधिक अनुभवी चालक क्वचित वाऱ्याच्या दिशा लक्षात घेऊन जमिनीवरून थेट धावत जाऊनच उड्डाण करतात.
हँग ग्लायडरची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची असते. त्याच दृष्टीने त्याच्या डाव्या हाताला संपूर्ण सांगाड्याचे नियंत्रण करणारी ‘कळङ्ख, तर उजव्या हाताला पॅराशूट खुले करण्याचे बटन असते. त्याशिवाय सुकाणू , रेडिओ, बिनतारी संदेशवाहक, वाहनाची दिशा-वेग-उंची-वेळ-तापमान वगैरे दाखविणारी अनेक उपकरणे, विविध भागांचे नकाशे, खाद्यपेये, आपत्कालीन उपयुक्त उपकरणे वगैरेंची उपलब्धता असते.
अनेक देशांत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हँग ग्लायडिंगच्या शर्यती होऊ लागल्या आहेत. भारतात महाराष्ट्रातील कामशेत (पुणे )आणि महाबळेश्वरजवळील पाचगणी, तर बंगलोर, ऊटी, म्हैसूर, उत्तरेला हिमाचल प्रदेश, दार्जिलिंग, गंगटोक इ. ठिकाणी ‘हँग ग्लायडिंग’ क्लब सुरू झाले आहेत.
जोगदेव, हेमंत
“