हर्षवर्धन, सम्राट :(इ. स. सातवे शतक). वर्धन वंशातील भारतातील शेवटचा थोर हिंदू सम्राट. याच्या घराण्यास वर्धन वंश अशी संज्ञा आहे कारण त्यातील सर्व राजांची नावे वर्धनपदान्त आहेत. या राजवंशाची माहिती मुख्यत्वे कोरीव लेख, संस्कृत वाङ्मय, विशेषतः बाणभट्टाचे हर्षचरित आणि चिनी यात्रेकरूह्यूएनत्संग याचा प्रवास-वृत्तान्त यांवरून मिळते.

या घराण्यातील हर्षाचे (कार. ६०६ – सु. ६४७) दोन ताम्रपट प्रसिद्ध झाले आहेत. त्यांमध्ये हर्षाची पुढील वंशावळ आली आहे : नरवर्धन – राज्ञी वज्रिणीदेवी प्रथम राज्यवर्धन – राज्ञी अप्सरादेवी आदित्यवर्धन – राज्ञी महासेन गुप्तादेवी प्रभाकरवर्धन – राज्ञी यशोमती. प्रभाकरवर्धन व राज्ञी यशोमती यांना दुसरे राज्यवर्धन व हर्षवर्धन हे दोन मुलगे आणि राज्यश्रीनामक कन्या होती. हर्ष हा कनिष्ठ पुत्र होता. प्रभाकरवर्धनाने हूणां-बरोबरच्या लढाईत हूणांचा धुव्वा उडविला होता. त्यामुळे त्याचे ‘हूण हरिणकेसरी’ (हूणरूपी हरिणांना सिंहासारखा) असे वर्णन बाणाने आपल्या हर्षचरिता त केले आहे. प्रभाकरवर्धनाने अनेक विजय मिळविले होते. त्याने हूण, सिंधुदेशाधिपती, गुर्जरनृपती, गांधार (पेशावरजवळचा प्रदेश) देशाचा राजा, लाट (दक्षिण गुजरात) व मालव देशाचे अधिपती यांवर विजय मिळवून ‘परमभट्टारक’ आणि ‘महाराजाधिराज’ या सम्राटपददर्शक पदव्या धारण केल्या होत्या. त्याचे कनौजच्या मौखरींशी सख्य होते कारण या दोन्ही राजवंशांनी हूणांच्या स्वाऱ्यांना आपल्या शौर्याने पायबंद घातला होता. हे सख्य वृद्धिंगत करण्यासाठी प्रभाकरवर्धनाने आपली कन्या राज्यश्री कनौजचा राजपुत्र ग्रहवर्मा यास दिली.

प्रभाकरवर्धन आजारी पडला (इ. स. ६०४), त्या वेळी त्याचा वडीलपुत्र राज्यवर्धन हा उत्तरेत हूणांशी लढण्यात गुंतला होता आणि दुसरा पुत्र हर्ष शिकारीसाठी गेला होता. आपल्या पित्याच्या आजाराची वार्ता समजताच हर्ष परत आला पण तत्पूर्वीच प्रभाकरवर्धन मृत्यू पावला आणि हर्षाच्या मातेने सौभाग्यपणात मृत्यू यावा म्हणून त्यापूर्वीच आपला देह अग्नीला अर्पण केला. थोड्याच दिवसांत राज्यवर्धन परत आला, तेव्हा त्याला आपल्या पित्याच्या निधनाची वार्ता समजली. त्याचा कल पूर्वीपासूनच बौद्ध धर्माकडे होता. त्याने तपश्चर्येकरिता अरण्यात जाण्याचा निश्चय केला पण तितक्यात राज्यश्रीचा परिचारक तेथे आला. मालव राजा देवगुप्ताने कनौजवर स्वारी करून ग्रहवर्म्याला ठार केले आणि राज्यश्रीला बंदीत टाकले, अशी दुःखद वार्ता राज्यवर्धनाला दिली. तेव्हा राज्यवर्धनाचा राग अनावर झाला. त्याने मालव राजाचा उच्छेद करण्याकरिता भण्डीनामक मामेभाऊ आणि दहा हजार घोडेस्वारांसह तातडीने प्रयाण केले.

काही दिवसांनी हर्षाला कळले की, राज्यवर्धनाने मालव राजाचा पराभव केला होता पण गौडनृपती शशांक याने त्याला आपल्या भेटीस बोलावून तो एकटा आणि निःशस्त्र असता विश्वासघाताने त्याचा खून केला. ही अत्यंत हृदयद्रावक वार्ता कळताच हर्षाने ‘मी जर या अधम गौडाधिपाचा उच्छेद केला नाही, तर अग्निकाष्ठे भक्षण करीन’, अशी प्रतिज्ञा केली आणि तत्काळ सैन्याला तयारीचा आदेश देऊन दिग्विजयार्थ प्रस्थान केले.

हर्षाला दिग्विजययात्रेत मालव राजाची लूट घेऊन येताना भण्डी भेटला. त्याने सांगितले की, राज्यश्री बंदीतून निसटून विंध्यारण्यात गेली आहे. तेव्हा हर्षाने भण्डीकडे सैन्याचे आधिपत्य देऊन स्वतः आपल्या बहिणीच्या शोधार्थ प्रयाण केले. पुष्कळ शोधानंतर त्याला ती दिवाकरमित्रनामक बौद्ध भिक्षूच्या आश्रमाजवळ अग्नीला देह अर्पण करण्याच्या बेतात आढळली. त्याने तिला त्यापासून परावृत्त केले आणि तो आपल्या सैन्याला येऊन मिळाला.

हर्षाच्या दिग्विजययात्रेत कामरूपचा (आसाम) राजा भास्करवर्मा याने दूत पाठवून हर्षाच्या मैत्रीची याचना केली. पुढे हर्ष व भास्करवर्मा यांनी दोन बाजूंनी गौडांवर आक्रमण करून शशांकाचा पाडाव केला असावा. त्यामुळे त्याला हर्षाचे स्वामित्व कबूल करून मांडलिकत्व पतकरावे लागले असावे, असे दिसते. पुढे मात्र शशांकाने हर्षाचे स्वामित्व झुगारले आणि ओरिसा (ओडिशा) व कागादे (गजाम) प्रदेशांवर आक्रमण करून ‘महाराजाधिराज’ ही पदवी धारण केली. त्याचा सामंत शिलोद्भव कुलोत्पन्न माधवराज याच्या इ. स. ६१९२० च्या ताम्रपटात शशांकाची ही पदवी उल्लेखिली आहे.

ह्यूएनत्संग सांगतो की, हर्षाने सहा वर्षांत उत्तर भारतातील पाच प्रांत जिंकले आणि नंतर तीस वर्षे शांततेने राज्य केले. एका युद्धात मात्र हर्षाचा पराभव झाला. महाराष्ट्राने त्याच्यापुढे मान वाकविली नाही. कोरीव लेखांतील इतर उल्लेखांवरून असे दिसते की, हर्षाने वलभीच्या मैत्रक राजावर (दुसरा ध्रुवसेन उर्फ बालादित्य) स्वारी केली, तेव्हा त्याने गुजरातच्या दुसऱ्या दद्दनृपतीला साहाय्याबद्दल प्रार्थना केली. हा दद्द द्वितीय पुलकेशीचा मांडलिक होता म्हणून पुलकेशीने त्याचा पक्ष घेऊन हर्षाला नर्मदातीरी सामना दिला. या युद्धात हर्षाच्या गजसैन्याचा धुव्वा उडून त्याला पराजय पतकरावा लागला. ‘सकलोत्तरापथेश्वर’ हर्षाचा पराजय झाल्यावर पुलकेशीने ‘परमेश्वर’ ही पदवी धारण केली, असे त्याच्या वंशजांच्या लेखांत म्हटले आहे. या पदवीचा उल्लेख पुलकेशीच्या इ. स. ६१२ च्या हैदराबाद येथील ताम्रपटांत प्रथम आढळतो. म्हणून तत्पूर्वी हे युद्ध झाले असावे, असा काहींचा तर्क आहे.

दिग्विजय संपल्यावर हर्षाने आपली राजधानी ठाणेश्वराहून (स्थाण्वीश्वर) कनौज (कान्यकुब्ज) येथे नेली. ह्यूएनत्संगच्या मते, तेथील मंत्र्यांनी त्याला गादीवर बसण्याची विनंती केली पण हर्षाने गंगातीरच्या बोधि-सत्वअवलोकितेश्वराचा कौल घेतला आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे गादीवर न बसता राजपुत्र शिलादित्य या नावाने राज्य केले. आपल्या ताम्रपटांत हर्ष ‘परमभट्टारक’ व ‘महाराजाधिराजया सम्राटपदद्योतक पदव्यांचा उल्लेख करतो.

हर्षाच्या साम्राज्याचा विस्तार निश्चितपणे सांगणे कठीण आहे. त्याच्या शत्रूंच्या लेखांत त्याला ‘सकलोत्तरापथेश्वर’ म्हटले आहे. ह्यूएनत्संगच्या मते, त्यामध्ये पश्चिम पंजाब, सिंध, राजपुताना, माळवा, गुजरात येथील राजांचा उल्लेख येतो. पूर्व पंजाब (उत्तर प्रदेश), बिहार, पश्चिम बंगाल व ओडिशा हे प्रांत हर्षाच्या राज्यात अंतर्भूत होते, यात संशय नाही. काठेवाड व आसाम येथील राजांनी त्याचे स्वामित्व कबूल केले होते. त्याच्या काळी उत्तर भारतात त्याच्या तोडीचा एकही सम्राट उरला नव्हता, यात संशय नाही. 


हर्षाने आपला स्वतःचा संवत् स्थापला. त्याचा आरंभ त्याच्या इ. स. ६०६ मधील राज्यारोहणापासून होतो. तो संवत् सु. ३०० वर्षे उत्तर भारतात प्रचलित होता. काहींच्या मते, त्याचा प्रसार नेपाळातही झाला होता.

हर्षाने राज्याचे देश, भुक्ती, विषयपथक असे विभाग केले होते. त्याच्या अधिकाऱ्यां राजस्थानीय, उपरिक, विषयपती यांचा निर्देश आढळतो. ते देश, ध्रुवित, विषय इत्यादिकांचे अधिपती असत. यांशिवाय दौःसाध-साधनिक (वरिष्ठ पोलिस अधिकारी), प्रमाता (जमीन महसूल अधिकारी), अक्षपटलिक (दप्तरदार), चाट (पोलिस) व भट (सैनिक) यांचाही निर्देश त्याच्या ताम्रपटांत आढळतो. राजसत्ता अनियंत्रित होती तरी राजावर धर्माचे, मंत्र्यांचे व प्रजाजनांचे वजन असे. त्यामुळे सामान्यतः राज्यकारभार सुरळीतपणे चालत असे. हर्ष स्वतः राज्यशासनात लक्ष घालत असे आणि आपल्या राज्यात सर्वत्र फिरून शासनव्यवस्था कशी चालली आहे, ते समक्ष पाहत असे. त्याने आपल्या दोन्ही ताम्रपटांत ‘कर्मणा मनसा वाचा कर्तव्यं प्राणिर्भिहितम् ! हर्षेणैनत्समाख्यातं धर्मार्जनमनूत्तमम्असा परोपकाराचा आदेश आपल्या प्रजाजनांना दिला आहे.

हर्ष शिवोपासक होता. त्याच्या ताम्रपटांत त्याचे वर्णन ‘परममाहेश्वर’ असे आहे तथापि बौद्ध व जैन धर्मांनाही त्याचा उदार आश्रय होता. तो दर पाच वर्षांनी प्रयाग येथे धर्मसंमेलन भरवून त्यात पाच वर्षांत साठविलेली सर्व संपत्ती दानधर्मात खर्च करीत असे. इ. स. ६४३ मध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतील सहावे धर्मसंमेलन प्रयाग येथे भरविले. तेथे ह्यूएनत्संगही उपस्थित होता. तेथे बुद्ध, आदित्य आणि शिव यांच्या भव्य प्रतिमा बसवून तो उत्सव तीन महिने चालला होता. या अवधीत हजारो बौद्ध, ब्राह्मण व जैन धर्मीय तसेच अनाथ व अपंग लोकांस मोठा दानधर्म करण्यात आला. त्यामुळे राज्याच्या पाच वर्षांच्या महसूल शिलकेतून देशाच्या संरक्षणास आवश्यक असे हत्ती, घोडे व इतर सैन्य व त्यांचे लष्करी साहित्य यांशिवाय काही राहिले नाही. नंतर हर्षाने आपल्या बहिणीकडून जुनी वस्त्रे मागून घेऊन देवतांची पूजाअर्चा केली.

हर्ष विद्वानांचा आश्रयदाता होता. त्याच्या सभेत बाण, मयूर इ. सुविख्यात कवी होते. तो स्वतःही उत्कृष्ट कवी व नाटककार होता. रत्नावली व प्रियदर्शिका या उदयननृपतीच्या प्रणयकथेवर रचलेल्या हर्षाच्या नाटिका सुप्रसिद्ध आहेत. तिसरे नाटक नागानंद. यात जीमूतवाहनाने एका नागाचे प्राण वाचविण्याकरिता गरुडापुढे आत्मसमर्पण केल्याचे संविधानक आहे. नाटकाचा हा प्रयोग नृत्यगायनादिकांनी फार रमणीय होत होता, असे चिनी यात्रेकरूइत्सिंग सांगतो.

हर्षाला पुत्रसंतान नव्हते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर राज्यात कलह उत्पन्न होऊन त्याची गादी अर्जुननामक मंत्र्याने बळकाविली. त्याचे साम्राज्य त्याच्याबरोबरच लयाला गेले. त्याच्या कारकिर्दीत शांतता व सुव्यवस्था होती. यावरून त्याच्या धार्मिक धोरणाने देश निर्बल झाला, असेही म्हणता येत नाही. दानधर्म करीत असताना देशाचे संरक्षणसामर्थ्य कमी होऊ नये, याची काळजी तो घेत असे.

प्रेमळ पुत्र व भ्राता, उत्तम नाटककार, शूर व न्यायी शासक, धर्मविद्या व कला यांचा उदार आश्रयदाता इ. गुणसमुच्चयामुळे हर्षाची कीर्ती भारतीय इतिहासात अजरामर झाली आहे.

पहा : हर्षोत्तरकाल (मुसलमानपूर्व ).

संदर्भ : Majumdar R. C. History and Culture of the Indian People, Vol. III, Bombay, १९९७.

 

मिराशी, वा. वि.