हरिहर, पहिला : (कारकीर्द १३३६–५६). कर्नाटकातील विजयानगर साम्राज्याचा संस्थापक व एक पराक्रमी राजा. ऐतिहासिक कागदपत्रे, कोरीव लेख आणि परकीय प्रवाशांचे वृत्तान्त यांतून त्याचे नाव देवराव, देवराय, देहोरावो, हरियप्पा, हरैब, हरिहर असे आढळते. त्याच्या वडिलांचे नाव संगम होते. त्याच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती ज्ञात नाही तथापि हरिहर आणि ⇨ पहिला बुक्क हे बंधुद्वय वरंगळच्या काकतीय राजाच्या पदरी सेवेस होते. मुसलमानी आक्रमणात काकतीयांचे राज्य संपुष्टात आल्यानंतर (१३२३) ते थोडे घोडदळ घेऊन अनेगुंडी-जवळील विद्यारण्य म्हणजे माधवाचार्य स्वामींच्या आश्रयास आले. त्यांच्या उपदेशानुसार हरिहर व बुक्क आणि त्यांचे इतर तीन भाऊ (कंपण, मुद्दण, मारप्पा) यांनी हंपी येथे १३३६ मध्ये विजयानगरचे राज्य स्थापन केले. त्यांच्या संगम घराण्याचे नावच पुढील काही वारसांना दिले गेले. तत्पूर्वी काकतीयांच्या पतनानंतर त्यांनी कंपली राजाची सेवा पतकरली. मुहम्मद तुघलक याने १३२६ मध्ये कंपलीवर स्वारी केल्यावर हरिहर आणि बुक्क यांनी कंपलीतून बाहेर पडून अनेगुंडीच्या किल्ल्यात आश्रय घेतला पण सुलतानाने अनेगुंडीही पादाक्रांत केल्यानंतर (१३३४) त्यांनी विद्यारण्यांच्या मदतीने विजयानगरचे राज्य स्थापन केले असावे, तर काही साधनांनुसार मुहम्मद तुघलकाने त्यांना कैद करून इस्लाम धर्माची दीक्षा दिलीअसावी, असे दिसते. त्यांनी सुलतानाचे दक्षिणेकडील प्रदेशाकडे झालेले दुर्लक्ष आणि कंपलीमधील अनागोंदी यांचा फायदा घेऊन स्वधर्म स्वीकारून विजयानगरची स्थापना केली, असा सर्वसाधारण समज आहे पण या संस्थापकांच्या उदयाबद्दल विद्वानांमध्ये मतैक्य नाही.

फादर हेरास, बी. ए. सालेतोर व पी. बी. देसाई या इतिहासकारांच्या मते, हरिहर व बुक्क हे कर्नाटकातील हिंदू सरदार असून होयसळ तिसरा वीर बल्लाळ याच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी ते लढले. परकीय प्रवाशांचे वृत्तान्त आणि संस्कृत साधनांतून हरिहर व त्याचे चार बंधू वरंगळ राजाच्या पदरी होते, अशी माहिती मिळते. परंपरागत कथा, वदंता, मुसलमान इतिहासकारांचे वृत्तान्त आणि तत्कालीन कोरीव लेख यांचा विचार केला असता वरील मताला पुष्टी मिळते.

हरिहराने सात वर्षे (१३३६–१३४३/४४) राज्य केले असावे पण काही साधनांतून तो १३५६ पर्यंत गादीवर होता, असे दिसते. त्याच्या कोरीव लेखात (१३४०) तो स्वतःस हरियप्पा ओडेय (प्रमुख) म्हणतो. संस्कृत साधनांतून त्याचा महामण्डलेश्वर असा उल्लेख आढळतो. हरिहराने होयसळ राज्याच्या उत्तर भागावर प्रथम आपले वर्चस्व स्थापिले. त्याने बारकूर आणि बादामी येथे किल्ले बांधले. हंपी येथे विद्यारण्यांच्या स्मरणार्थ मंदिर बांधले. त्याने आपल्या भावांना वेगवेगळ्या प्रदेशांवर प्रांताधिकारी म्हणून नेमले. नेल्लीर प्रदेशावर कंपण, मले राज्यावर मारप्पा आणि मुलबागल प्रदेशावर मुद्दण यांची नेमणूक केली. बुक्क हा हरिहराबरोबर १३४५ पासून प्रशासनव्यवस्था पाहत असे. काही विद्वानांच्या मते, शासनाच्या शेवटच्या भागात हरिहराने अंग आणि कलिंग येथे विजयाची पताका फडकाविली. त्याच्या कारकीर्दीतच बहमनी आणि विजयानगर या राज्यकर्त्यांमध्ये रायचूर दुआबासाठी वारंवार संघर्ष झाला. सुदूर पांड्य व दक्षिणेकडील अनेक राजांनी हरिहराचे वर्चस्व मान्य केले. तुंगभद्रा-पासून ते पांड्य देशापर्यंत सर्व भाग हरिहराच्या आधिपत्याखाली होता. त्याने राज्याची घडी नीट बसविली. १३४६ मध्ये त्याने शृंगेरीचे जगद्गुरू भारतीतीर्थ यांना देणगी दिली. त्याच्यानंतर त्याचा धाकटा भाऊ बुक्क विजयानगरच्या गादीवर आला (१३५७).

हरिहर हा कुशल प्रशासक होता. अनंतरस चिक्क उदैय या विश्वासू मंत्र्याच्या साहाय्याने त्याने विजयानगर साम्राज्याचा विस्तार केला, राज्याच्या महसुलात वाढ केली आणि शेतकऱ्यांचे हितही जपले.

पहा : विजयानगर साम्राज्य.

सोसे, आतिश सुरेश