हनफी : इस्लाममध्ये इस्लामी कायद्याचे विश्लेषण आणि मांडणी करणारे अधिकृत असे चार प्रवाह (उपपंथ) आहेत : हनफी, मालिकी, हनबली (हंबली) आणि शाफी. ही चार नावे ज्यांनी इस्लामी कायद्यांचा अर्थ लावून सविस्तर संहिता तयार केली, अशा धर्मपंडितांच्या नावाने प्रचलित आहेत. ती म्हणजे इमाम ⇨ अबू हनीफा, ⇨ मालिक इब्न अनास इमाम, ⇨ अहमद बिन हनबल (अबु अब्दुल्ला अहमद इब्न हनबल) आणि ⇨ इमाम शाफी.
मुसलमानी विधीचे आद्य भाष्यकार इमाम अबू हनीफा अन नोमान इब्न साबित हे इ. स. ६९९–७६७ या काळात होऊन गेले. इराकमधील कूफा या शहरात त्यांची पाठशाळा होती. त्यांनी इस्लामी कायद्यांचा सविस्तर अभ्यास करून जी संहिता तयार केली, त्याला ‘हनफी प्रवाह’ असे म्हटले जाते. ते मानणाऱ्या अनुयायांना ‘हनफी’ किंवा इंग्रजीत ‘हानफीज’ असे म्हटले जाते. जगातील बहुसंख्य सुन्नी पंथाचे मुसलमान हे हनफी कायदेशास्त्र मानतात. बुर्हाणुद्दीन यांचा अल् हिदाया (सु. ५८०) व मोगल सम्राट औरंगजेब यांच्या हुकूमावरून रचला गेलेला फतवॉ-इ-आलमगीरी हे कायदेशास्त्रावरील ग्रंथ हनफी कायद्यावर आधारित आहेत.
पहा : अबू हनीफा इस्लाम धर्म मुसलमानी विधि (हनफी उपपंथ).
बेन्नूर, फकरूद्दीन