हत्तीरोग : एक प्रकारच्या नेमॅटोडांमुळे (सूत्रकृमींमुळे) होणारा आणि क्युलेक्स डासांकडून पसरविला जाणारा हा रोग मुख्यतः उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतो. भारताशिवाय इंडोनेशिया, मेक्सिको, ग्वातेमाला, आफ्रिकेतील काही देश, दक्षिण पॅसिफिक बेटे इ. ठिकाणी तुरळक क्षेत्रात याचा प्रादुर्भाव अजूनही आहे. वुच्छेरेरिया या प्रजातीचे सूत्रकृमी मुख्यतः रोगजनक असतात परंतु काही क्षेत्रांमध्ये मॅन्सोनेला, आँकोसर्का लोआ या प्रजातींच्या जातीही हत्तीरोगाचे उपप्रकार निर्माण करतात. हा आजार सध्या भारतातून निर्मूलनाच्या वाटेवर असणारा आजार आहे.

बारीक धाग्याप्रमाणे दिसणाऱ्या या सूत्रकृमींना फायलेरिया असे म्हणतात. प्रौढ कृमीची त्वचेच्या खाली, लसीका ग्रंथी व लसीका वाहिन्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे लसीका प्रवाहाला अडथळा येतो. परिणामतः एक अथवा दोन्ही पाय, पुरुषांमध्ये वृषण आणि कधीकधी हात सुजलेले दिसतात. ही सूज उपचाराअभावी प्रचंड प्रमाणात वाढल्या-मुळे पाय हत्तीच्या पायासारखे दिसू लागतात. दीर्घकाळ ही प्रक्रिया चालू राहिल्यास त्वचेचा रंग गडद होतो, तिची जाडी वाढते, खरखरीत झालेल्या त्वचेस भेगा पडतात आणि रुग्णाच्या हालचालीस मऱ्यादा पडतात. सुजून कठीण झालेल्या ऊतकांना शस्त्रक्रिया करून काढून टाकणे भाग पडते. प्रभावी औषधांच्या शोधामुळे असे प्रसंग आता दुर्मिळ होत आहेत.

त्वचेखाली वाढणाऱ्या प्रौढ कृमीची लांबी २-५० सेंमी. इतकी असू शकते. संध्याकाळी किंवा रात्री कार्यशील असणारी क्युलेक्स डासाचीमादी जेव्हा रुग्णाला चावते तेव्हा हे सूत्रकृमी तिच्या पोटात जातात.१-२ आठवड्यात त्यांचे रूपांतर संक्रामणक्षम डिंभात होते. अशा मादीच्या दंशामुळे अन्य व्यक्तींमध्ये ते प्रवेश करतात. मादीच्या पोटातून रोज रात्री हजारो सूत्रकृमी (डिंभ) बाहेर पडून रक्तप्रवाहात प्रवेश करतात. निरोगी व्यक्तीत प्रवेश केल्यानंतर ते सर्व शरीरभर पसरतात. यांपैकी काही सूत्रकृमींची वाढ होऊन सु. एक वर्षात प्रौढ नर व मादी निर्माण होऊन त्यांच्या मीलनामुळे मादीच्या पोटात रक्तात प्रवेश करू शकणारे सूक्ष्मजीव वाढू लागतात. रात्री रक्ताचा नमुना तपासणीसाठी घेतल्यास त्यांचे अस्तित्व कळू शकते. फायलेरियामुळे शरीरात निर्माण झालेले प्रतिजन अंगावर पुरळ उठणे, चट्टे उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे दाखवितात. प्रतिजनांच्या चाचणी-मुळे या रोगाचे निदान आता दिवसा रक्ताचा नमुना घेऊनही करता येते.

लसीका तंत्रातील सूत्रकृमींच्या वास्तव्यामुळे कधीकधी लसीकाप्रवाह पूर्ण बंद होऊन मूत्रात लसीकाद्रव आढळू लागतो. फायलेरियाच्या इतर जातींमुळे हत्तीरोगापेक्षा निराळी लक्षणे दिसून येतात. लोआ लोआ याचा कृमी त्वचेखालील ऊतकात हालचाल करताना आढळतो बोटांमध्येकिंवा डोळ्यांत पापण्यांमध्ये सूज निर्माण करू शकतो. आँकोसर्का याचा प्रसार आफ्रिकेत नद्यांच्या काठांवरील एक प्रकारची ‘काळी माशी’ आपल्या दंशातून करते. या कृमीच्या प्रतिजनामुळे निर्माण झालेले प्रतिपिंड तीव्र प्रतिक्रियेमुळे अंधत्व निर्माण करू शकतात. नदी अंधत्व (River Blindness) या नावाने हा आजार ओळखला जातो. अन्य काही कृमी उदरपोकळीत वाढून पोटाच्या विकारांची लक्षणे दाखवितात. दमा, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, डोळ्यांवर सूज येणे अशी विविधलक्षणे देखील कधीकधी फायलेरियामुळे उत्पन्न होऊ शकतात.

हत्तीरोगावर डाय-एथिल कार्बमेझीन (हेट्राझान), आयव्हरमेक्टीन आणि अलबेंडॅझोल ही औषधे सध्या उपलब्ध आहेत. त्यांचा परिणाम मुख्यतः सूत्रकृमी अवस्थेवर होतो. प्रौढ कृमीस काही प्रमाणात अकार्यक्षम करून शरीराच्या सुरक्षायंत्रणेकडून तिचा नाश करण्यास ती मदत करतात. औषधांचा प्रभाव कृमीच्या जातीनुसार एका किंवा अनेक मात्रांच्या उपचारानंतर दिसून येतो. प्रतिबंधासाठी संरक्षक कपडे, कीटकनाशके, मच्छरदाण्या आणि संपूर्ण जनसमूहास वर्षातून एकदा हेट्राझानची एकमात्रा देणे यांसारखे उपाय योजता येतात.

भारतात सु. २० राज्यांमधील ६० कोटी जनता हत्तीरोग प्रवणक्षेत्रात राहत असावी. सुमारे दोन कोटी लोक सूत्रकृमिवाहक आहेतअसे गृहीत धरून प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. या उपायांनी २०१५ सालापर्यंत देशातून या रोगाचे पूर्ण उच्चाटन होईल अशी अपेक्षा आहे. २००१ मध्ये ७ जिल्ह्यांमध्ये काऱ्यान्वित झालेला प्रतिबंधकऔषध योजनेचा कार्यक्रम २००७ मध्ये जवळपास २५० जिल्ह्यांमध्ये पोहोचला. जागतिक आरोग्य संघटनेच्या ज्या कार्यक्रमाचा हा भाग आहे,ती योजना ८१ देशांमध्ये जवळजवळ १३४ कोटी लोकांमध्ये राबविली जात आहे. तिचे उद्दिष्ट २०२० सालापर्यंत संपूर्ण जगातून हत्तीरोगाचे उच्चाटन करण्याचे असून ते साध्य होण्याची आशा आता दिसत आहे.

श्रोत्री, दि. शं.