हंस-१ : (सिग्नस ). उत्तर खगोलार्धातील हा महत्त्वाचा मोठा तारकासमूह असून तो होरा २० तास, ३७ मिनिटे व क्रांती ४२° च्या आसपास दिसतो [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. त्याच्या आकारावरून त्याला नॉर्दर्न क्रॉस असेही म्हणतात. पूर्णपणे आकाशगंगेत असलेल्या या तारकासमूहातील प्रमुख तारे पुढीलप्रमाणे आहेत : आल्फा सिग्नी (डेनेब) हा यातील प्रमुख तारा ३,२०० प्रकाशवर्षे अंतरावर असून त्याची ⇨ प्रत १.२६ आहे. बीटा सिग्नी (अल्बिरिओ) हा ३ प्रतीचा पिवळा तारा सर्वांत प्रेक्षणीय द्वित्त ताऱ्यांपैकी एक आहे [→ तारा].त्याचा सहचर तारा ५.३ प्रतीचा आहे. डेल्टा सिग्नी हा ३ ते ७.९ प्रतींचे सहचर असलेला द्वित्त तारा असून त्याचा पर्यय काळ ८०० वर्षे आहे. आर् सिग्नी या द्वित्त ताऱ्यातील सहचर तारे ३.८ व ८.९ प्रतींचे असून त्याचा पर्यय काळ ४९ वर्षे आहे. काय सिग्नी हा मीरा ताऱ्यासारखा चर तारा असून त्याची प्रत ४०२ दिवसांत ४.२ ते १३.७ अशी बदलते. डब्ल्यू सिग्नी या चर ताऱ्याची प्रत १३२ दिवसांत ५ ते ८, एस् यू सिग्नी या चर ताऱ्याची प्रत ३.८ दिवसांत ६.२ ते ७ आणि एक्स सिग्नी या चर ताऱ्याची प्रत १६ दिवसांत ५.९ ते ७ अशी बदलते.

हंस तारकासमूहात एम् ३९ हा मुक्त तारकागुच्छ व सिग्नस-ए हा रेडिओ तरंगांचा उद्गम (होरा १९ तास, ५८ मिनिटे व क्रांती ४०° ३६”) आहे. यांशिवाय या समूहात नॉर्थ अमेरिका व व्हेल हे तेजोमेघतसेच कोलसॅक हे तारे नसणारे कृष्णवर्णी क्षेत्रही आहे.

ठाकूर, अ. ना.