हंटिंग्टन, एल्सवर्थ : (१६ सप्टेंबर १८७६-१७ ऑक्टोबर १९४७). अमेरिकन भूगोलतज्ज्ञ आणि समन्वेषक. जन्म अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इलिनॉय राज्यातील गेल्झबर्ग येथे. विकसन-शील मानवी संस्कृतीवर भौगोलिक परिवेषाचा पडणारा प्रभाव यासंदर्भात त्याने सातत्यपूर्ण संशोधन करून ‘संस्कृतीच्या विकासासाठी सर्वोत्तम हवामान’ ही संकल्पना मांडली. त्याने विस्कॉन्सिन राज्या-तील बलॉइट महाविद्यालयातूनपदवी प्राप्त केली आणि लगेचच युफ्रेटीस कॉलेज, हारपूट (टर्की)येथे अध्यापनास सुरुवात केली (१८९७-१९०१). या काळात त्याने युफ्रेटीस न दी खो ऱ्या चे समन्वेषण केले. मध्य आशियाच्या भौगोलिक अभ्यासाकरिता निघालेल्या पम्पेली (१९०३-०४) व बॅरिट (१९०५-०६) या दोन मोहिमांमध्ये त्याने सहभाग घेतला. १९०९ मध्ये त्याने भूविज्ञान विषयात पीएच्.डी. संपादन केली. नंतर त्याने येल विद्यापीठामध्ये भूगोल विषयाचे अध्यापन केले. याचवर्षी त्याने येल विद्यापीठामार्फत आयोजित पॅलेस्टाइन आणि आशिया येथील शोधमोहिमांचे नेतृत्व केले. पुढे १९१७ मध्ये त्याने याच विद्यापीठात भूगोल विषयाचा सहायक संशोधक म्हणून काम केले. या काळात त्याने प्रामुख्याने पऱ्यावरण आणि मानववंशशास्त्र यांविषयी संशोधन केले. वॉशिंग्टन डी. सी. येथील कार्नेगी फाउंडेशन या संशोधन संस्थेत सहायक संशोधक म्हणून कार्यरत असताना (१९१०-१३) त्याने अमे-रिकेची संयुक्त संस्थाने, मेक्सिको आणि मध्य अमेरिका येथील हवामानाचा सखोल अभ्यास केला. पऱ्यावरण आणि भूसंरचना भूविज्ञानविषयक आणि ऐतिहासिक बदल मानवी वर्तन आणि सांस्कृतिक विसरण यांतील सहसंबंधांचा शोध घेऊन पऱ्यावरणावर मानवी संस्कृतीचा विकास अव-लंबून असल्याचा निष्कर्ष त्याने मांडला. त्याने सांस्कृतिक समृद्धीचासंबंध अनुकूल पऱ्यावरणाशी जोडलेला असून जेथे अनुकूल पऱ्यावरण असेल, तेथेच संस्कृतीचा विकास संभवतो असे त्याचे मत होते. त्यानेया अनुकूल घटकांना निर्देशांक दिले आणि या निर्देशांकांची जगाच्या नकाशावर मांडणी केली. पश्चिम यूरोपात आढळते तसे समशीतोष्ण वसतत बदलणारे हवामान मानवासाठी व त्याच्या प्रगतीसाठी सुयोग्य असते, असे त्याचे मत प्रसिद्ध आहे.
अनेक शोधमोहिमा आणि संशोधन यांच्या आधारे त्याचे अनेकग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्याचे मध्य आशियातील अनुभवावरआधारित एक्स्प्लोरेशन इन तुर्कस्तान (१९०५) आणि द पल्स ऑफ आशिया (१९०७) हे आणि यांशिवाय सिव्हिलाय्झेशन अँड क्लायमेट (१९१५), वर्ल्ड पॉवर अँड इव्हल्यूशन (१९१९), वेस्ट ऑफ द पॅसिफिक (१९२५), द ह्यूमन हॅबिटॅट (१९२७), मेनस्प्रिंग्स ऑफ सिव्हिलाय्झेशन (१९४५) इ. ग्रंथ महत्त्वपूर्ण आहेत. इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका (१९१७), असोसिएशन ऑफ अमेरिकन जिऑग्राफर्स (१९२३) आणि अमेरिकन यूजेनिक्स सोसायटी (१९३४-३८) या भूगोल विषयासंबंधीच्या महत्त्वाच्या संस्थांचे त्याने अध्यक्षपद भूषविले आहे.
न्यू हेवन येथे त्याचे निधन झाले.
ठाकूरदेसाई, सुरेंद्र
“