हंट, ली : (१९ ऑक्टोबर १७८४-२८ ऑगस्ट १८५९). इंग्रज समीक्षक, कवी, संपादक व निबंधकार. संपूर्ण नाव जेम्स हेन्री ली हंट. जन्म साउथगेट (मिड्लसेक्स) येथे एका संपन्न मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याने ख्राइस्ट्स हॉस्पिटल या संस्थेतून शिक्षण पूर्ण केले (१७९९). तरुणपणीच त्याच्यात राजकारण आणि काव्य यांची गोडी निर्माण झाली. राजकारणावर लिहीत असतानाच द न्यूज या वृत्तपत्रासाठी नाट्यसमीक्षक म्हणूनही तो लेखन करीत होता.
जूव्हेनिलिआ (१८०१) हा हंटचा पहिला कवितासंग्रह. त्यात त्याची इटालियन साहित्याविषयीची आवड दिसून येते. त्यात छंदांचावापर करताना त्याने वेगळे स्वातंत्र्य घेतले आहे. द स्टोरी ऑफ रिमिनी (१८१६) मध्ये अठराव्या शतकातील प्रस्थापित छंदोरचनेस आव्हान देऊन मुक्त छंदाचा त्याने वापर केला. इटालियन कवी ⇨ दान्ते याच्या डिव्हाइन कॉमेडीमधील एका शोकात्म कथेवर या काव्यग्रंथाची निर्मिती त्याने केली. समीक्षकांनी मात्र त्याच्या या प्रयोगाची निर्भत्सना केली. इटालियन काव्यपरंपरेतूनच त्याने रंग आणि इंद्रिय संवेदना यांचा आनंद मुक्तपणे घेण्याचा संस्कार स्वीकारला व आपला कविमित्र ⇨ जॉन कीट्स यालाही त्याचा परिचय करून दिला. कीट्सला इटालियन काव्याची त्यामुळे गोडी निर्माण झाली.
जॉन हंट या आपल्या बंधूसोबत ली हंटने द इग्झॅमिनर हे साप्ताहिक सुरू केले (१८०८). त्या काळात विलक्षण राजकीय स्वातंत्र्य घेऊन लिहिलेल्या या साप्ताहिकातील लेखांतून हंटने गुलामांच्या विक्री व्यवसायावर बंदी, कॅथलिक धर्मसुधारणा, संसद व तत्कालीन गुन्हेगारी कायद्यात सुधारणा अशा ज्वलंत विषयांची चर्चा केली. द इग्झॅमिनरमधील राजकुमार रीजंटवरील टीकेमुळे या बंधुद्वयाला ५०० पौंड दंड व दोन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला (१८१३-१४) तथापि तुरुंगातूनही हंटने या साप्ताहिकाच्या संपादनाचे काम चालूच ठेवले. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य स्वीकारणारा लढवय्या अशी किर्ती त्याला प्राप्त झाली. पुढे हंट आणि प्रख्यात इंग्रज निबंधकार ⇨ विल्यम हॅझलिट यांनी १८१४-१७ या कालावधीत द इग्झॅमिनरमध्ये लिहिलेल्या निबंध-मालेचे संकलन करून द राउंड टेबल हा ग्रंथ प्रसिद्ध केला (दोन भाग, १८१७). यातील एकूण ५२ निबंधांपैकी १२ निबंध हंट याने लिहिले होते. त्याने १८०९ मध्ये मरीअन केंट या युवतीबरोबर विवाह केला. त्यांना दहा अपत्ये झाली. त्याने द रिफ्लेक्टर या त्रैमासिकाचे संपादन केले (१८१०-११). यात प्रसिद्ध झालेल्या त्याच्या ‘द फिस्ट ऑफ द पोएट्स’ या उपाहासात्मक लेखाने तत्कालीन कवींचा, विशेषतः विल्यम गिफर्ड याचा, रोष ओढवून घेतला.
रंगमंच (नाटक) आणि चित्रकला यांवर हंट याने काही टीकात्मक लेख लिहिले (१८१०-११). ते पुढे इमॅजिनेशन अँड फॅन्सी (१८४४) या शीर्षकार्थाने प्रसिद्ध झाले.
१८१८-१९ दरम्यान फोलिज, हिरो अँड लिअँडर आणि बॅक्स अँड ॲरिडनी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. दरम्यान द इंडिकेटर आणि कंपॅनियन या नियतकालिकांसाठीही त्याने लेखन केले. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वाङ्मयीन कामगिरीमुळे त्याचे समकालीन ख्यातनाम साहित्यिक जॉन कीट्स, पी. बी. शेली, विल्यम हॅझलिट, चार्ल्स लँब यांच्याशी त्याचा परिचय झाला. काहींशी घनिष्ठ मैत्रीही झाली.
इंग्रज कवी बायरन आणि शेली यांच्यासोबत हंट याने इटली येथेआश्रय घेतला (१८२२). तिघांनी मिळून द लिबरल हे पुरोगामी राजकीय नियतकालिक सुरू केले. इटलीमधून हे नियतकालिक प्रसिद्ध होत असल्यामुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी कारवाई करण्याची भीती नव्हती.याच्या पहिल्या अंकाचे लेखन प्रामुख्याने हंट यानेच केले परंतु चार अंकांनंतर ते बंद करून हंट इंग्लंडला परतला (१८२३).
लॉर्ड बायरन अँड सम ऑफ हिज् कंटेंपोररीज (१८२८), ख्रिश्चॅनिझम (१८३२), ऑटोबायॉग्रफी (१८५०) आणि टेबल टॉक (१८५१) हे त्याचे काही उल्लेखनीय ग्रंथ.
पटनी (लंडन) येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Holden, Anthony, The Wit in the dungeon: The Life of Leigh Hunt, 2005.
2. Lulofs, Timothy J.: Hans, Ostrom, Leigh Hunt : A Reference Guide, 1985.
3. Roe, Nicholas, Fiery Heart : The First Life of Leigh Hunt, 2005.
सावंत, सुनील