हंगेरियन साहित्य : अगदी आरंभीच्या हंगेरियन साहित्यातले आज काहीही उपलब्ध नाही; मात्र ते अस्तित्वात होते, हे निश्चित. लोककथा आणि लोकगीते ह्यांतून त्याच्या ज्या खाणाखुणा दिसतात, त्यांतून त्या साहित्याचा काळ पेगन कालखंडापर्यंत मागे नेता येतो, असे दिसते. १००१ मध्ये हंगेरीत ख्रिस्ती धर्मीयांचे राज्य प्रस्थापित झाले. त्यातून नव्या प्रकारच्या साहित्यनिर्मितीला अनुकूल अशी पार्श्वभूमी निर्माण झाली; तथापि जे साहित्य निर्माण झाले, त्याचा आशय ख्रिस्ती आणि भाषा लॅटिन होती. ह्या साहित्यामुळे हळूहळू हंगेरियन भाषेतील जुने, अलिखित, पारंपरिक साहित्य बाजूला पडले. तेराव्या शतकापर्यंत लेखन म्हटले, म्हणजे ते लॅटिनमध्येच लिहिलेले, अशी परिस्थिती होती.
लॅटिनमध्ये लिहिणारे पहिले लॅटिन साहित्यिक अकराव्या शतकाच्या मध्याला उदयाला आलेले दिसतात. बिशप मोर आणि निकोलस ह्यांचा निर्देश ह्या संदर्भात करता येईल. बिशप मोरने हंगेरीच्या पहिल्या ख्रिस्ती संताचे चरित्र लिहिले, तर निकोलस हा हंगेरीच्या पहिल्या इतिवृत्ताचा (क्रॉनिकल) लेखक असावा. नव्या हंगेरियन राजवटीच्या पहिल्या चार शतकांत जे लॅटिन साहित्य निर्माण झाले, ते मुख्यतः इतिवृत्ते, संतचरित्रे, स्तोत्रे अशा प्रकारचे होते.
हंगेरियन भाषेतल्या आरंभीच्या साहित्यात अंत्यविधीच्या प्रसंगी केलेल्या एका भाषणाचा (सु. १२००) अंतर्भाव होतो. साधे पण हृदयस्पर्शी असे हे भाषण आहे. तेराव्या शतकात लॅटिन लेखनाची बरीच भाषांतरे झाली पण त्यांपैकी गॉड फ्रॉय दे बीतयी ह्याने रचिलेली कुमारी मेरीवरील एक कविता तेवढी उपलब्ध झालेली आहे. उपलब्ध असलेली हंगेरियन भाषेतली ही पहिली कविता. फ्रान्सिस्कन पेलबर्ट तेमेस्वरी ह्याने लॅटिनमध्ये लिहिलेली, पण हंगेरियन लोकांसाठी असलेली प्रवचने इतर यूरोपीय देशांत बरीच लोकप्रिय झाली. ह्या प्रवचनांपैकी काही हंगेरियन भाषेत अनुवादिली गेली आहेत. अन्य अनुवादांत A harom koroszteny leanyrol (सु. १५२०, इं. भा. ऑन थ्री ख्रिश्चन व्हर्जिन्स) हे पहिले हंगेरियन नाटक, सेंट कॅथरिन ऑफ अलेक्झांड्रिया हिच्याबद्दलची आख्यायिका आणि ‘साँग ऑफ सॉलोमान’ (इं. शी.) ह्यांचा समावेश होतो.
हंगेरियन साहित्य पूर्णतः धार्मिक नव्हते. चौदाव्या शतकात शाळांत जाणाऱ्या सर्वसामान्य हंगेरियनांची संख्या वाढली. त्यामुळे लौकिक साहित्याच्या विकासाला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली. ह्या साहित्यातील बरेचसे प्रासंगिक काव्यरचनेच्या स्वरूपाचे आहे आणि त्यातील फार थोडे उपलब्ध आहे. चौदाव्या शतकापासून देशाबाहेरील विद्यापीठांत जाऊन शिकणाऱ्यांची संख्या वाढली. परदेशांत जाणारे विद्यार्थी परत येऊन तेथील साहित्य, साहित्यप्रकार ह्यांचा परिचय हंगेरियन साहित्यिकांना करून देत.
प्रबोधनाचा आणि धर्मसुधारणांचा काळ : पंधराव्या शतकात आणि सोळाव्या शतकाच्या आरंभापर्यंत लॅटिन हीच गंभीर साहित्याची भाषा होती. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात इटालियन भाषेचा प्रभाव वाढला. १३६७ मध्ये पहिल्या हंगेरियन विद्यापीठाची स्थापना झाली. राजा पहिला मथाइअस कॉर्व्हायनस सत्तेवर आल्यानंतर हंगेरी हे मानवतावादाचे केंद्र बनले. राजा मथाइअसचे कॉर्व्हिना येथील ग्रंथालय सर्वदूर ज्ञात झाले. बूडा येथे त्याने पहिला हंगेरियन छापखाना काढला.
सोळाव्या शतकात हंगेरीत राजकीय आणि वाङ्मयीन बदल घडून आले. तुर्कांबरोबर झालेली युद्धे हे राजकीय दृष्टीने एक महत्त्वाचे कारण होते. मोहाचच्या लढाईत (१५२६) तुर्कांनी हंगेरीचा दारुण पराभव केला आणि हंगेरीचे तीन तुकडे करण्यात आले. मानवतावादी आणि वाङ्मयीन विचारांची केंद्रे नष्ट झाली. अनेक थोर मानवतावाद्यांना देश सोडावा लागला.
सोळाव्या शतकात मोठ्या साहित्यकृती, कलाकृती निर्माण झाल्या नाहीत. लेखक व्यावहारिक वृत्तीचे झाले होते. ते मुख्यतः आपल्या समकालीनांसाठी लिहीत होते; तथापि ह्याचा एक परिणाम असा झाला, की जास्तीत जास्त समकालीनांपर्यंत पोचायचे, तर लेखकांना हंगेरियन भाषेत लिहिणे क्रमप्राप्त झाले.
राष्ट्रीय हंगेरियन साहित्य खऱ्या अर्थाने धर्मसुधारणांच्या आंदोलनांपासून सुरू झाले, असे म्हणता येईल. राष्ट्रीय साहित्याच्या ह्या नव्या पर्वाचे पूर्वसूरी तीन : बेनेडेक कोमजाथी, गॅबर पेस्टी आणि यानोश सिल्व्हेस्टर. हे सर्व डच मानवतावादी ⇨ इरॅस्मस (१४६६-१५३६) ह्याचे अनुयायी होते आणि बायबल च्या वेगवेगळ्या भागांचा हंगेरियन भाषेत अनुवाद करण्यात गुंतले होते. शंभर वर्षांपूर्वी हुसाइटांनी वापरलेल्या पद्धतींपेक्षा वेगळ्या आणि अधिक चांगल्या पद्धती त्यांनी वापरल्या. त्यांनी केलेल्या अचूक अनुवादांत भाषाभ्यासाची काटेकोर दृष्टी बाळगल्याचे दिसून येते. पेस्टीने इसापच्या बोधकथा अनुवादिल्या आणि लॅटिन-हंगेरियन शब्दकोश प्रसिद्ध केला (१५३८). १५३९ मध्ये यानोश सिल्व्हेस्टर याने हंगेरियन भाषेचे पहिले व्याकरण प्रसिद्ध केले. त्याचप्रमाणे हंगेरियन भाषा अभिजात वृत्त-छंद आत्मसात करू शकते हे दाखवून देण्यासाठी एक काव्यरचना केली. हंगेरियन भाषेतली या प्रकारची ही पहिली कविता. १५४१ मध्ये त्याने बायबलच्या ‘नव्या करारा ‘चे संपूर्ण हंगेरियन भाषांतर प्रसिद्ध केले. प्रॉटेस्टंट ह्या नव्या धर्मपंथाच्या प्रसाराबरोबरच हंगेरियन भाषेतल्या स्तोत्रांची तीव्र गरज भासू लागली. ती भागवण्यासाठी ⇨ मार्टिन ल्यूथर आणि इतर प्रॉटेस्टंटांनी रचिलेल्या स्तोत्रांचे हंगेरियन अनुवाद करण्यात आले. सामांचीही (Psalms) भाषांतरे झाली. अशा अनुवादकारांमध्ये आंद्राश बातीझीचे नाव निर्देशनीय आहे. स्तोत्रे अनुवादण्याबरोबरच त्याने जगाचा इतिहास आणि बायबलवर आधारित अनेक गोष्टी लिहिल्या. धर्मसुधारणांच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मिहालय स्ताराई ह्यानेही सामरचनांचा हंगेरियन अनुवाद केला. ह्या लेखक-कवींमध्ये ज्याने विशेष मौलिक काम केले, तो म्हणजे आंद्राश झारोसी हॉरव्हाट हा होय. त्याने काही बोधपर कविता लिहिल्या, काही पद्यरूप प्रवचने लिहिली आणि बायबलमधल्या काही कथांना पद्यरूप दिले.हॉरव्हाट हा श्रेष्ठ उपरोधकारही होता.
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात हंगेरियन नाटकांचा आरंभ झाला. मिहालय स्ताराई ह्याने काही काल्पनिक धार्मिक वादांना नाट्यरूप दिले. ‘द मॅरेज ऑफ प्रिस्ट्स’ (इं. शी.) आणि ‘द मिरर ऑफ ट्र प्रिस्ट्हूड’ (इं. शी.) ही त्याची नाटके तशी अनघड आहेत. एका अज्ञात लेखकाने लिहिलेले ‘कॉमेडी ऑन द ट्रेचरी ऑफ मेनीहार्ट बॉलॉशशॉ’ (१५६९, इं. शी.) ही धर्मसुधारणेच्या काळातील एक लक्षणीय साहित्यकृती म्हणता येईल. ह्या उपरोधप्रचुर सुखात्मिकेत एका उपद्व्यापी हंगेरियन उमरावाची व्यक्तिरेखा उभी करण्यात आली आहे.
गास्पर हेल्तॉय (१५२०-७४) ह्याने इसापच्या बोधकथांची हंगेरियन रूपांतरे केली. प्रवचनांचा मोठा संग्रह पेटर बोर्नेमिस्झाने केला. त्यात सोळाव्या शतकातील हंगेरियन जीवनाचे चित्रण त्याने केले आहे आणि त्यावर त्याने मौलिक स्वरूपाचे मानसशास्त्रीय भाष्य केलेले आहे. ‘ऑन द टेंप्टेशन्स ऑफ द डेव्हिल’ (१५७८, इं. शी.) ह्या त्याच्या लेखनात सोळाव्या शतकातील लैंगिक जीवनाचे मनोवेधक चित्र त्याने उभे केले आहे.
गास्पर कारोल्यी (सोळाव्या शतकाची अखेर) ह्याने केलेला बायबलचा अनुवाद म्हणजे धर्मसुधारणेच्या काळातील हंगेरीतली एक उत्कृष्ट अनुवादनिर्मिती होय. बायबलच्या अधिकृत भाषांतराने इंग्रजी भाषेच्या विकासात जी भूमिका बजावली, तीच कारोल्यीच्या भाषांतराने हंगेरियन भाषेच्या संदर्भात बजावली.
धार्मिक आणि तत्त्वज्ञानीय प्रश्नांचे चिंतन हा हंगेरियन मनाचा विशेष नाही तरीही अठराव्या शतकापर्यंत हंगेरियन भाषेत लौकिक साहित्यापेक्षा धार्मिक साहित्य अधिक निर्माण झाले. ह्याचे एक कारण म्हणजे बरेचसे लौकिक साहित्य हे लिहिले गेले नाही. सोळाव्या शतकातले चारण जी निर्मिती करीत होते, ती लौकिक स्वरूपाची होती. त्यांच्यापाशी विद्वत्ता होती. त्यांचे ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात प्रचलित होत होते. अशा चारणांपैकी सेबॅस्ट्यन तिनोडी (मृ. १५५६) हा सर्वांत महत्त्वाचा. खरेतर हा कवी असला, तरी इतिहासकार म्हणून अधिक गुणवंत होता, असे म्हणता येईल. हंगेरीची तुर्कांबरोबर जी युद्धे झाली, त्यांचा अत्यंत अचूक असा वृत्तान्त त्याने दिला आहे तथापि त्याची पद्यरचना एकसुरी आहे आणि तीत कल्पनाशक्तीचा अभावही जाणवतो. तो संगीतकारही होता आणि त्याने केलेल्या सांगितिक रचनांमुळे हंगेरियन साहित्याच्या इतिहासात त्याचे स्थान निश्चित झालेले आहे. पेटर सेलिमिस ह्याने ‘ द स्टोरी ऑफ द रिमार्केबल निकोलस तोल्डीज एक्स्ट्रॉर्डिनरी अँड ब्रेव्ह डीड्स’ (इं. शी.१५७४) हा रोमान्स लिहिला. ह्यात काव्यगुण फारसे नाहीत; पण तो हंगेरीत फार लोकप्रिय झाला होता.
सोळाव्या शतकातला विशेष उल्लेखनीय कवी म्हणजे ⇨ बालिंत बॉलॉशशॉ (१५५४-९४) हा होय. त्याने मौलिक स्वरूपाची कविता लिहिली. इंग्रजी साहित्यातील कॅव्हलिअर कवींचे स्मरण ही कविता करून देते मात्र कवीकडे नसलेली आशयाची खोली बॉलॉशशाच्या कवितेत आहे. आरंभीच्या हंगेरियन कवितेत त्याची काव्यरचना अतुलनीय म्हणावी लागेल. तो फक्त श्रेष्ठ कवीच नव्हता, तर काव्यरचनेच्या तंत्रातही कुशल होता.
सतरावे शतक : सतराव्या शतकातही हंगेरीचे पूर्वी झालेले तीन तुकडे अस्तित्वात होतेच. पहिला, तुर्कांच्या सत्तेखाली होता. दुसरा, हॅप्सबर्ग सत्तेखाली आणि तिसरा, ट्रान्सिल्व्हेनियाच्या सत्तेखाली. तुर्कांच्या सत्तेखाली जो भाग होता, तिथे हंगेरियन साहित्याच्या विकासाच्या दृष्टीने काही झाले नाही. हॅप्सबर्ग सत्तेखालच्या भागात पश्चिमी विचार आणि कॅथलिक पंथप्रभाव ह्यांना खुला वाव होता. पण ट्रान्सिल्व्हेनिया हा यूरोपीय विचाराच्या मुख्य धारेपासून अलग पडलेला होता तथापि ट्रान्सिल्व्हेनीय बुद्धिमंत प्रॉटेस्टंट जर्मनी, हॉलंड आणि इंग्लंडकडे वळले. अशा बुद्धिमंतांपैकी सर्वांत महत्त्वाचा म्हणजे आल्बर्ट सेंझी मोलनार (१५७४-१६३४) हा होय. त्याने ⇨ जॉन कॅल्व्हिनच्या Institutio religionis Christianae चे भाषांतर केले. त्याने लॅटिन-हंगेरियन आणि हंगेरियन-लॅटिन शब्दकोशही रचला. तसेच हंगेरियन भाषेत अनेक प्रवचने लिहिली.
सतराव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून हंगेरीतील प्रॉटेस्टंटपंथीय ईश्वरशास्त्रवेत्ते डच विद्यापीठात जाऊ लागले. काही इंग्लंडमध्ये गेले आणि तेथे त्यांनी प्यूरिटनांच्या ईश्वरशास्त्रविषयक ग्रंथांची भाषांतरे केली. ह्या भ्रमंतीतूनच यूरोपिका व्हराइतास हा हंगेरियन भाषेतील पहिला प्रवासवर्णनपर ग्रंथ प्रसिद्ध झाला. सतराव्या शतकातला सर्वश्रेष्ठ प्रॉटेस्टंट विद्वान आणि साहित्यिक यानोश अपाकझाई सेरे (१६२५-५९) हा होय. हंगेरियन विश्वकोश त्याने रचला. त्याच्या काळातले ज्ञान ह्या विश्वकोशात सारांशरूपाने देण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यातूनच तंत्रविषयक पारिभाषिक संज्ञांच्या कोशरचनेच्या विकासाचा एक टप्पा गाठला गेला. मिक्लोश टॉटफालुसी किश (१६५०-१७०२) ह्याने हंगेरियन लेखन-पद्धतीला आधुनिक रूप दिले.
सोळाव्या शतकाच्या अखेरीस ल्यूथरच्या सुधारणावादी चळवळींची प्रतिक्रिया कॅथलिक पंथात उमटली (काउंटर रिफॉर्मेशन) आणि हंगेरीच्या पश्चिम भागात तिने जोर धरला. ह्या प्रतिक्रियेचा एक उल्लेखनीय प्रतिनिधी म्हणजे पेटर पाझमन्य (१५७०-१६३७) हा होय. हंगेरियन गद्यावर त्याचे प्रभुत्व होते. श्रेष्ठ वक्ता आणि निबंधकार म्हणूनही तो प्रसिद्ध होता. जोमदार आणि स्पष्ट मांडणी करणारी शैली आणि प्रभावी युक्तिवाद ही त्याच्या लेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. ‘गाइड टू डिव्हाइन ट्रथ’ (१६१३, इं. शी.) ह्या त्याच्या ग्रंथात त्याने कॅथलिकेतर धर्मसिद्धान्त खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेझुइटांच्या प्रभावा-मुळे अनेक हंगेरियन सरदार-उमराव पुन्हा कॅथलिक पंथाकडे वळले. आपल्या मुलांना त्यांनी ऑस्ट्रियन कॅथलिक विद्यापीठांत पाठवले. काहींनी आपली मुले रोमला पाठवली. मिक्लोश झ्रीन्यी (१५०८-६६) ह्या हंगेरियन मुत्सद्द्याने आपल्या लेखनातून राजकीय आणि लष्करी डावपेच ह्यांचे विवेचन केले पण त्याची सर्वश्रेष्ठ कृती म्हणजे ‘द पेरिल ऑफ झिगेट’ (१५ सर्ग, १६५१, इं. शी.) हे महाकाव्य होय. अभिजात महाकाव्यांचा ह्या महाकाव्यावर असलेला परिणाम दिसून येत असला, तरी त्याची मौलिकता आणि हंगेरियन स्वरूप स्पष्ट आहे. सतराव्या-अठराव्या शतकांत ज्याचे लेखन मोठ्या प्रमाणावर वाचले जात होते,त्या इस्टव्हान ड्यनड्यशी (१६२०-१७०४) ह्याने दीर्घकाव्ये आणिसुंदर विवाहगीते लिहिली.
१७००-७० ह्या कालखंडात हंगेरियन साहित्याचा फारसा विकास झाला नाही मात्र उत्तम संस्मरणिका लिहिल्या गेल्या. आत्मचरित्रात्मक लेखनही झाले. मिक्लोश बेटलीन ह्याचे आत्मचरित्रात्मक लेखन वेधक आहे. मिक्लोश हा ट्रान्सिल्व्हेनियन मुत्सद्दी. त्याने भरपूर प्रवास केलेला होता. केलेमेन माइक्स ह्याने ‘लेटर्स फ्रॉम टर्की’ (इं. शी.) ह्या नावाने एका काल्पनिक आत्याला पत्रे लिहिली. उत्तम लेखनशैली आणि निराशा व वैताग करणारा विनोद ही ह्या पत्रांची वैशिष्ट्ये. लास्लो आमादे ह्याने मुख्यतः शौर्य आणि प्रेमानुनय ह्या विषयांवरच्या कविता लिहिल्या. कवी फेरेंट्स फालुदी ह्याने लोकभाषा आणि लोकगीते ह्यांतून आपल्या कवितेची अभिव्यक्ती शोधली.
हंगेरियन साहित्याच्या ह्या र्हासकाळात इतिहास आणि साहित्येतिहास ह्या लेखनाच्या दोन क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी घडून आली. मथाइअस बेल (१६८४-१७४९), ड्यर्डी प्रे आणि इस्टव्हान काटॉना ही नावे ह्या संदर्भात महत्त्वाची आहेत. डेव्हिड झ्विटिंजर हा हंगेरियन साहित्याचा पहिला इतिहासकार. त्याने सु. ३०० हंगेरियन साहित्यिकांची चरित्रे लिहिली, तर पेटर बॉड ‘हंगेरियन ॲथिनीअम’ (१७६६, इं. शी.) या संग्रहात ५०० हून अधिक हंगेरियन साहित्यिकांची चरित्रे शब्दबद्ध केली.
ज्ञानोदय (एन्लाइटन्मेंट) युग : ह्या युगात (१७७२- १८२५) फ्रेंच आणि इंग्रजी कल्पनांचा विशेष प्रभाव हंगेरीत होता. ह्या काळात ज्यांना पहिल्या दर्जाचे म्हणता येईल, असे लेखक फारसे झाले नाहीत. ड्यर्डी बेशेन्येन्यी (१७४७-१८११) ह्याने इंग्रज कवी म अलेक्झांडर पोप ह्याच्या ‘एसे ऑन मॅन’ ह्या काव्यरचनेचे तिच्या फ्रेंच अनुवादावरून हंगेरियनमध्ये भाषांतर केले (१७७२). बेशेन्येन्यीचे सारे लेखन बोधवादी स्वरूपाचे आहे. ‘द ट्रॅजेडी ऑफ ॲजिस’ (१७७२, इं. शी.) ह्या त्याच्या नाटकातून त्याच्या उदारमतवादी कल्पनांचे दर्शन घडते तथापि ‘टॅरिमेनिसिस जर्नी’ (१८०२-०४, इं. शी.) ही त्याची सर्वश्रेष्ठ साहित्यकृती होय. जिला खऱ्या अर्थाने कादंबरी म्हणता येईल, अशी हंगेरियन भाषेतली ही पहिली कादंबरी होय. विवेकवादाला विरोधी अशा प्रत्येक गोष्टीवर ह्या कादंबरीतून त्याने प्रखर हल्ला चढवला. तत्कालीन समाजाच्या उणिवांचीही त्याने चिकित्सा केली. परिणामतः विवेकवादी कल्पना हंगेरियन भाषेत समाजापर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
योझेफ ग्वादान्यी आणि आंद्राश ड्यूगॉनिच (१७७०-१८१८) हे परंपरावादी लोकप्रिय लेखक होते. ग्वादान्यीच्या ‘द जर्नी टू बूडा ऑफए व्हिलेज नोटरी’ (१७९०, इं. शी.) ह्या लेखनातून त्याने हंगेरीतयेणाऱ्या नव्या कल्पनांना विरोध करून पारंपरिक मूल्यांचे समर्थन केले. ड्यूगॉनिचची एतेल्का (१७८८) ही कादंबरी म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमीवर लिहिलेली एक भावोत्कट प्रेमकहाणी आहे. ह्या दोन्ही लेखकांनी सर्वसामान्य हंगेरियन माणसांची भाषा आपल्या लेखनासाठी वापरली, हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. ॲडम पालोक्झी हॉरव्हाट ह्याने ४५० हंगेरियन लोकगीतांचे संकलन केले.
अठराव्या शतकाच्या अखेरीस हंगेरियन कवितेच्या भाषेबाबत प्रयोग झाले. ग्रीक आणि लॅटिन वृत्ते कवितेत आणली गेली पण त्यात एक प्रकारची औपचारिकता होती. बेनेडेक व्हिराग ह्याने हीच वृत्ते उत्कट काव्यात्मकतेने वापरली. डान्येल बेर्झेन्यी (१७७६-१८३६) ह्याच्या १८१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एकाच काव्यसंग्रहाने थोर कवी अभिजात काव्यवृत्तांचा किती परिणामकारकतेने उपयोग करू शकतो, हे दाखवून दिले. त्याच्या काव्यरचना (सर्व इं. शी.) ‘टू द हंगेरियन्स ‘, ‘प्रेयर’ आणि ‘ऑन निअरिंग विंटर’ त्या दृष्टीने निर्देशनीय आहेत.
विवेकवादाच्या कल्पनांचे हंगेरीत सर्वांनीच स्वागत केले, असे नाही. बाहेरून येणाऱ्या कोणत्याही कल्पनांकडे परंपरावादी अविश्वासाने पाहत. प्रत्यक्ष सरकारही बौद्धिक स्वातंत्र्याला फारसे अनुकूल नव्हते. असे स्वातंत्र्य दिल्याने फ्रेंच राज्यक्रांतीसारखी क्रांती आपल्या देशातही होईल, अशी भीती सरकारला वाटत होती. जहाल विचार बाळगणाऱ्या अनेक लेखकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. ह्या लेखकांत सर्वांत प्रतिभाशाली होता यानोश बॉट्सान्यी (१७६३-१८४५). ‘ऑन द चेंजिस इन फ्रान्स’ (१७८९, इं. शी.) ह्या त्याच्या कवितेमुळे हंगेरियन साहित्यात त्याचे नाव चिरस्थायी झालेले आहे. ह्या कवितेने पॅरिसमध्ये काय घडले ते पाहा, असा खणखणीत इशारा सर्व जुलमी सत्ताधाऱ्यांना दिलेलाहोता. कादंबरीकार योझेफ कारमान (१७६७-९५) आणि कवी गॅबर डायका ह्यांच्या लेखनात भावविवशता आढळते. ‘द मेम्वार्स ऑफ फॅनी’ (१७९४, इं. शी.) ही कारमानची उल्लेखनीय कादंबरी. पत्रे आणि दैनंदिनीतल्या नोंदी ह्यांच्या स्वरूपात ही भावुक कादंबरी लिहिलेलीआहे. ही भावुकता असूनही असे म्हणता येईल, की हंगेरियन कादंबरीच्या इतिहासात ह्या कादंबरीमुळे एक पाऊल पुढे पडले. डायका हा दुर्दैवाने अकाली मृत्यू पावला. त्यामुळे त्याच्या प्रतिभेचे पूर्ण मूल्यमापन आजकरता येत नाही.
मिहाल्य चोकोनॉय व्हिटेझ (१७७३-१८०५) ह्याने पूर्णतः हंगेरियन कवितेच्या परंपरेतली कविता लिहिली. लिल्ला नावाच्या एका स्त्रीला उद्देशून लिहिलेल्या त्याच्या अनेक कवितांतून एक विलोभनीय खेळकरपणा आणि सूक्ष्मार्थसूचक विचार दिसून येतात. त्याच्या काही दीर्घ, तात्त्विक कवितांवर फ्रेंच विचारवंत रूसो ह्याचा प्रभाव प्रत्ययास येतो. अलेक्झांडर पोपच्या ‘रेप ऑफ द लॉक’ ह्या कवितेपासून चोकोनॉयने ‘डोरोट्ट्या’ (१८०४) ह्या आपल्या विनोदी कवितेसाठी प्रेरणा घेतलीपण ती कविता मात्र मौलिक असून तिचा संदर्भ हंगेरियन आहे.
शांडोर किशफालुडी (१७७२-१८४४) ह्याचे हंगेरियन साहित्यातील स्थान त्याच्या ‘बिटर लव्ह’ (१८०१, इं. शी.) ह्या भावकवितांच्या मालिकेमुळे निश्चित झाले आहे. फेरेंट्स काझिंत्सी (१७५९-१८३१) हा सु. ४० वर्षे हंगेरीतील वाङ्मयीन जीवनाचा केंद्रबिंदू होता. हंगेरीत झालेल्या एका कटकारस्थानात (जेकोबिअन कॉन्स्पिरसी ऑफ मार्टिनोव्हिक्स) गुंतल्यामुळे सहा वर्षांचा तुरुंगवास त्याने भोगला होता. त्याला साहित्यशैलीमध्ये स्वारस्य होते. हंगेरियन भाषा समृद्ध करण्यासाठी त्याने प्रयत्न केले.
एकोणिसावे शतक : फेरेंट्स काझिंत्सी ह्याने हंगेरियन साहित्याचे पुनरुज्जीवन करण्याचे जे कार्य हाती घेतले होते, ते त्याच्या मृत्यूनंतरही चालूच राहिले. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी हंगेरीतील वाङ्मयीन नेतृत्व कारोल्ली किशफालुडी (१७८८-१८३०) ह्याच्याकडे गेले. १८२२ मध्ये त्याने ऑरोरा हे वाङ्मयीन नियतकालिक काढले. हंगेरीतील अनेक मान्यवर लेखक ह्या मासिकासाठी लिहीत. शिवाय हंगेरियन साहित्यातील स्वच्छंदतावादाचा तो पहिला प्रतिनिधी होता, त्याचप्रमाणे लोकप्रियता प्राप्त झालेला पहिला नाटककारही होता.
किशफालुडीच्या शोकात्मिकांचे देशभर कौतुक होत होते तथापि Bank ban ही योझेफ काटॉना (१७९१-१८३०) ह्याने लिहिलेली हंगेरियन नाट्यसाहित्यातील एक सर्वोत्कृष्ट शोकात्मिका १८२१ मध्ये प्रसिद्ध झाली. काही काळ ही नाट्यकृती दुर्लक्षिली गेली. तेराव्याशतकाची पार्श्वभूमी असलेल्या आणि जोमदार गद्यशैलीत लिहिलेल्या ह्या नाट्यकृतीत राष्ट्रीय आणि व्यक्तिगत संघर्षांचे अत्यंत प्रभावी चित्रण केलेले आहे. टिबोर ह्या गरीब शेतमजुराची व्यक्तिरेखा आजही शोषितांचे प्रतीक बनून राहिलेली आहे. फेरेंट्स क्योल्येसी (१७९०-१८३८) ह्याच्या साहित्यसमीक्षेचा दर्जा फार वरचा होता. त्याने कविताही लिहिल्या. त्यांचे स्वरूप प्रगल्भतेकडे झुकणारे असले, तरी त्यांतून प्रकटणारे विचार अत्यंत प्रभावी होते. त्या कवितांतून अनेकदा राष्ट्रीय समस्यांचे दर्शन घडतअसे. ‘Hymnusz’ (१८२३) ही त्याची कविता हंगेरीचे राष्ट्रगीत झालेली आहे. किशफालुडीच्या मृत्यूनंतर मिहालय व्ह्योर्योस्मार्टी (१८००-५५) हा हंगेरियन साहित्याच्या केंद्रस्थानी आला. अनेक साहित्यप्रकारांत त्याने उत्कृष्ट लेखन केले तथापि ‘द फ्लाइट ऑफ झालन’ (१८२५, इं.शी.) हे त्याचे महाकाव्य विशेष उल्लेखनीय आहे. तत्कालीन प्रश्नांविषयीची चिंता त्यातून त्याने प्रकट केली आहे. वरवर पाहता ह्या महाकाव्याचासूर मात्र स्वच्छंदतावादी आहे. त्याला वाटणारी ही चिंता त्याच्या अनेक उत्कृष्ट भावकवितांतही आढळून येते.
हंगेरियन साहित्यात कवितेने नाटकाला मागे टाकलेले दिसते. कादंबरीसुद्धा धिम्या गतीनेच स्थिर होताना दिसते. मिक्लोश योशिका (१७९४-१८६५) हा पहिला यशस्वी कादंबरीकार. इंग्रज कादंबरीकारसर वॉल्टर स्कॉट हा त्याचा आदर्श होता. Abafi (१८३६) ही त्याची पहिली आणि उत्कृष्ट कादंबरी ऐतिहासिक होती. योझेफ एट्व्होरा (१८१३-७१) हा हंगेरीतील एक राजकीय विश्लेषक तथापि त्याने दोन उत्कृष्ट कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ‘द व्हिलेज नोटरी’ (१८४५, इं. शी.) या कादंबरीत त्याने त्याच्या काळातील सरंजामशाही हंगेरियन समाजाचे चित्र काढले आहे. ‘हंगेरी इन 1514’ (१८४७, इं. शी.) ही त्याची दुसरी कादंबरी शेतमजुरांच्या बंडावर आधारलेली आहे. व्यक्ती आणि कालखंड ह्यांचे अप्रतिम रेखन तीत आढळते. ह्या दोन कादंबऱ्या म्हणजे पददलितांवर होणाऱ्या अन्यायांना पाठिंबा देणारे राजकीय जाहीरनामेच म्हणावे लागतील. यानोश एर्डेल्यी (१८१४-६८) ह्याने लोकगीते आणि बॅलड ह्यांचे संकलन केले. लोकाभिमुख कविता हीच खरी कविता असे ⇨ शांडोर पेतफीचे (१८२३-४९) मत होते. पेतफी हा सर्वश्रेष्ठ हंगेरियन कवींपैकी एक होय. Versek 1842-44 (१८४४) ह्या त्याच्या पहिल्या काव्यसंग्रहामुळे एक श्रेष्ठ भावकवी म्हणून त्याची प्रतिमा निर्माण झाली. त्याच्या कविता श्रेष्ठतेच्या जागतिक स्तरावर गेलेल्या आहेत. तो नवे शोधणारा आणि नवे घडवणारा होता. सांकेतिक विषय आणि काव्यभाषा त्याने बाजूला ठेवली. अनेक विषयांना स्पर्श करणारी अशी त्याची कविता होती आणि त्या कवितेची भाषा मनाला थेट भिडणारी होती. त्याच्या देशभक्तिपर कवितांमागील तळमळीने १८४८ मध्ये हंगेरीत झालेल्या क्रांतीला प्रेरणा दिली होती. असे असूनही त्याची कविता तिच्या साधेपणाच्या पद्धतीनेच लोकांपर्यंत जात होती कारण त्या साधेपणातही एक विलक्षण विलोभनीयता होती. कवितेच्या क्षेत्रात तो केवळ अतुलनीय होता.
पेतफीला वाटत असलेले लोकाभिमुख कवितेचे मोल ⇨ यानोश ऑरॉनी (१८१७-८२) ह्यालाही पटले होते पण त्याच्या कवितेचा रोख वेगळा होता. आपल्या कवितेचे विषय त्याने इतिहासात शोधले तसेच मानवी मनाचे सखोल आकलन आपल्या कवितेतून व्यक्त केले. आपण जी भाषा लिहितो आहोत ती लोकांची भाषा आहे, ह्याची स्पष्ट जाणीव त्याला होती. त्याने लिहिलेले बॅलड स्वच्छंदतावृत्तीचे आणि आवाहकतेचे असाधारण सामर्थ्य असलेले होते. Toldi ह्या त्याच्या महाकाव्याला अफाट कीर्ती मिळाली. ह्या महाकाव्यातून, तसेच द डेथ ऑफ किंग बूडा (१८६४ इं. भा. १९३६) ह्या काव्यातून मानवाच्या चिरंतन समस्यांचे प्रतिबिंब प्रकटते.
पेतफी आणि ऑरॉनी ह्यांनी हंगेरियन कवितेला ज्या उंचीवर नेऊन ठेवले, ती उंची एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील हंगेरियन कवींना गाठता आली नाही. १८४८ च्या स्वातंत्र्यलढ्यात हंगेरीचा पराभव झाला. त्यानंतर १८६७ पर्यंत हंगेरीचा राज्यकारभार व्हिएन्ना येथून चालत होता. १८६७ मध्ये झालेल्या तडजोडीमुळे ऑस्ट्रो-हंगेरियन राजसत्तेची निर्मिती झाली. १८६७ नंतर हंगेरीत औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळाली. तांत्रिक आणि व्यापारी विकास वेगाने झाला. त्यामुळे आत्मसंतुष्टतेची एक वृत्ती निर्माण झाली. तीतून जागे करण्याचे काम लास्लो ऑरॉनी (यानोश ऑरॉनीचा पुत्र) ह्याच्या ‘द हीरो ऑफ द मिराजिस’ (१८७३, इं. शी.) ह्या उपरोधप्रचुर कादंबरीने केले. ही कादंबरी पद्यस्वरूपात आहे. भ्रमनिरासाची भावना तीतून त्याने व्यक्त केली आहे. यानोश व्हाज्दा ह्याने रूपक आणि काव्यप्रतिमा ह्यांच्यात नवता आणली.
हंगेरीत १८३७ मध्ये राष्ट्रीय रंगभूमीची स्थापना झालेली होती. दर्जेदार नाट्यकृतींचे सादरीकरण हा त्यामागचा हेतू होता तथापि काही अपवाद वगळता नाटकांचा दर्जा सुमारच होता. इडी स्झिग्लीगेटी ह्याने करमणूकप्रधान सुखात्मिका लिहिल्या. त्याने नाटकाचा एक नवाच प्रकार निर्माण केला. त्यात ग्रामीण जीवनाचे आदर्शीकृत रूपदर्शन घडवले जाई. त्याचबरोबर काही सामाजिक टीकाही असे. इम्रे मॉडाचच्या (१८२३-६४) द ट्रॅजेडी ऑफ मॅन (१८६१, इं. भा.) ह्या नाटकातून त्याने वैश्विक मानवी प्रश्न मांडलेले आहेत. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग १८८३ मध्ये सादर करण्यात आला आणि आजही ह्या नाटकाची लोकप्रियता ओसरलेली नाही. झिग्माँड केमेन्यी (१८१४-७५) हा एक श्रेष्ठ कादंबरीकार. ‘ग्रिम टाइम्स’ (१८६२, इं. शी.) ‘द फॅनॅटिक्स’(१८५८-५९, इं. शी.) ह्यांसारख्या त्याच्या कादंबऱ्यांतून मनोविश्लेषणाचे कौशल्य प्रकट झाले आहे. त्यामुळे त्याच्या कादंबऱ्या वाचावयास काहीशा अवघड होत्या. ह्या कारणामुळे त्याला लोकप्रियता मिळाली नाही. ह्याउलट, मोर योकॉय (१८२५-१९०४) हा लोकप्रिय कादंबरीकार होता. कथाकथनाचे असामान्य सामर्थ्य त्याच्या ठायी होते. त्याच्या व्यक्तिरेखांचे आदर्शीकरण तो करीत असे. त्याने आपल्या आयुष्यात२०० हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. त्याच्या काही ऐतिहासिक कादंबऱ्यांतून त्याने समकालीन समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, हे त्याच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य. ‘दॅट गोल्डन मॅन’ (१८७३, इं. शी. टीमार्स टू वर्ल्डस्, इं. भा.) ही त्याच्या सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांपैकी एक होय. कालमान मिक्सात (१८४७-१९१०) हाही एक लोकप्रिय कादंबरीकार. हंगेरियन समाजातल्या त्रुटी त्याने प्रच्छन्न विनोद आणि सूक्ष्म निरीक्षण ह्यांतून मांडल्या. गेझा गार्डोन्यी ह्याचे महत्त्वाचे ग्रंथ विसाव्या शतकाच्या आरंभी प्रसिद्ध झाले असले, तरी त्या ग्रंथाचे लेखन एकोणिसाव्या शतकात झालेले आहे. ‘द स्टार्स ऑफ एगर’ (१९०१, इं. शी.) आणि ‘द इनव्हिजिबल मॅन’ (१९०२, इं. शी. द स्लेव्ह ऑफ द हूण्स, इं. भा.) ह्या कादंबऱ्या त्यांच्या उत्कृष्ट रचनाबंधांमुळे विशेष निर्देशनीय आहेत.
एकोणिसाव्या शतकात हंगेरीचे वाङ्मयीन जीवन काही प्रमाणातसंघटित झाले. १८३६ मध्ये ‘पेतफी सोसायटी’ आणि १८७६ मध्येङ्क सोसायटी’ अशा दोन संस्था स्थापन झाल्या तथापि १८२५ मध्येस्थापन झालेल्या ‘हंगेरियन अकादमी ‘चे महत्त्व कमी झाले नाही.
साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात पॉल ड्यूलॉयसारखे समीक्षक झाले. हंगेरियन साहित्याच्या इतिहासाचे आकर्षण काहींना वाटले तथापि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस हंगेरियन साहित्य काहीसे उतरणीला लागले. गतार्थ झालेल्या सामाजिक- राजकीय ध्येयांवर लेखक आपले लेखन आधारू लागले. बहुसंख्य हंगेरियन लेखक सरदार-उमराव वर्गातून आलेले होते. ह्या शतकाच्या अगदी शेवटी कनिष्ठ मध्यम वर्गातले लेखक पुढे आले. ‘द वीक’ (इं. शी.) ह्या योझेफ किस याने स्थापन केलेल्या नियतकालिकाने झोल्तान अँबरस आणि शांडोर ब्रॉडी ह्यांसारख्या अनेक प्रतिभावान साहित्यिकांना वाव मिळवून दिला.
विसावे शतक : विसाव्या शतकाच्या आरंभी १९०६ मध्ये ⇨ एन्ड्रे ऑडी (१८७७-१९१९) ह्याचा ‘न्यू पोएम्स्’ (इं. शी.) हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि हंगेरियन कवितेला एक नवे वळण मिळाले. ऑडीवर फ्रेंच प्रतीकवाद्यांचा प्रभाव होता पण तो शैलीच्या बाबतीत. त्याच्या कवितांचा आशय मात्र जहाल राजकीय कल्पनांनी घडविलेला होता. हंगेरियन कवितेच्या भाषेला त्याने नवचैतन्य प्राप्त करून दिले. त्याने त्या कवितेला नवी प्रतिमासृष्टी दिली. ऑडीच्या उदयाला १९०८ मध्ये निघालेल्या ‘द वेस्ट’ (इं. शी.) ह्या नियतकालिकाचे साहाय्य झाले. ह्यूगो इग्नोट्स, मिक्सा फेन्यो आणि एर्न्यो ओस्व्हाट हे या नियतकालिकाचे संपादक होते. ‘द वेस्ट ‘शी ज्या साहित्यिकांचा संबंध आला होता, त्यांत ⇨ मिहालय बॅबिट्स ह्याचा समावेश होता.तो कवी असला, तरी परभाषेतल्या कवितांचा उत्कृष्ट अनुवादक म्हणून त्याचा विशेष लौकिक होता. १९२९ मध्ये तो ‘द वेस्ट’ चा संपादक झाला. अन्य कवींपैकी डेझ्ह्यो कॉसटॉलान्यी (१८८५-१९३६) ह्याने बालपण आणि मृत्यू ह्या विषयांवर लिहिले. त्याच्या कथा-कादंबऱ्यांनी कथात्मक गद्याचे उच्च मानदंड निर्माण केले. आर्पाड टोथ आणिड्यूला जूहास्झ ह्यांनी समाजातील गोरगरीब आणि जुलमाने पिडलेल्या लोकांची दुःखे वेशीवर टांगली. मिलन फ्यूस्ट ह्याचे लेखन थोडे होते तथापि त्याच्या लेखनातील नाट्यात्म रूपके आणि खोलवर निनादत जाणारीभाषा ह्यांमुळे त्या लेखनाचा चिरस्थायी परिणाम झाला. ‘द स्टोरी ऑफमाय वाइफ’ (१९४२, इं. शी.) ही त्याने लिहिलेली एक कादंबरीही उत्कृष्ट आहे.
‘द वेस्ट’ भोवती जमा झालेल्या अन्य लेखकांत झिग्माँड मोरिट्स( १८७९-१९४२) मार्गिट काफ्का आणि ड्यूला क्रूडी ही नावे निर्देशनीय आहेत. झिग्माँडने आपल्या प्रादेशिक कथांतून शेतमजूर आणि प्रतिष्ठित समाजातील व्यक्ती ह्यांचे जीवन चित्रित केले. मार्गिट काफ्का ही हंगेरियन साहित्यातील पहिली महत्त्वाची लेखिका. ड्यूला क्रूडी ह्याने संज्ञाप्रवाहाचे तंत्र वापरून स्मृतिरंजन करणारे एक स्वप्नजग आपल्या साहित्यकृतींतून निर्माण केले.
‘द वेस्ट ‘शी जे निगडित नव्हते, अशा लेखकांत ⇨ फेरेन्टस् मोल्नार (१८७८-१९५२) ह्याचा समावेश होतो. एक उगवता कादंबरीकार म्हणून त्याने आपल्या वाङ्मयीन कारकिर्दीला आरंभ केला तथापि पुढे तो सामाजिक सुखात्मिकाकार म्हणून मान्यता पावला. १९१८ पूर्वी राष्ट्रवादी साहित्यिकांचा एक गट खूप प्रभावी ठरलेला होता. फेरेन्टस् हर्टसेग (१८६३-१९५४) हा त्यांच्यापैकी एक प्रमुख साहित्यिक. त्याने कादंबऱ्या आणि नाटके लिहिली. पहिल्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर झालेल्या क्रांतिकाळात दोन लेखकांनी प्रस्थापित व्यवस्थेला आणि ‘द वेस्ट’ ला आव्हान दिले. हे साहित्यिक म्हणजे लायॉश कॉस्साक (१८८७-१९६७) आणि डेझ्यो स्झाबू. लायॉश हा हंगेरीतील नव्या आणि जहाल कल्पनांचा पुरस्कर्ता असलेला कवी. त्याने कवितेबरोबर आत्मचरित्रही लिहिले. त्यात त्याने विसाव्या शतकाच्या आरंभी देशातील श्रमिक जनतेचे जीवन कसे होते, ह्याचे जिवंत चित्र रेखाटले आहे. डेझ्योने ‘द व्हिलेज दॅट वॉज स्वेप्ट अवे’ (१९१९, इं. शी.) ह्या आपल्या अभिव्यक्तिवादी तंत्राने लिहिलेल्या कादंबरीत युद्धविरोधी भावना तीव्रतेने व्यक्त केली.
लॉरिंक स्झाबो हा १९२०च्या दशकातला आघाडीचा कवी होय.सूक्ष्म निरीक्षण आणि काव्यनिर्मितीच्या तंत्रावर हुकमत ही त्याच्या काव्य-रचनेची वैशिष्ट्ये होत. १९३० च्या दशकात ऑटिलॉ योझेफ (१९०५-३७) ह्याच्या कवितेने अबोध मनाचा शोध घेतला.
कादंबरी ह्या साहित्यप्रकाराला महत्त्व आल्यानंतर कादंबऱ्यांमधून मध्यमवर्गीय किंवा बूर्झ्वा समाजाचे जसे चित्रण झाले, तसेच अन्यायाचे आणि दुःखाचेही झाले. व्यक्ती आणि समाज ह्यांच्यातील संघर्षाला हीमुख्य पार्श्वभूमी प्राप्त झाली. लास्लो नेमेथ हा आघाडीचा निबंधलेखक.ङ्क द रेव्हलूशन ऑफ क्वालिटी’ (१९४०, इं. शी.) ह्या त्याच्या ग्रंथाचा प्रभाव अनेक वर्षे हंगेरियन साहित्यावर राहिला. १९४५ नंतरचा काळ हा समाजवादी परिवर्तनाचा काळ म्हणून ओळखला जातो पण साहित्यातत्याचे फारसे प्रतिबिंब पडलेले दिसत नाही. १९४८-५३ ह्या काळात अनेक लेखकांवर लेखणी खाली ठेवून गप्प बसण्याची पाळी आली होती. हंगेरीच्या सत्ताधाऱ्यांनी समाजवादी वास्तववादाचा पुरस्कार केला होता. त्याच्या चौकटीत जे बसेल तेच साहित्य, अशी त्यांची भूमिका होती. १९५६ च्या उठावानंतर अनेक लेखकांना तुरुंगात डांबण्यात आले तथापि १९६० च्या दशकाच्या मध्याला समाजवादी वास्तववाद लेखकांवर लादण्याचा प्रयत्न सोडून देण्यात आला. सरकारी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे लेखकांना मुक्तपणे लिहिता येऊ लागले. आधुनिक कथा-कादंबऱ्यांच्या लेखनाचे तंत्र हंगेरियन साहित्यातही कसे आणता येईल, याचा विचार लेखकांनी केला.
गेझा ऑट्टलिक, मिक्लोश मेसझोली आणि इस्टव्हान ऑर्केनी ह्या लेखकांचा निर्देश ह्या संदर्भात करता येईल. ड्यर्डी कॉनराट आणि पेटर इस्टरहाझी हे नव्या लेखकांपैकी श्रेष्ठ लेखक होत. द केस वर्कर (१९६९, इं. भा.), द सिटी बिल्डर (१९७७, इं. भा.) आणि अनधिकृतपणे प्रसिद्ध झालेली द लूजर (१९८२, इं. भा.) ह्या कॉनराटच्या कादंबऱ्या अत्यंत परिणामकारक ठरल्या. पेटर इस्टरहाझी ह्याने आपल्या कादंबरीलेखनातून हंगेरियन जीवन आणि समाज ह्यांचा वेध घेतला.
वास्तववादी संदर्भात योझेफ लेंग्येल ह्याचा निर्देश आवश्यक आहे. त्याच्या कथांतून त्याने सोव्हिएट रशियाच्या श्रमछावण्यांमधील यातनामय जीवनाचे दर्शन घडविले आहे. लेखकांवरील सरकारी बंधने सैलझाल्यानंतरच या कथा प्रसिद्ध होऊ शकल्या.
शांडोर वेओरेस आणि यानोश पिलिन्स्की ह्यांनी उत्कृष्ट काव्यलेखन केले. शांडोरच्या कवितांचे विषय पौर्वात्य तत्त्वज्ञानापासून सुंदर बालगीतांपर्यंत आहेत. पिलिन्स्कीने दुसऱ्या महायुद्धाने निर्मिलेल्या छावण्यांच्या विश्वावर आपल्या स्मरणीय कविता लिहिल्या. फेरेन्टस् जूहास्झ आणि लास्लो नाद्यी हे दोन कवी शेतमजुरांच्या कुटुंबांतून आले होते. आपल्या ग्रामजीवनाच्या परंपरेतून त्यांची कविता निर्माण झाली तथापि सत्तासंपादनासाठी चाललेला पिढ्यांचा संघर्ष आणि विश्वाचा नाश असे विषयही त्यांनी आपल्या कवितांतून आणले.
पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात अनेक हंगेरियन हंगेरीबाहेर गेले. शेजारच्या चेकोस्लोव्हाकिया, युगोस्लाव्हिया आणि रूमानिया ह्या देशांत त्यांनी मुख्यत्वेकरून वस्ती केली. अशा हंगेरियनांपैकी आंद्राश स्यूटो( नाटककार आणि कादंबरीकार ), चतुरस्र लेखक ग्योझो हातार आणिकवी ड्यर्डी फालुदी हे प्रसिद्ध आहेत. म्यूनिकहून निघणारे ‘न्यू होराय्झन’ (इं. शी.) हे सांस्कृतिक नियतकालिक हंगेरीत आणि हंगेरीबाहेरही प्रसिद्ध आहे.
संदर्भ : 1. Czigany Lorant, The Oxford History and Hungarian Literature from the Earliest Times to the Present, 1984.
2. Klaniczay, Tibor Ed., A History of Hungarian Literature, 1982.
कुलकर्णी, अ. र.