स्स-मा-स्यांग-रू : (इ. स. पू. १७९-११७ इ. स. पू.). चिनी कवी. जन्म चीनमधील चेंग-तू येथे. साहित्यनिर्मितीकडे त्याचा ओढा होता. त्याचप्रमाणे स्वप्रयत्नाने त्याने दांडपट्ट्याचे शिक्षण घेतले होते. हान सम्राट चिंग पहिला ह्याचा शरीरसंरक्षक म्हणून त्याला नेमणूक मिळाली होती तथापि लवकरच लिआंगचा राजा शिआओ ह्याच्या दरबारी त्याला एक नवे पद मिळाले. तेथे असतानाच त्याने ‘मास्टर निल’ (इं. शी.) हे काव्य लिहावयास आरंभ केला. मृगयेतला आनंद सांगणाऱ्या तीन व्यक्तिरेखा ह्या काव्यात आहेत. हे काव्य ‘फू’ ह्या वर्णनात्मक चिनी कवितेच्या प्रकारात रचलेले आहे. ‘मास्टर निल’ ही कविता त्याने आपल्या एका मित्राकडे दिली होती. ह्या मित्राने ही कविता सम्राटाला दाखविली. सम्राट प्रभावित झाला आणि त्याने स्स-मा-स्यांग-रू ह्याला शाही शिकारीवर काव्यरचना करण्यास सांगितले. त्याने त्याची ती मूळ कविताच अधिक विस्तृत केली आणि ‘सुप्रिम पार्क’ (इं. शी.) असे ह्या काव्य-कृतीस नाव दिले. संतुष्ट झालेल्या सम्राटाने त्याला आपल्या दरबारात मानाचे स्थान दिले. स्स-मा-स्यांग-रू ह्याचा विवाह एका श्रीमंत स्त्रीशी झाला होता. तिच्या बाजूने त्याला बरीच संपत्ती मिळाली. तो अत्यंत सुखा-समाधानात आपली काव्यरचना करीत राहिला. फू ह्या काव्यप्रकारातल्या २९ कविता आणि गद्यलेखन एवढेच त्याचे साहित्य आज उपलबध आहे.

माओ-लिंग नान यूच येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.