स्वामीप्रभुपाद: (१ सप्टेंबर १८९६-१४ नोव्हेंबर १९७७). भारतातील एक सात्त्विक धर्मगुरू, इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस) या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक आणि वैदिक वाङ्मयाचे गाढे अभ्यासक. त्यांचे पूर्वाश्रमीचे पूर्ण नाव अभय चरणरविंद भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद. त्यांचा जन्म कलकत्ता (कोलकाता) येथे सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात झाला. प्रारंभीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेज (कलकत्ता) येथून बी.ए. ही कलकत्ता विद्यापीठाची पदवी संपादन केली (१९२०). त्या सुमारास त्यांच्या माता-पित्यांनी त्यांचे लग्न केले. त्यानंतर त्यांनी कलकत्त्यात एक रसशाळा (औषधनिर्मिती) काढली तथापि त्यांचे हिंदू वैष्णव पंथीय आध्यात्मिक गुरू भक्तिसिद्धान्त सरस्वती ठाकूर यांनी पाश्चात्त्य देशांत वैष्णव पंथाचा प्रसार व प्रचार करावा, असे त्यांना आवाहन केले (१९२२). त्यामध्ये मुख्यत्वे श्रीकृष्णाची शिकवण आणि तत्त्वज्ञान यांचा अंतर्भाव असावा, असे त्यांचे मत होते. या मताला प्रतिसाद म्हणून त्यांनी आपला बहुतेक वेळ श्रीकृष्णाची शिकवण व भक्तिसंप्रदायाचा प्रचार करण्यासाठी खर्च करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी व्याख्याने दिली. काही लेख व बॅक टू गॉडहेड हे पुस्तक लिहिले. कृष्णावरील लेखनाचे संपादन केले. १९३३ मध्ये त्यांनी अलाहाबाद येथे आपल्या गुरूंचे औपचारिक शिष्यत्व पतकरले मात्र त्यांच्या या धार्मिक आचरणात त्यांच्या कुटुंबियांनी काहीच रस दाखविला नाही. एवढेच नव्हे, तर त्यांना उत्तेजनही दिले नाही परंतु प्रभुपाद यांनी आपला रसशाळेचा धंदा मलावडे यांच्याकडे सुपूर्त करून वान-प्रस्थाश्रम स्वीकारला. पत्नी, मातापिता यांच्याशी असलेले भावनिक संबंध त्यांनी तोडले (१९५०). वृंदावन येथील राधा दामोदर मंदिरात उपासनेसाठी ते राहू लागले. तिथे ते कीर्तन व भागवत पुराणाचा इंग्रजी अनुवाद तसेच अन्य हस्तलिखितांचे भाषांतर करीत. त्यांनी पुढे पूर्ण वेळ ‘हरेकृष्ण’ या चळवळीला वाहून घेतले (१९५४). त्यांना स्वामी हे बिरुद गुरुवऱ्यांनी दिले (१९५९). गौडिय पत्रिका हे मासिक ते प्रचारार्थ चालवीत असत. नंतर ते संन्यास घेऊन गुरुजींच्या सल्ल्यानुसार बॉस्टन (मॅसॅचूसेट्स) येथे आपल्या श्रीकृष्ण या दैवताच्या प्रचारार्थ गेले (१९६५). काही महिन्यांनी त्यांनी न्यूयॉर्कला प्रयाण केले. तिथे त्यांनी ‘हरेकृष्ण’ चळवळीचे मुख्यालय स्थापन केले. आपल्या भांडारगृहाच्या पुढील भागांत त्यांनी एक छोटे सभागृह बांधून घेऊन तिथे ते वेदवाङ्मयाचे वर्ग घेऊ लागले. अल्पावधीतच त्यांची कृष्ण चेतना सर्वदूर प्रसृत झाली आणि त्यांच्या अनियंत्रित भौतिकवादाचा दृश्य परिणाम अमेरिकेतील लोकसमूहावर चांगलाच झाला. ही ‘हरेराम हरेकृष्ण’ चळवळ मुख्यत्वे तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय झाली आणि स्वामींची पुस्तके मोठ्या प्रमाणात वाचली जाऊ लागली. महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून त्यांचे अध्ययन होऊ लागले. त्यांनी ‘हरेराम हरेकृष्ण’ या चळवळीच्या प्रीत्यर्थ इस्कॉन ही संस्था काढली (१९६६). पाश्चात्त्य देशांमध्ये तिच्या अनेक शाखा असून भारतात उत्तर प्रदेशातील वृंदावन (जि. मथुरा) येथे तिचे मुख्य काऱ्यालय आहे. जगभर तिच्या सुमारे शंभर शाखा असून श्रीकृष्णाचा हरेकृष्ण हा जप त्यांची भक्तमंडळी करतात. मद्य, मांस, व्यसन यांपासून अलिप्त असलेल्या भक्तांनी स्वतःच्या पत्नीव्यतिरिक्त अन्य स्त्रीशी समागम करू नये आणि त्या सर्वांना मातेसमान मानावे, अशी शिकवण दिली जाते. इस्कॉनच्या सर्व शाखांमधून श्रीकृष्णाची नित्यनैमित्तिक पूजाअर्चा चालते. त्यांच्या वैष्णव पंथीय आध्यात्मिक विचारसरणीवर काही लोकांनी टीका केली असली, तरी पाश्चात्त्य जगात ज्यांचा धार्मिक विचारवंत म्हणून गवगवा आहे, अशा जे. स्टीलमन जुडाह, हार्व्हे कॉक्स, लॅरी शीन, टॉमस हॉपकींझ प्रभृतींनी त्यांच्या अनुवादित पुस्तकांचे कौतुक केले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या टीकाकारांना समर्पक उत्तरे दिली आहेत. अमेरिकेतील अनेक ख्यातकीर्त विद्वानांनी त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले असून हजारो तरुण त्यांच्याकडे आकर्षित होतात, यातच त्यांच्या काऱ्याचे यश दडले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रभुपाद यांची प्रकृती खालावू लागली, तेव्हा ते भारतात आले व वृंदावन येथे राहू लागले. त्यांनी कृष्ण चैतन्यवादावर सु. ५० पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी भगवद्गीता, भागवत पुराण, बॅक टू गॉडहेड इ. महत्त्वाची असून त्यांच्या भक्तांनी भक्तिवेदान्त ट्रस्ट स्थापन केला आहे (१९७२). या प्रतिष्ठानतर्फे श्री प्रभुपाद लीलामृत हे त्यांचे चरित्र प्रकाशित केले आहे. याशिवाय लॅरी शीन यानेही त्यांचे चरित्र लिहिले आहे.

प्रभुपाद यांनी ‘हरेकृष्ण’ चळवळीच्या प्रसारार्थ अमेरिकेमध्ये स्थापन केलेल्या संस्थेचा मूळ उद्देश बंगालमध्ये लोकप्रिय असलेली भक्ती चळवळ पाश्चात्त्य देशांत प्रसृत करणे हा होता. प्रत्यक्षात ही चळवळ चैतन्य महाप्रभू (१४८५-१५३४) यांनी प्रथम सुरू केली होती. प्रभुपादांचे पहिले अनुयायी न्यूयॉर्क शहरातील हिप्पी हे होते. त्यांनी केशवपन करून भगवी वस्त्रे परिधान करून हरेकृष्ण नामाचा जप सुरू केला. ‘हरेकृष्ण’ चळवळीची शिकवण हे प्राचीन हिंदू धर्मातील, विशेषतः श्रीमद्भागवत आणि श्रीमद्भगवद्गीता यांवर आधारित आहे. त्यांच्या मते श्रीकृष्ण हे सर्वोच्च श्रेष्ठ पुरुष असून प्रत्येक व्यक्तीचे भवितव्य त्याच्या कर्मावरून किंवा पूर्व कर्मावरून ठरते. पूर्वापार कर्ममालिका भक्तिमार्गाने बदलता येते. रामकृष्णांचा जप केल्याने ह्या गोष्टी साध्य होतात, असे ते मानत.

मृत्यूपूर्वी प्रभुपादांनी आंतरराष्ट्रीय चळवळ पुढे नेण्यासाठी एका कार्यकारी मंडळाची स्थापना केली. या मंडळात त्यांना गुरू म्हणून मान्यता दिली होती. इ. स. २००० च्या सुमारास साठ देशांत सुमारे २२५ ‘हरेराम हरेकृष्ण’ चळवळीची केंद्रे होती. त्यांपैकी ५० केंद्रे केवळ अमेरिकेत होती.

प्रभुपादांचे वृद्धापकाळाने वृंदावन येथे निधन झाले.

देशपांडे, सु. र.